विद्यार्थ्यांचा विकास साधण्यासाठी महाविद्यालयांमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या (डे) दिवसांमध्ये नावीन्य आणण्याचा निर्णय मुंबईतील काही प्राचार्यानी घेतला आहे. सप्टेंबर ते डिसेंबपर्यंत ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट डे, चॉकलेट डे, मिक्स मॅच डे, रेड डे, रोज डे असे अनेक दिवस साजरे केले जातात. मात्र यामध्ये धांगडधिंगा आणि मजामस्तीव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या हाती काही लागत नाही, असे प्राचार्याचे म्हणणे आहे. मात्र डे बंद करून मुलांचे हित साधता येणार नाही, यासाठी हे डे साजरे करीत असताना पर्यावरण, अभ्यासपूर्ण विषयांची निवड करणे गरजेचे आहे. वर्षभराच्या अभ्यासाबरोबरच गणेशोत्सवात समुद्रावर सफाई करायला जाणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, पर्यावरणपूरक विषयांवर चर्चासत्र घेणे असे अनेक नवीन विषय घेऊन विद्यार्थी काम करीत आहेत. एनएसएस युनिट, एनसीसी यात सहभागी होऊन कामांमध्ये पुढाकार घेत आहेत. शिक्षण घेत असताना मुलांना समाजाभिमुख काम करण्याची गोडी निर्माण झाली तर यातून एक चांगला नागरिक निर्माण होईल याची खात्री आहे.

रुईयामध्ये पर्यावरणपूरक स्पर्धा

रुईया महाविद्यालयात येत्या शनिवारी रोझ डे आणि क्वीन आणि किंग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या वेळी वनलव हा विषय घेऊन पर्यावरणाला वाचवा असा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. या वेळी रुईयाच्या प्रांगणाला जंगलाप्रमाणे सजविले जाणार आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी या पर्यावरणपूरक स्पर्धा साजरी करावी यासाठी पुढाकार घेतला असून यंदाचा रोझ डे खूपच वेगळा असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

डहाणूकरमध्ये ‘नवप्रांतां’चा उत्सव

महाविद्यालयामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या दिवसांमध्ये फक्त धांगडधिंगा केला जातो, यातून मुलांच्या हाती काहीच येत नाही. यासाठी यंदापासून डहाणूकरमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या दिवसांमधून मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने प्रगतिशील संदेश मिळेल यासाठी प्रयत्न करीत असल्याचे डहाणूकर महाविद्यालयाच्या प्राचार्य माधवी पेठे यांनी सांगितले. या वर्षी विद्यार्थी महाविद्यालयात नवरात्रोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहेत. नवरात्रोत्सवाशी आपली संस्कृती जोडली गेली आहे. त्यामुळे मूळ गुजरातमधून महाराष्ट्र आणि देशभरात खेळला जाणारा गरबा याची पद्धत त्या त्या प्रांतांप्रमाणे बदलत जाते. या बदलाचा शोध यंदाच्या नवरात्रोत्सवात घेतला जाणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, बंगाल, ओडिसा आदी राज्यांमध्ये नवरात्रोत्सव साजरा केल्या जाणाऱ्या पद्धतीचा अभ्यास करण्यात येणार आहे. यात नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी एका प्रांतातील नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या पद्धतींचा अभ्यास करून ती माहिती वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. पोस्टर प्रदर्शन, चर्चासत्र यांसारखे कार्यक्रम घेऊन हा विषय महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ठाकूर महाविद्यालयात मधुमेह तपासणी शिबीर

सप्टेंबर महिन्यात वेगवेगळे दिवस साजरे करण्याऐवजी कांदिवली येथील ठाकूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्वासाठी मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन केले. महाविद्यालयातील एनएसएस प्रतिनिधींनी महाविद्यालयातील शिक्षक वर्ग आणि रोटरी क्लबच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी आणि पोलिसांनीदेखील या शिबिरात तपासणी करून घेतली. दोन दिवसांच्या या शिबिरात एकूण ९१४ जणांची तपासणी करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्या परिसरातील भाजी विक्रेते, दुकानदार यांनाही तपासणी करण्यासाठी आवाहन केले होते. तर या परिसरात स्वत: फिरून सर्वाना माहितीही पोहोचवली.