21 October 2017

News Flash

‘घणघणता’ उत्साह!

एकीकडे विद्यार्थी मंडळ नव्या दमाच्या मुलांची मोट जमवण्यास सुरू करतात.

नीलेश अडसूळ | Updated: June 10, 2017 1:06 AM

 

शाळेतली तासिका भरल्याची व सुटल्याची खबर देणारी घंटा आणि महाविद्यालयातील घंटा यात एक मूलभूत फरक आहे. शाळेत ती वाजली की विद्यार्थ्यांचे लक्ष जाते, तर महाविद्यालयातील घंटेकडे तितकंसं कोणाचं लक्ष नसतं. तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर महाविद्यालयात ती पुन्हा घणाणू लागली आहे. घणनादातून महाविद्यालयात कमालीचा उत्साह संचारू लागला आहे. महाविद्यालयात मस्ती, थट्टा-मस्करी अर्थात भंकस सुरू होते ते घंटेच्या निनादातूच कट्टय़ावर सारे नव्याने जमा झाले की नवं वेड मनात शिरू लागते. विद्यार्थी मंडळ असो, एनएसएस असो, मराठी वाङ्मय असो वा नाटय़ विभाग. या साऱ्यांची तयारी सुरू होते. एकीकडे विद्यार्थी मंडळ नव्या दमाच्या मुलांची मोट जमवण्यास सुरू करतात. नाटकाचे प्रयोग राबविण्यासाठी अभिनेत्या विद्यार्थ्यांच्या शोधात असतात. थोडक्यात नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात अगदी जोमात झाली आहे. अशा विद्यार्थी आणि त्यांच्या महाविद्यालयांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक कृतीने महाविद्यालयाचा कट्टा पुन्हा एकदा गजबजून गेला आहे.

राष्ट्रीय छात्रसेनेचे प्रशिक्षण शिबीर

एसएनडीटी महाविद्यालय जुहू येथे नुकतेच महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसीचे वार्षिक प्रशिक्षण शिबीर पार पडले. या प्रशिक्षणासाठी मुंबईमधून अनेक महाविद्यालय आणि शाळांनी सहभाग घेतला होता. तब्बल ४००हून अधिक मुलामुलींचा यात समावेश होता. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, प्रतिनिधित्व, नेतृत्व करण्याची क्षमता प्राप्त व्हावी आणि सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकास करणे हे या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे. याशिवाय खेळ, मनोरंजन, योगा, ड्रील, स्वसंरक्षण, तंबू उभारणी, नकाशा वाचन यासारखे उपक्रमही घेण्यात आले. एनएसएसचे अधिकारी आणि कॅडेट्स यांनी सांताक्रूझ येथील कार्डिनल वृद्धाश्रमाला भेट दिली. कॅडेट्सनी वृद्धांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केला; तसेच त्यांच्याशी गप्पागोष्टी कार्यक्रम रंगला. शिबिरादरम्यान पथनाटय़, गायन, नृत्य, फलक तयार करण्याच्या स्पर्धाही घेण्यात आल्या. अशा प्रकारच्या शिबिरांमधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास तर साधेल; पण त्याचबरोबर त्यांच्यात नेतृत्वाची आणि देशसेवेची प्रेरणा मिळेल.

ज्ञानाची शिदोरी कायम हवी

पुन्हा एकदा कॉलेज सुरू झाले आहे. तोच अभ्यास, तीच शिक्षण प्रणाली सगळे तेच तेच आहे. पण पुन्हा नवी सुरुवात करताना सातत्याने मनामध्ये एक विचार येतो की सरकरने ज्या तातडीने नोटाबंदीचा निर्णय लागू केला त्याच पद्धतीत शिक्षण क्षेत्रातही काही बदल अत्यावश्यक आहेत. मग तो अभ्यासक्रमाचा भाग असो किंवा परीक्षांचे सत्र. पण आपण जे शिकतो आहोत ते आपल्यला किती उपयोगाचे आहे आणि त्यात प्रत्याक्षिकतेचा किती भाग आहे याचाही विचार व्हायला हवा. कारण शिक्षण तरुणांना घडवणारी शाखा आहे. देशाच्या चलनाएवढेच त्याचेही महत्त्व आहे कदाचित जास्तच आहे. अभ्यासाचा विषय कोणताही असो पण त्यात आपण संपादन केलेल्या ज्ञानाची शिदोरी कायम सोबत राहायला हवी. इतर देशांच्या तुलनेने शिक्षणात कुठे कमी आहोत का आणि तसे असेल तर मग त्यावर काय करता येईल याचा सर्वागीण विचार व्हायला हवा.

