केंद्र सरकारने ‘रोकडरहित’ व्यवहारांना प्राधान्य देण्याबाबत जागरुकता मोहीम सुरू केली आहे त्यावर विद्यार्थ्यांनी मते मांडताना महाविद्यालयीन पातळीवरील व्यवहार रोकडरहित व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

खिशात पैसे नसतात

केंद्र शासनाने सुरू केलेली ‘रोकडरहित’संबंधी मोहीम प्रशंसनीय आहे. आज बाहेर कित्येक देशातील नागरिक रोखीने व्यवहार न करता प्लास्टिक मनी म्हणजेच डेबिट वा क्रेडिट कार्डने व्यवहार करतात. भारतासारख्या मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांततर रोकडरहित

व्यवहार होणे गरजेचे आहे. महाविद्यलायीन स्तरावर रोकडरहित व्यवहाराचा विचार केला असता सर्वप्रथम मुलांचे ठिय्या मांडून बसण्याचे ठिकाण म्हणजे कॅन्टीन रोकडरहित करावे. कारण बहुतांश वेळा मुलांचा खिशात पैसे नसतात, पण क्रेडिट कार्ड मात्र जरूर असते.

हिरल महाडिक, विद्यालंकार महाविद्यालय

 

मोबाइल पाकिटच बरे!

महाविद्यालयीन स्तरावर रोकडरहित व्यवहारांचा विचार झाला तर सर्वप्रथम कॅन्टीन हा महाविद्यालयाचा अतिमहत्त्वाचा कोपरा रोकडरहित करावा. त्याचबरोबरीने महाविद्यालयाच्या बाहेर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांनीही रोकडरहित व्यवहार करणे आवश्यक आहे. कारण काही वेळा विद्यार्थी कॅन्टीनमधील खाण्यापेक्षा महाविद्यालयाबाहेर खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकांनात गर्दी करतात. यासाठी मोबाइल पाकिटांचा व्यवहार हा उत्तम असून त्याचे अ‍ॅपही बहुतांश मुलांकडे उपलब्ध आहे.

ओमकार मगदूम, शासकीय तांत्रिक महाविद्यालय

 

बँकेत वेळ वाया

महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियेतील संपूर्ण व्यवहार हा जरी रोकडरहित असला तरी त्यात ‘डीडी’द्वारे शुल्क भरावे लागते. विद्यार्थ्यांना ‘डीडी’ काढण्यासाठी बँकांमध्ये जाऊन तास-दीड तास काढावाच लागतो. त्यावर बँकेचा सुविधा करही भरवा लागतो. त्यामुळे प्रवेशप्रकियेतील आर्थिक व्यवहार हा जर कार्डने केल्यास वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होईल.

निकिता सुर्वे, सरदार पटेल तांत्रिक महाविद्यालय