प्रोजेक्टमॅन्युअल बुक तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थी कशी सहजरीत्या करतात, याचे जवळून निरीक्षण केले तर चांगल्या शिक्षकाला घेरी येईल, अशी अवस्था आहे. शैक्षणिक व्यवस्थेला मूठमाती देण्याचे प्रकार सुरू आहेत.  यावर परिणामकारक उपाय शोधण्याची वेळ आली आहे.

आयटीचं मॅन्युअल बुक पूर्ण करण्याचे किती घेणार रे?.. ७०-८० पानांचे आहे.. बररर.. दीड हजार रुपये घेईन आणि दोन-तीन दिवसांत देईन परत.. मित्रा, प्लीज एवढे नको रे.. १ हजार रुपये देतो ना तुला आणि नंतर कधी तरी पार्टीपण करू.. ठीक आहे मग.. घे हे हजार रुपये आणि दोन दिवसांत नक्की दे बाबा.. हे संवाद कुठल्या बाजारपेठेतले नसून ते आहेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे. शैक्षणिक सत्रात ‘असाइनमेंट’रूपी ओझ्याला सहज बाजूला सारण्यासाठी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी सर्रास या मार्गाचा अवलंब करताना दिसतात. उशीर, कंटाळा आणि अन्य ‘अभ्यासेतर’ कार्यात ज्यादा वेळ गेल्याने बहुतांश विद्यार्थी अभ्यासक्रमावर आधारलेले प्रकल्प, असाइनमेंट यांना टाळतात आणि महत्त्वाचे म्हणजे या असाइनमेंट पूर्तीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विश्वात एक बाजारपेठही उभी राहिली असून त्यात असाइनमेंटचा आकार आणि करण्यास लागणारा वेळ यानुसार सगळ्यांच्याच किमती ठरलेल्या आहेत. त्यामुळे प्रकल्प आणि प्रात्यक्षिकांचे काम विनाश्रम पूर्ण होते आणि गुणही मिळतात. याने निश्चिंत झालेली विद्यार्थी मंडळी वेळेत प्रकल्प पूर्ण करत असली तरी शैक्षणिक ज्ञान आत्मसात करताना ही मंडळी मागे पडत चालल्याचे गंभीर वास्तव सध्या दिसून येत आहे.

सध्या महाविद्यालयांमध्ये परीक्षांचा माहोल असून विद्यार्थी अभ्यासात वगैरे गढून गेल्याचे चित्र दिसते आहे. या लेखी परीक्षांबरोबरीनेच ‘असाइनमेंट’, ‘प्रॅक्टिकल बुक’, ‘प्रोजेक्ट’ या गोष्टीदेखील वेळेत पूर्ण करून देण्याचे बंधन विद्यार्थ्यांवर असते. मात्र, आज करू व उद्या करू आणि ‘अन्य’ कामांना अवाजवी महत्त्व दिल्याने विद्यार्थी या असाइनमेंट इतर मार्गानी पूर्ण करण्यात धन्यता मानतात, कारण वेळेत त्या पूर्ण न केल्याने गुण गमावण्याचा आणि वेळप्रसंगी नापास होण्याचाही धोका असतो, मात्र विशेष त्रास न घेता या असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दुकाने उपलब्ध झाली आहेत. प्रॅक्टिकल बुक पूर्ण करण्यासाठी १ हजार रुपये, तर पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांतर्गत येणारे ‘प्रायोगिक नियतकालिक’, लघुपट पूर्ण करण्यासाठी जवळपास साडेतीन हजार रुपये आणि छोटय़ा-मोठय़ा लिखाणाच्या असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी पाचशे रुपयांतही काम होते. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची ही दुकानदारी मोठीच असून त्यांची अत्यंत किचकट व वेळखाऊ प्रात्यक्षिके पूर्ण करण्यास तर दोन ते चार हजारांपर्यंतही खर्च येतो. बहुतेकदा वेळेत असाइनमेंट पूर्ण करणारी हुशार मुले अथवा माजी व वरच्या वर्गातले विद्यार्थी ही मेहनतीची कामे ‘गरजूं’साठी आनंदाने करतात. बरं, हे प्रकार इतक्यावरच न थांबता इंटरनेटवरून कॉपी करून प्रकल्प पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचीही काही कमी नाही. अनेक प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दृक्श्राव्य माध्यमातून सादर करावे लागतात. यासाठी माहितीच्या महाजालात  slideshare.net सारखी संकेतस्थळे असून हर तऱ्हेच्या विषयांचे ‘स्लाइड-शो’ उपलब्ध आहेत. त्यावरून अनेक विद्यार्थी वर्गात ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ (पीपीटी) सादर करतात. अनेकदा माजी विद्यार्थ्यांचा संग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फायद्यात पडतो. कमी पैशात जुन्या प्रकल्पाचा सौदा या विद्यार्थ्यांना करता येतो. प्रकल्पांच्या खोटेपणावरून विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याची प्रकरणे खचितच घडतात.

 ‘यादृष्टिकोनावर विचार करण्याची गरज

शिक्षकांच्याही प्रबंधांमध्येही इंटरनेटवरून माहिती घेतल्याचे दिसून येते. हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये किंवा शिक्षकांमध्ये का आहे याचा अभ्यास होणे अपेक्षित आहे. विद्यार्थी प्रात्यक्षिकांबाबत विचारच असा करतात की हे पूर्ण केल्याने मला नेमके किती गुण मिळतील. म्हणजे, एखादी गोष्ट विकत घेतल्यावर त्याचा किती फायदा होईल यासारखाच हा विचार आहे. काही मुले या प्रकल्पांबाबत प्रामाणिकपणे विचार करतात. म्हणजे या प्रकल्पातील ज्ञानाचा मला भविष्यात खूप चांगला फायदा होईल, असे विचार करणारेही आहेत; पण काही विद्यार्थी असा विचार न करता परवडत असेल तर बाहेरून विकत घेतात.

माधवी पेठे, प्राचार्य,

 

डहाणूकर महाविद्यालय शिक्षकांनी प्रामाणिकपणा दाखवावा

जे विद्यार्थी गैरहजर असतात त्यांच्याकडून असे प्रकार होतात. आमच्याकडे मराठीमध्ये पत्रकारितेचा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांकडून मराठीतच प्रात्यक्षिके सादर करण्यास सांगतो. मराठीमध्ये इंग्रजीच्या तुलनेने इंटरनेटवर कमी साहित्य आढळते. जर त्यांनी इंग्रजीतील माहिती भाषांतरित करून लिहिण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांची चूक पकडली जाते. बऱ्याच महाविद्यालयांमध्ये प्रकल्प विद्यार्थ्यांना दिले जातात; पण त्यांचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण करून घेण्यात येत नाही. सादरीकरण करून न घेतल्याने ही अशी चोरीमारीची प्रकरणे बळावतात.

प्रा. गजेंद्र देवडा, साठय़े महाविद्यालय

sanket.sabnis@expressindia.com