शिवसेना-भाजपचे अंकगणित सुरू; सेनेला तीन अपक्षांचा पाठिंबा

मुंबई महापालिकेची सत्ता संपादन करण्यासाठी शिवसेना आणि भाजप या दोघांकडेही पुरेसे संख्याबळ नसल्याने उभयतांनी मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. तीन अपक्षांचा पाठिंबा मिळविण्यात शिवसेनेला यश आल्याने त्यांचे संख्याबळ आता ८७ वर पोहोचले आहे. तर ८२ वर स्थिरावलेल्या भाजपनेही छोटे पक्ष व अपक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी अंकगणित आखायला सुरुवात केली आहे. दरम्यान, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार या भाजप नेत्यांनी सत्तेसाठी भाजप आणि शिवसेना या जुन्या मित्रपक्षांनी एकत्र यावे, असा सूर लावला आहे. दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेला मदत करावी, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये निर्माण झाला आहे.

शिवसेना आणि भाजपला अनुक्रमे ८४ आणि ८२ जागा मिळाल्याने महापौरपदासाठी उभय पक्षांना अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. स्नेहल मोरे, तुळशीदास शिंदे हे दोन बंडखोर तर चंगेज मुलतानी हे अपक्ष अशा तिघांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवल्याने सेनेची सदस्यसंख्या आता ८७ वर पोहोचली आहे. आणखी एक अपक्ष नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेने महापौरपद काबीज करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. या पाश्र्वभूमीवर आज, शनिवारी सेनेच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची शिवसेना भवनात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

९ मार्चला निवडणूक

मुंबई महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांची मुदत येत्या ८ मार्च रोजी संपुष्टात येत असून ९ मार्च रोजी महापौरपदासाठी निवडणूक होत आहे. महापौरपदासाठी ६ मार्च रोजी उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे. पालिकेकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्यानंतर राजकीय पक्षांना आपल्या उमेदवारांची यादी कोकण भवनला सादर करावी लागणार आहे. महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी राजकीय पक्षांना गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

भाजपशी युती नकोच : शिवसैनिकांचा आग्रह

मुंबई : महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. त्यातच प्रचारादरम्यान भाजपने शिवसेनेवर जहाल टीका केली होती. त्यामुळे भाजपशी युती करू नये, अशी आग्रहाची मागणी शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तर भाजपने युतीसाठी काँग्रेसकडे हात पसरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

काँग्रेसची पंचाईत

भाजपशी युती तोडणाऱ्या शिवसेनेतर्फे काँग्रेसकडे मदतीसाठी हात पुढे करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यात यावा, अशी भूमिका मांडण्यात आली. परंतु सेनेला पाठिंबा जाहीर केल्यास अल्पसंख्याक मतांवर परिणाम होण्याची काँग्रेसला भीती आहे. परंतु बेहरामपाडा मतदारसंघात शिवसेनेचा मुस्लीम उमेदवार निवडून आल्याने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास बिघडले कुठे, अशी भूमिका काही नेत्यांनी मांडली. राज्यात शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यास पुढे कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय घेतला जाईल, असे अशोक चव्हाण यांनी  सांगितले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मात्र विरोधात बसण्याची भूमिका जाहीर केली. शिवसेनेला पाठिंबा दिला तरी टीका आणि नगरसेवक तटस्थ राहिल्यास भाजपला मदत केल्याचा ठपका, अशी काँग्रेसची पंचाईत झाली आहे.

भाजपचे ‘आस्ते कदम’

भाजपकडूनही महापौरपदाकरिता चाचपणी केली जात आहे. युतीबाबत पर्याय खुले ठेवले जाणार आहेत. अर्थात, शिवसेनेकडून येणाऱ्या प्रस्तावाची भाजपला प्रतीक्षा आहे. तोपर्यंत ‘थांबा आणि वाट पाहा’, असा पवित्रा भाजपकडून घेतला जाणार आहे. शिवसेना आणि भाजप या मित्र पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. अर्थात याचा निर्णय  घेण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेते प्रगल्भ आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘शिवसेना व काँग्रेस यांची अभद्र युती होऊ नये’, असे मत व्यक्त केले आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही युतीबाबत अनुकूलता दर्शविली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपचे खासदार, आमदार, मंत्री यांच्याकडून निकालाचा आढावा घेण्यात आला.

उल्हासनगरात भाजपचा महापौर

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत ३१ जागांपर्यंत मजल मारणारा भाजप आता साई पक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन करणार आहे. जीवन इदनानी यांच्या साई पक्षाला ११ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपपुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचा एक नगरसेवक विजयी झाला आहे. त्यामुळे ७८ सदस्यांच्या उल्हासनगर महापालिकेत भाजपचे ३२ नगरसेवक आहेत. बहुमतासाठी ४० नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे साई पक्षाची मदत घेण्यावाचून भाजपकडे पर्याय नव्हता. या पाश्र्वभूमीवर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन साई पक्षाला केले. शुक्रवारी साई पक्षाने भाजपचा हा प्रस्ताव स्वीकारला.