गेल्या काही वर्षांत आर्थिक अडचणींतून जात असलेल्या रेल्वेला नवी उभारी देण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प मांडताना रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी आगामी आर्थिक वर्षांत १.४६ लाख कोटी रुपयांचे महसूल कमवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, चालू वर्षांत १.३५ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न कमवण्याचे रेल्वेचे ध्येय यंदा पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या वर्षी रेल्वे अर्थसंकल्प मांडताना रेल्वेमंत्र्यांनी १.३५ लाख कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, प्रवासी तसेच मालभाडय़ाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातील घसरणीमुळे या उद्दिष्टापेक्षा ७४६१.६६ कोटी रुपये कमी उत्पन्न रेल्वेच्या हाती पडणार आहे. त्यापैकी ३५७३ कोटी रुपये प्रवासी भाडय़ातून मिळणाऱ्या उत्पन्नातील घसरणीमुळे असतील तर मालवाहतुकीतून मिळणारे उत्पन्न अपेक्षेपेक्षा ३३८३ कोटी रुपये कमी असेल, असा अंदाज आहे. या पाश्र्वभूमीवर बन्सल यांनी १.४६ लाख कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यापैकी ४२,२१० कोटी रुपये प्रवासी वाहतुकीतून व ९३,५५४ कोटी रुपये मालवाहतुकीतून उभे करण्याचे प्रयोजन आहे.