भारतीय समाज ‘सिनेमा’नामक गोष्टीने व्यापून गेला आहे. भारतात सिनेमा न पाहणारी व्यक्ती शोधूनच सापडावी. त्यातून आजची युवापिढी निरनिराळे विषय हाताळणारे सिनेमे रसास्वाद घेऊन पाहते. त्यामुळे जर आजच्या युवापिढीला ‘हॉलीवूड’ आणि ‘बॉलीवूड’व्यतिरिक्त इतर भाषिक चित्रपट पाहण्याची आणि त्यांचा रसास्वाद घेण्याची संधी मिळाली तर? नेमकी हीच अभिरुची लक्षात घेता मुंबई विद्यापीठातील संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांनी ‘सिनेसप्ताह’ या कार्यक्रमाचे आयोजन केले असून १६ ते २१ जानेवारीदरम्यान आयोजलेल्या कार्यक्रमाची संपूर्ण सूत्रे पत्रकारिता विभागातील चित्रपट अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती आहेत. सिनेमांची आणि तो अभ्यासण्यासंबंधी आवड असणाऱ्या प्रत्येकालाच या कार्यक्रमात विनामूल्य प्रवेश आहे. पहिल्या दिवशी उद्घाटनाप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणेपदी ज्येष्ठ सिने अभ्यासक आणि समीक्षक सुधीर नांदगावकर उपस्थित होते. जागतिक सिनेमा म्हणजेच ‘बॉलीवूड’ सिनेमा या विषयावर नांदगावकर यांनी प्रसंगी भाषण करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे नांदगावकरांनी आपल्या समीक्षण क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर सिनेमाबद्दल अधिकाधिक माहिती देत माध्यम क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांनी सिनेमा कसा पाहावा आणि कसा अभ्यासावा याबाबत समग्रपणे माहिती दिली. ‘सिटी ऑफ गॉड’, ‘ओल्ड बॉय’, ‘लॉस्ट इन ट्रान्सलेशन’ असे १० वेगवेगळ्या देशांतील विविध शैलींवर आधारलेले गाजलेले चित्रपट दाखवण्यात आले. चित्रपट पाहताना ज्ञानात भर पडावी म्हणून आणि सिनेमाबद्दल विद्यार्थ्यांना केवढी माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी दर दिवशी बॉलीवूडवर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गाजलेल्या चित्रपटातील प्रसिद्ध संवाद लिहिण्याच्यादेखील स्पर्धा कार्यक्रमात आयोजल्या आहेत. आजचा सिनेसप्ताहाचा शेवटचा दिवस असून आतापर्यंत सिनेमा हा इतक्या वेगवेगळ्या विषयांवरदेखील आधारित असू शकतो याचे आम्हाला नवल वाटते आहे, असे विद्यार्थी सांगत आहेत.