विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात ‘मेकर- मेळा’चे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले. नावीन्यपूर्ण ‘मेकर-मेळा’मार्फत विविध क्षेत्रांतील निर्मितीकारांना त्यांचे प्रकल्प, नवीन कल्पना, नमुने यांचे सादरीकरण करण्याची संधी या कार्यक्रमातून मिळली. अनेकांच्या मनात असंख्य कल्पना असतात. सोमय्या महाविद्यालयाने अशांना ‘आरआयआयडीएल’ (रिसर्च इनोव्हेशन इनक्युबेशन डिझाईन लॅबोरेटरी)च्या साथीने ‘मेकर- मेळा’चे आयोजन करण्यात आले होते. १३, १४ व १५ जानेवारीदरम्यान आयोजित केलेल्या ‘मेकर-मेळा’मध्ये देशविदेशातील निर्मितीकारांनी सहभाग घेतला होता. यात १२ ते ६४ वर्षे वयाचे निर्मितीकार एकत्र आले होते.

मेळ्यात प्रकल्पाच्या सादरीकरणासोबतच विपणन कल्पना, सहकार्य आणि संधी अशी विभागवारी होती. निर्मितीकार आणि अभ्यागतांसाठी मेळ्यात ‘टेक-सिटी’, शेती आणि आरोग्यसेवा-सिटी, कला आणि क्राफ्ट सिटी, ‘लेगो-सिटी’ अशा विभागांत वर्गीकरण करण्यात आले होते. शिवाय सहभागी ‘मेकर्स’ना प्रोत्साहित करण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘एज्युकेशनल आणि कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’चे संस्थापक सोनम वायचुंग, ‘फेसबुक इनोव्हेशन टीम, इंडिया’चे प्रमुख मायश्कीन इंगवले, डिझायनर शायना एन सी, पर्यावरणवादी प्रवीण निकम आणि ‘द मिनीमालिस्ट’चे संस्थापक साहिल वैद्य यांची उपस्थिती लाभली. देशभरातील नागरिकांच्या प्रतिसादामुळे ‘मेकर-मेळा’ उत्साहात पार पडला. तसेच कला, क्राफ्ट, अभियांत्रिकी, शास्त्र, ‘डू-इट-युअरसेल्फ’, ‘डू-इट-विथ-अदर्स’ अशा सर्व प्रकारची मानसिकता असलेल्या व्यक्तींचा उत्सव म्हणून हा मेळा सर्वाना खूप काही शिकवून गेला.

 

कीर्ती महाविद्यालयात मोक्ष

पराग गोगटे

मुंबईच्या महाविद्यालयातील बीएमएम विभागाचे वार्षिक महोत्सव पाहण्याजोगे असतात. असाच काही कीर्ती महाविद्यालयाच्या बीएमएम विभागाचा ‘मोक्ष’ हा महोत्सव पाहण्याजोगा होता. तीन दिवस रंगलेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी बक्षिसांची लयलूट केली. ‘मोक्ष’चे यंदाचे हे १० वे वर्ष होते. दर वर्षीप्रमाणे मनोरंजक स्पर्धाबरोबरच सामाजिक जाणीव लक्षात घेऊन ‘रस्ते सुरक्षा’ हा विषय महोत्सवात हाताळण्यात आला. विशेष म्हणजे राज्याचा परिवहन विभागातर्फे महाविद्यालयांमधून देण्यात येणाऱ्या शिकाऊ  वाहन परवाना योजनेचा प्रारंभ याच महोत्सवातून करण्यात आला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी परिवहन विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचा हस्ते महाविद्यालयातील १७ विद्यार्थ्यांना शिकाऊ  वाहन परवाने देण्यात आले. ‘रस्ते सुरक्षा’ या सामाजिक विषयाअंतर्गत ‘क्राइम पेट्रोल’ फेम अनुप सोनी यांनी दुसऱ्या दिवशी उपस्थिती दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इतर महाविद्यालयांतील महोत्सवांमधून हद्दपार झालेले खेळाचे महत्त्व लक्षात घेऊन ‘मोक्ष’मध्ये क्रिकेट आणि फुटबॉल स्पर्धेचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय माध्यम क्षेत्राशी निगडित असणाऱ्या छायाचित्र स्पर्धा, प्रश्नमंजूषा व वादविवाद या स्पर्धाही ‘मोक्ष’मध्ये समाविष्ट होत्या. शेवटचा तिसरा दिवस हा शिवाजी पार्क परिसरातील वीर सावरकर स्मारकात संपन्न झाला. त्या वेळी फॅशन शो आणि झालेल्या स्पर्धाचा बक्षीस समारंभ पार पडला. याप्रसंगी एमटीव्ही वाहिनीचे मुख्य अधिकारी किंगण पिंटो तसेच नृत्य दिग्दर्शक वैभव घुगे व शशांक अरोरा उपस्थित होते.

