राज्य सरकारने पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती लागू केली आहे. यामागे हेल्मेट बनविणाऱ्या कंपन्यांचा हात आहे इथपासून ते आम्ही काय करायचे हे सांगणारे सरकार कोण? असे अनेक प्रश्न पडत आहेत. तरुणाईला मात्र ही सक्ती फायद्याची वाटते आहे. हेल्मेटमुळे तरी अपघातात जीव गमावणाऱ्यांची संख्या कमी होईल अशी अपेक्षा तरुण वर्गाकडून व्यक्त होत आहे. हे होत असतानाच नियमाच्या अंमलबजावणीसाठी सक्ती करावी लागणे हे दुर्दैवी असल्याचेही तरुण नमूद करतात.

हेल्मेट घालण्यासाठी सक्तीचे फर्मान काढावे लागते हेच मूळात दुर्दैवी आहे. अपघातात गंभीर जखमी होणाऱ्या व कित्येकदा डोक्याला मार लागून दुखापत होणाऱ्यांचे प्रमाण हेल्मेट सक्तीमुळे नक्कीच कमी होईल. मात्र या सक्तील बऱ्याच भागातून विरोध दर्शविला जात आहे. पुण्यामध्ये हेल्मेट न घालता गाडी चालविणाऱ्यांचे प्रमाण ९९.०९ टक्के इतके आहे. उन्हापासून, प्रदुषणापासून संरक्षण होण्यासाठी पुणेरी स्कार्फ हा प्रसिद्ध आहे त्याऐवजी जर हेल्मेटचा वापर केला तर दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात. फक्त नियम करुन त्याचे पालन होत नसते त्यासाठीची पळवाट लक्षात घेऊन त्यासाठी योग्य तो पर्याय उपलब्ध करुन दिला तर बदल होईल.
– किर्ती रोडे, के.जे.सोमय्या महाविद्यालय, तृतीय वर्ष वाणिज्य शाखा

सरकारच्या हेल्मेट सक्तीच्या नियमामुळे हेल्मेट कंपन्यांना नफा होईल हे जरी सत्य असले तरी याचा अर्थ हेल्मेट वापराला विरोध करणे योग्य नाही. यामध्ये प्रामुख्याने पुण्याकडून मोठा विरोध केला जात आहे. आमच्या सुरक्षेची सरकारला एवढी काळजी करण्याची गरज नाही आम्ही आमचे बघु अशा प्रतिक्रिया पुण्यातून येत आहे. हेल्मेट न घालण्याची अनेक कारणांमध्ये तर्कशुद्धता नाही असे मला वाटते. पुण्यातून हेल्मेट सक्तीला केलेला विरोध हा हेल्मेट विकणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात आहे का हे एकदा तपासून घ्यायला हवे.
– मयुर तावरे, रुईया महाविद्यालय, प्रथम वर्ष विज्ञान शाखा

सरकारने दुचाकी चालवणाऱ्या व अगदीच त्याच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीस केलेली हेल्मेट सक्ती अतिशय योग्य आहे. हेल्मेट न घालता गाडी चालवणाऱ्या रोडरोमियोंना यामुळे आळा बसणार आहे. याशिवाय दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे, एका हाताने किंवा अगदीच दोन्ही हात सोडून गाडी चालवणे, मद्यप्राशन करुन गाडी चालवणे यामुळे अनेक अपघात होत आहेत. त्याशिवाय हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला मार लागून मृत्यू होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे.नियम लागू केल्यानंतर त्याचे पालन करणे गरजेचे आहे त्यासाठी दुसरा पर्याय नाही. हेल्मेट वापरण्याची सक्ती केली तर नक्कीच कित्येक जीव वाचू शकतात.
– प्राजक्ता धुमाळे, एल.जे.एन.जे. महिला महाविद्यालय

काही राज्यांमध्ये दुचाकीवर बसणाऱ्या दोन्ही व्यक्तींना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे व कित्येक ठिकाणी या नियमाचे पालनही केले जाते. नियमाचे पालन होत नाही याला कित्येक अंशी सरकारही जबाबदार आहे. आपल्याकडे नियम मोडणाऱ्यास कडक शिक्षा नाहीत. शंभर रुपयाची नोट दाखवुन नियम खिशात घालणाऱ्या वाहतुक पोलिसांमुळे नियमांचे गांभीर्यच नागरिकांच्या लक्षात येत नाही.
– माधवी राणे, एस.एन.डी.टी. महाविद्यालय

सरकारने अपघात होण्यासाठी जबाबदार असणाऱ्या इतर बाबींवर देखील लक्ष घालणे अतिशय गरजेचे आहे. रस्त्यावरील दिवसेंदिवस वाढणारे खड्डे याशिवाय ठिकठिकाणी बिघडलेले सिग्नल्स अशा अनेक गोष्टी अपघातांना जबाबदार आहेत.
– तेजल भंडारी, घनश्यामदास सराफ महाविद्यालय, द्वितीय वर्ष वाणिज्य शाखा