सध्या सुरू असणाऱ्या महाविद्यालयीन सुट्टय़ांमध्ये तरुण मंडळी काही तरी नवनवीन करण्याची धडपड करताना दिसत आहेत. शिबिरे, कार्यशाळा, शिकवण्या असे सर्व प्रकार वैयक्तिक पातळीवर सुरू असतानाच संघपातळीवर एकत्रित येऊन येत्या काही दिवसांत अनेक उपक्रम आखले जाणार आहेत. अशा सांघिक  उपक्रमांचा येत्या कालावधीतील सणांशी अगदी जवळचा संबंध आहे. विशेष करून गणेशोत्सवाशी.

अगदी १०० दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्याची चाहूल हळूहळू मिळतच आहे. त्यातच मुंबईमधील गणेशोत्सवात तरुणाईला उधाण आलेले असते. मिरवणुका, ढोलपथक , रोषणाई, सभामंडप, सजावट या सगळ्या गोष्टींच्या तयारीसाठी विद्यार्थी दशेतला तरुण वर्ग मेहनतीने राबत असतो. महाविद्यालयाच्या तासांना दांडी मारून, खोटे-नाटे बहाणे करून गणपतीच्या समोर रमणारी तरुणाई यंदा नव्याने काही उपक्रम हाती घेण्याच्या तयारीत आहे. येत्या गणेशोत्सवामध्ये आर्थिक नफा व्हावा आणि आपले ढोल पथक पुढे यावे यासाठी मुंबईतला तरुण वर्ग धडपडत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या खाली, तर कधी मोकळ्या मैदानात ढोलकऱ्यांचा सराव सुरू झाला आहे. तर काही कलाकार मंडळी सुट्टय़ांमध्ये मातीकाम शिकण्यासाठी, मूर्त्यां घडवण्यासाठी गणेश कला केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. याशिवाय सांघिक उपक्रमांमध्ये स्वच्छतेकडेही लक्ष दिले जाणार आहे. लालबाग-परळ या भागांमध्ये गणपतीचा आगमन सोहळा फार मोठय़ा प्रमाणात पार पडतो. अशा वेळेस साठणारा अमाप कचरा स्वच्छ करण्याची जबाबदारी काही संघांनी घेतली आहे. या सगळ्यामध्ये कधी झाडावर तर कधी छपरावर चढून बाप्पाचे आणि मिरवणुकीमधील क्षण टिपणारा छायाचित्रकार आपल्याला दिसतो. छायाचित्र, आगमनाचे तसेच विसर्जनाचे चित्रीकरण हे आजकाल मंडळांच्या प्रसिद्धीचे एक महत्त्वाचे साधन झाले आहे. नेमका हाच मुद्दा लक्षात घेऊन महाविद्यालयीन मुलांनी आपले संघ तयार केले आहेत. बाप्पाच्या पाटपूजन ते विसर्जनापर्यंत प्रत्येक क्षणाचे छायाचित्र आणि चित्रीकरण करण्याची सेवा हे संघ मंडळांना देणार आहेत. यासाठी मंडळांकडून या संपूर्ण कामाचे पैसेही घेतले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण व्यापातून विद्यार्थ्यांना एक अर्थार्जनाचे साधन उपलब्ध झाले असून, अनुभवाची अनोखी शिदोरी त्यांना मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव नक्कीच तरुणांवर आनंदासोबत धनाचीही बरसात करणार आहे.