शिवसेना भवनात पुरवणी जाहीरनामा जाहीर; संपत्ती चौकशीचेही आव्हान

शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे भाजपने जाहीरनाम्यात समाविष्ट केले असून त्यापैकी निम्म्याहून अधिक कामे पूर्ण झालेली आहेत, असा दावा करीत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपच्या जाहीरनाम्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘पंचनामा’नामक शिवसेनेचा पुरवणी जाहीरनामा गुरुवारी सादर केला. हिंमत असेल तर शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना नेत्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

आम्ही ‘करून दाखविले’ल्या गोष्टींचा कसला करून दाखविता ‘जाहीरनामा’, असा सवाल राहुल शेवाळे यांनी दादर येथील शिवसेना भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. या वेळी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.

पर्यटन व प्राणिसंग्रहालय, मराठी भाषा व साहित्य, पाणीपुरवठा, रस्ते, पूरमुक्त मुंबई, मलनि:सारण, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक यंत्रणा, वाहतूक व सिग्नल, वीजनिर्मिती आणि वीज बचत, आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण, बेस्ट उपक्रम, मुंबईचा विकास, खेळाडूंना प्रोत्साहन आदींबाबत केलेल्या कामांचा लेखाजोखा शिवसेनेने या पुरवणी जाहीरनाम्यात मांडला असून त्याचा आढावा राहुल शेवाळे यांनी या वेळी घेतला.

शिवसेनेने अनेक कामे केली असून काही प्रकल्पांचे काम सुरू आहे. काही कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत, परंतु यापैकी काही कामांचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात करून भविष्यात ती करण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी या वेळी केला.

राज्य सरकारने ऐरोली आणि तळोजा येथील भूखंड दिलेले नाहीत. त्यामुळे मुंबईमधील कचराभूमी बंद होऊ शकलेली नाही. असे असताना कचराभूमींबद्दल वक्तव्य करून मुंबईकरांची दिशाभूल केली जात आहे. पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या गोष्टींवर कारवाई  करायची आणि दुसरीकडे झाडांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल होईल असे प्रकल्प उभारण्याचा निर्धार करायचा, यामुळे नैसर्गिक गोष्टी नष्ट होण्याच धोका आहे, असेही ते म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांच्या नावाखाली भाजपने मते मागण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मिठी नदी प्राधिकरण नेमण्याची घोषणा करण्यात आली आहे, परंतु प्रत्यक्षात मिठी नदी प्राधिकरण कार्यरत असून या प्राधिकरणाचे प्रमुख मुख्यमंत्री असून त्यांना याचा विसर पडला आहे का, असा उपरोधिक सवाल त्यांनी या वेळी केला.

पालिकेत घोटाळे झाल्याचे आरोप मुख्यमंत्री वारंवार करीत आहेत, परंतु कंत्राटदारांना पैसेच दिलेले नाहीत, मग घोटाळा कसा झाला? एनएससीएल आणि ‘मेक माय ट्रिप’बाबत मुख्यमंत्री गप्प का, असा सवाल करून ते म्हणाले की, केंद्र आणि राज्यातील सत्तेचा वापर करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, असे आव्हानही खासदार राहुल शेवाळे यांनी या वेळी दिले.

वैष्णव यांचे सोमय्यांना आव्हान

काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले शेखर वैष्णव यांनी गुरुवारी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत सहभागी होत भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्यावर तोफ डागली. म्युच्युअल फंडातून आपण पैसे स्वीकारले का? अजय श्रीनिवासन, समीर अरोरा, गुल टेकचंदानी, वैभव कपूर आणि विविध म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकांना ओळखता का आणि कशासाठी, यूटीआय म्युच्युअल फंड आणि एसबीआय म्युच्युअल फंडाशी आपला संबंध काय? केतन पारीखला ओळखता का? वल्लभ भन्साळी यांना तुम्ही ओळखता का आणि तुमचा त्यांच्याशी संबंध काय? असे १८ प्रश्न शेखर वैष्णव यांनी उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची किरीट सोमय्या यांनी उत्तरे द्यावी अथवा एखाद्या व्यासपीठावर या प्रश्नांसाठी खुली चर्चा करावी, असे आव्हान शेखर वैष्णव यांनी किरीट सोमय्या यांना दिले. किरीट सोमय्या यांना आपण अनेक घोटाळ्यांची माहिती देऊन आवाज उठविण्यासाठी विनंती केली होती, असेही ते म्हणाले. काँग्रेसऐवजी शिवसेनेच्या व्यासपीठावर आल्याबद्दल पत्रकारांनी आश्चर्य व्यक्त करताच ते म्हणाले की, शिवसेनेने या संदर्भात बोलण्याची संधी दिली म्हणून मी येथे आलो. मी आज, उद्या आणि भविष्यात काँग्रेस कार्यकर्ताच राहणार.