 

कुतूहल शमवणारा रसायनम

प्रियांका मयेकर

‘रसायनशास्त्र हा नेहमीच प्रत्येक शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुतूहलाचा विषय असतो. हेच कुतूहल शमविण्यासाठी दर वर्षीप्रमाणे या वषीही ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’

संस्थेचा ‘रसायनम’ हा उत्सव जल्लोषात पार पडला. १२ आणि १३ जानेवारी रोजी ‘आयसीटी’च्या रसायनशास्त्र विभागाकडून या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले होते. डॉ. विजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ३५ स्वयंसेवकांनी जवळपास ३०० हून अधिक सहभागी विद्यार्थ्यांसमवेत हा महोत्सव साजरा केला. आपले रसायनशास्त्राचे ज्ञान वापरून ‘मेगा माइंड’ ही पदव्युत्तर प्रश्नमंजूषेची स्पर्धा अटीतटीची झाली, तर पदवीधर  विद्यार्थ्यांकरिता प्रश्नांसोबतच विविध खेळांची धम्माल असणारी ‘व्हॉट द फन’ ही स्पर्धा रंगली. शिवाय खजिन्याचा शोध घेत विविध कोडी कमीत कमी वेळेत सोडवत जिंकणाऱ्या संघाला ‘चेम शोध’ या स्पर्धेत विजयी घोषित करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाची ठरली. ‘चेम एनिग्मा’ या स्पर्धेत गुन्हेगारी जगताचा आभास होईल, असा मंच उभारण्यात आला, ज्यात विद्यार्थ्यांना रसायनांचा वापर करून गुन्हेगार कोण हे शोधून काढायचे होते. ‘चेम ड्रो’ या स्पर्धेत कठीण वाटणाऱ्या रसायनशास्त्राचे चित्ररूप विद्यार्थ्यांनी कौशल्याने साकारले. या महोत्सवातील सर्वाधिक स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिठीबाई महाविद्यालयाने, तर सवरेत्कृष्ट कामगिरीचा किताब हा रुईया महाविद्यालयाने पटकावला. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे ‘रसायन मेला’ ज्यात अनेकविध प्रयोग करून दाखविण्यात आले. एकूणच ‘रसायनशास्त्रातील ज्ञान वाढविणे तसेच हसतखेळत सोप्या भाषेत रसायनशास्त्र समजून घेणे’ हा ‘रसायनम’चा मुख्य हेतू होता जो यशस्वीरीत्या पूर्ण झाला.

 

सिडनहॅममध्ये एक कोशिश

अक्षय मांडवकर

सिडनहॅम महाविद्यालयात ‘एक कोशिश’ या सामाजिक उपक्रमाची तयारी सुरू आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची समाजाप्रति असणारी बांधिलकी लक्षात घेता हा उपक्रम गेल्या वर्षीपासून आयोजित करण्यात येत आहे. यंदा ‘एक कोशिश’चे हे दुसरे वर्ष असून अनाथ मुलांबरोबरच वृद्धाश्रमातील वृद्धांनाही विद्यार्थ्यांनी आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमात विद्यार्थी वृद्ध आणि मुलांसोबत काही आनंदाचे क्षण घालविण्याचा प्रयत्न करणार आहेत. शिवाय त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी काही स्पर्धाचे आयोजनही केले गेले आहे.