रोहिणी कदम मराठी विभाग, मुंबई विद्यपीठ.

 

शिक्षण पद्धतीत बदल हवाच

अभियांत्रिकी शिक्षण घेतना शिक्षण प्रणालीचे अनेक पैलू पाहायला मिळाले. मग ती प्रवेश पद्धतीचा तर खूप चांगला अनुभव मिळाला. कारण निकाला नंतर नवी सुरुवात करताना आधी प्रवेशाला सामोरे जावे लागते. एखाद्या विद्यार्थ्यांला काही कारणास्तव कमी गुण मिळाले तर त्याला वर्ष वाया जाण्याची कायम भीती असते. बऱ्याचदा चांगले गुण मिळूनही मनासारखे महाविद्यालय मिळत नाही. मग अशा वेळी दादरला राहणाऱ्या मुलाला कुठे तरी शहाड, वाडा अशा भागामध्ये शिक्षणासाठी जावे लागते. त्यात शिक्षणापेक्षा त्याचा अधिक काळ हा प्रवासातच जातो. अशा वेळी प्रवेश पद्धतीचा कुणालाही राग येणे स्वाभाविकच आहे. आणि यातूनच मग मार्कासाठी लढाया सुरू होतात. हुशार ते पुढे जातात. अगदीच मागे असणारे क्षेत्र बदलतात आणि मधल्या मध्ये असणारे लटकले जातात. पुन्हा डोनेशन आणि अशा हजार भानगडी आहेतच. मग नक्की मनासारखे शिक्षण कसे घ्यावे याविषयी जरा शंकाच वाटते. शिक्षण पद्धती वाईट आहे असे मी म्हणणार नाही; परंतु बदल हा हवाच आहे. आणि हे तर फक्त प्रवेश पद्धती बाबतीत झाले, अशा अनेक गोष्टी आहे ज्यामध्ये बदल घडायलाच हवा.

विनोद कदम, सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालय नवी मुंबई.

 

ओळखीची मोहीम

गेल्या वर्षी आमचं स्वागत झालं होतं आणि या वर्षी नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत आम्ही करणार हीच गोष्ट आमच्यासाठी विशेष आहे. नुकत्याच पूर्वपरीक्षा झाल्या तेव्हा अनेक चेहरे समोर आले, पण त्यापैकी किती चेहरे आमच्यात सामील होतील याची उत्सुकता आहे. आणि आता महाविद्यालय चालू होण्याआधीपासूनच येणाऱा बॅचसाठी ओळख करून देण्याची जबाबदारी आमच्यासारख्या वरिष्ठ विद्यार्थ्यांवर आहे. ते कसं करायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी स्वीकारताना एक वेगळी मजा येत आहे. शिक्षकांचं मार्गदर्शन व आमची मेहनत याचा मेळ साधून आम्ही हे ओळखीची मोहीम पार पडणार आहोत. पहिलीच वेळ असल्याने थोडीशी भीती मनात आहे आणि उत्सुकताही आहे. नवीन काही तरी करायला मिळेल, त्यातूनच शिकायला मिळेल, तसेच अनेक अनुभवही सोबत राहतील. कधीतरी आपण त्या बाकावर होतो आज पुन्हा एकदा नवीन विद्यार्थी त्या जागेवर आहेत. हे सगळं अनुभवताना एक वेगळा अनुभव मिळतोय ज्याचा पुढे आम्हला नक्कीच उपयोग होईल.

प्रिया मोहिते, जनसंज्ञापण आणि पत्रकारिता विभाग मुंबई विद्यपीठ.

 

रुईयामध्ये पर्यावरण दिन..

रामनारायण रुईया महाविद्यालयात सातत्याने नवनवीन उपक्रम सुरू असतात. महाविद्यालय सुरू होऊन काही दिवसच झाले आणि विद्यार्थी जोमाने कामाला लागले. विविध सामाजिक उपक्रमांद्वारे पुढे येणाऱ्या रुईया महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दादर माटुंगा विभागात पर्यावरण संवर्धनाची फेरी काढली. या माध्यमातून स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे ब्रीद समस्त दादर व माटुंगाकरांनी अनुभवले; तसेच विद्यार्थ्यांच्या घोषणांमधून प्रवाशांमध्येही जनजागृती करण्यात आली. चौकाचौकांत पथनाटय़ाचे सादर करण्यात आली.

First Published on June 10, 2017 1:06 am

Web Title: college start college first day