‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्पर्धेची घोषणा २६ डिसेंबर २०१६ रोजी आयआयटी मुंबईच्या ‘मूड इंडिगो’ महोत्सवादरम्यान झाली. १ मे रोजी या स्पर्धेचा अंतिम पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत पार पडला. या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण ११ समस्यांवर उपाययोजना सुचविण्याचे लक्ष्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. स्पर्धेत आयआयटी मुंबईच्या तीन प्रकल्पांना सवरेत्कृष्ट ११ उपाययोजनांच्या यादीत स्थान मिळाले आहे. आयआयटी मुंबईच्या ‘द्रोण’ या संघाने ‘जय किसान दुष्काळामुक्त महाराष्ट्र’ या विषयावर प्रकल्प सादर केला होता. तसेच याच प्रकल्पाला परीक्षक निवडीतून प्रथम पारितोषिक मिळाले. या संघात ऋषी बंगला, प्रतीक्षा जैन, शिवम पुंडीर, परवथी एस. आणि नितीन पी.पी. यांनी सहभाग घेतला होता. हे सर्व विद्यार्थी ‘आयआयटी’च्या सिव्हिल इंजिनीअरिंगचे विद्यार्थी आहेत. याशिवाय ‘शुद्धी’ या दुसऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी ‘क्लीन स्लेट : स्वच्छ महाराष्ट्र’ या विषयावर प्रकल्प सादर केला. त्यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या संघात नितीश फातर्पेकर (भौतिकशास्त्र विभाग), नेहा भार्गव आणि शालिनी श्रीवत्स्य (इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग), गुलाम सरवर आणि मेहुल लाड (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) यांनी सहभाग घेतला होता, तसेच ‘प्रोजेक्ट सोलरेज’ या तिसऱ्या संघाने ‘स्मार्ट आणि स्मार्टर : शाश्वत विकास आणि राहण्याजोगे शहर’ यावर आधारित प्रकल्प सादर केला. या संघाला तृतीय पारितोषिक बहाल करण्यात आले.

स्पर्धेत दोन हजार ३०० प्रकल्प सादर करण्यात आले. यात एक लाख १५ हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण परीक्षक निवड आणि लोकप्रिय निवड अशा दोन प्रकारांमध्ये करण्यात आले होते. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.  कार्यक्रमाला ‘टाटा’चे सर्वेसर्वा रतन टाटा, अभिनेता अक्षय कुमार, अनुज माथुर उपस्थित होते.

बोलीभाषांचा मंचीय आविष्कार

उन्हाळी सुट्टीत महाविद्यालयीन कलावंत विद्यार्थ्यांनी वेगळ्या नाटय़स्पर्धेतून तरुणांना कला सादर केली. ‘बोलीभाषा’ असं या एकांकिकेचं नाव. सुप्रिया निर्मिती संस्था आयोजित या स्पर्धेचं यंदाचं दुसरं वर्ष आहे. ‘हृदयाची भाषा बोलीभाषा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या स्पर्धेत मुंबई, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद, अहमदनगर, बीड आणि कोल्हापूर या शहरातून विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. वऱ्हाडी, नगरी, बालेघाटी, घाटी, मालवणी, आगरी, अहिराणी, मराठवाडय़ातील बोलीभाषांमध्ये एकांकिका सादर करण्यात आल्या.

बोलीभाषांना एक वेगळे स्थान प्राप्त व्हावे आणि तरुणांनी आत्मसात करावी आणि तिची जपणूक करावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत मुंबईच्या ‘तिनसान’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. ग्रामीण जीवन नाकारून परदेशी गेलेल्या मुलाची आणि इथे त्याची वाट पाहत तिष्ठत बसणाऱ्या आईवडिलांची व्यथा या नाटकातून मांडण्यात आली. मालवणी भाषेचा उत्तम आविष्कार या एकांकिकेतून झाला. द्वितीय आणि तृतीय क्रमांक मुंबईतीलच नाटय़संस्थांनी पटकावला. ‘माकळ’ आणि ‘क फालतुगिरी ह’ या एकांकिकांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. वऱ्हाडी भाषेने प्रेक्षकांना मोहित केले तर आगरी भाषेतील विनोदांनी सर्वाना लोटपोट हसविले. कल्याणची ‘भक्षक’ ही एकांकिका लक्षवेधी ठरली.

सोमय्याची युधानसवरेत्कृष्ट

के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ऑल टेरिएन व्हेइकल (एटीव्ही) युधान-१.०ने या वाहनाने बाजा एसएई इंडिया २०१७ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पातळीवरील महाविद्यालय स्पर्धेत मुंबईतील महाविद्यालयांमधून पहिले स्थान पटकावले. प्रति तास ५० किमी या सर्वोच्च वेगासह केवळ १५८ किलो वजन असलेली ‘युधान’ ही सर्वात हलकी, सक्षम आणि जलद वाहन ठरली आहे. ती रेड शिफ्ट टीमने डिझाइन केली आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च गिअरबॉक्सची आखणी आणि उत्पादन केलेली हा देशातील एकमेव विद्यार्थी गट आहे. या वाहनाचे वजन कमी ठेवण्यासाठी अ‍ॅल्युमिनिअम रिब्सचे पाठबळ असलेल्या कार्बन फायबर आऊटर केसिंगचा वापर केला.

युधानचा टर्निग रेडिअस २.२ मीटर इतका आहे आणि स्टॉपिंग डिस्टन्स दहा फूट आहे. युधान लष्करी भाग, बर्फ, डोंगराळ भाग व शेतजमीन अशा कोणत्याही प्रकारच्या भूपृष्ठावर चालू शकते. मोठा ट्रॅक्टर खरेदी करणे परवडत नसलेल्या वा शेतजमीन लहान असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही नावीन्यपूर्ण गाडी मोठय़ा ट्रॅक्टरची जागा घेण्यासाठी संभाव्य पर्याय आहे. या स्पर्धेत एकूण ४२० संघांनी सहभाग घेतला होता. महाविद्यालयातील ‘ड्रीम’ गटामध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातील २८ सदस्यांचा सहभाग होता व त्यात २५ मुले व ३ मुली होत्या.

के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या प्राचार्य शुभा पंडित यांनी सांगितले, ‘विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वापरावर आधारित शिक्षणावर भर द्यावा यासाठी आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे.’