काँग्रेस भ्रष्ट असून त्यांच्याबरोबर विचारांची लढाई असल्याने त्यांच्याशी सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही, असे नि:संदिग्ध प्रतिपादन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता ‘मात्र काँग्रेसबरोबर जाण्यास कोणालाही रोखणार नाही, ’ असे स्पष्ट केले. पदे मिळाली नाहीत, तरी पर्वा नाही, पण पारदर्शी कारभाराच्या मुद्दय़ावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचे फडणवीस यांनी ठणकावले.

मुंबईसह राज्यात महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत यश मिळाल्याने प्रदेश कार्यालयापुढे ‘विजयी मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासाच्या व पारदर्शी कारभाराच्या लाटेनेच हे परिवर्तन घडविल्याचे सांगितले. अनेक लाटा येतात आणि जातात, पण मोदींच्या विश्वासाची लाट कधीही ओसरणार नाही, असा टोला फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. मुंबईत महापौर आणि राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महापौर व जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुका आता होत आहेत. याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले. भ्रष्टाचारी काँग्रेसशी विचारांची लढाई असल्याने पदांसाठी त्यांच्याबरोबर जाणार नाही, मात्र कोणालाही रोखणार नसल्याचे सांगितले.

ओरिसा व राज्यातील विजय हा पंतप्रधान मोदींच्या विचारांना आणि कामाला जनतेने दिलेला पाठिंबा असून कोणी कितीही दूषणे दिली, तरी जनता त्यांच्यामागे आहे, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे यांना लगावला. गिरगावसारख्या मराठी विभागातही भाजपला यश मिळाले असून मराठी, गुजराती, उत्तर भारतीय व सर्व समाजघटकांमधून भाजपला पाठिंबा मिळाला आहे, असेही फडणवीस यांनी सुनावले. यावेळी बोलताना आशीष शेलार यांनी ‘मी मी म्हणणारे आता गप्प बसले आहेत,’ असा टोला शिवसेनेचा उल्लेख न करता लगावला. अन्य नेत्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले.