रुईया महाविद्यालयाच्या बी.एम.एम विभागाच्या ‘लिंगभेद’ या विषयावरील दोनदिवसीय आंतरमहाविद्यालयीन लघुपट स्पर्धेत मुंबईमधून सुमारे ३६ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘लिंगभेद’ या विषयावर साठ तासांच्या कालावधीत किमान दहा मिनिटांचा लघुपट तयार करणे तसे कठीण होते. मात्र विद्यार्थ्यांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. ‘लिंगभेद’ हा लघुपटासाठी विषय देण्यात आला होता याशिवाय आयोजकांनी दिलेल्या दोन घटकांवर आधारित लघुपट बनविणे विद्यार्थ्यांना बंधनकारक होते. यामधील निवडक पाच विजेते लघुपट या महोत्सवात प्रदर्शित केले जातील. आज रुईया महाविद्यालयाच्या सभागृहात या लघुपट महोत्सवामधील निवडक पाच लघुपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी विजेत्या पहिल्या तीन लघुपटांना पारितोषिके दिली जातील. याशिवाय लघुपटच्या माध्यमातून जागृकता निर्माण करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘मावा’ या संस्थेच्या सहकार्याने १० फेब्रुवारी रोजी ‘समभाव’ या लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लिंगभेद या विषयावर आधारित लघुपट दाखविले गेले.

प्रेमाचा दिवस आवडत्या पुस्तकांसोबत
प्रेम कुणावर करावे.. प्रेम कुणावर करावे हे कुसुमाग्रजांनी विचारले आहे, मग हे प्रेम पुस्तकांवर का करू नये? यामुळे झुनझुनवाला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १४ फेब्रुवारी जागतिक प्रेम दिनानिमित्ताने पुस्तकांच्या प्रेमात प्रेम दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. या महाविद्यालयामध्ये महिन्याच्या एका रविवारी पुस्तकप्रेमींची जत्रा भरते त्यामध्ये विद्यार्थी पुस्तकांविषयी भरभरून बोलतात. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘कोमसाप’ उपक्रमांतर्गत ‘युवाशक्ती कॉलेजकट्टात’ सामील होणारे विद्यार्थी १४ फेब्रुवारी रोजी त्यांना आवडलेल्या पुस्तकांवर बोलणार आहेत. आजई तरुणाई पुस्तक वाचत नाहीत त्यांना इंटरनेटचे व्यसन आहे अशा अनेक प्रतिक्रिया समाजामधून येत असतात. यामुळे आजची तरुण पिढीदेखील पुस्तकांसोबत आनंदाने रमते, त्यांच्यावर प्रेम करते यासाठी झुनझुनवाला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एका वेगळ्याच पद्धतीने यंदाचा प्रेमाचा दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. तरुण पुस्तकप्रेमी या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. फक्त अट आहे पुस्तक वाचून येण्याची व त्यावर भरभरून बोलण्याची. पुस्तकाचे नाव, लेखक, आवडलेले मुद्दे, यासोबत न आवडलेले मुद्दे, एखादे आवडते वाक्य असे चांगले विचार पुस्तकप्रेमींसोबत वाटून घेण्याची संधी मिळणार आहे. पुस्तकातील छोटे बारकावे, महत्त्वाच्या बाबी उत्तम रीतीने उलगडून सादर करणाऱ्या पुस्तकप्रेमीचा यावेळी सत्कार केला जाईल. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयात हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मंगेश पाडगावकर, अरविंद गोखले, कुसुमाग्रज आणि अरुण टिकेकर या लेखकांचे स्मरण करून त्यांच्या साहित्यिक लेखनाविषयी आपले मत मांडतील.

‘पुकार’ लघुपट महोत्सव
रोट्रॅक क्लब ऑफ मुंबई मुलुंड साऊथ आणि रुईया महाविद्यालयाच्या रोट्रॅक क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुकार’ या लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात घडणाऱ्या विविध सामाजिक मुद्दय़ांना स्पर्श करणारी संकल्पना या लघुपट महोत्सवासाठी देण्यात आली आहे. सेलिब्रिटी परीक्षकांकडून या स्पर्धेचे परीक्षण केले जाणार आहे. प्रथम क्रमांकास रोख रक्कम दहा हजार आणि द्वितीय क्रमांकाच्या लघुपटाला पाच हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९६६५०४०८१८ यश सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

माध्यम परिषद
किशिनचंद चेलाराम महाविद्यालयाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातर्फे डिजिटल लोकशाही या विषयावर ‘मीडिया समिट २०१६’ च्या अंतर्गत १९ आणि २० फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. के.सी महाविद्यालयात ही परिषद होणार आहे. तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव, माध्यमांचा विकास, माध्यम शिक्षण आणि सुधारणा या विषयांवर आधारित चर्चासत्रे या परिषदेत होणार आहेत. तसेच विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी या संकल्पनेवर आधारित संशोधनपत्रिका सादर करणार आहेत. या परिषदेसाठी भारतीय माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रावर समीक्षणात्मक लेखन करणाऱ्या वनिता कोहली- खाडेकर उपस्थित असणार आहेत.

व्हीपीएम कॉलेजचा कॅम्पस् इंटरव्ह्य़ू संपन्न
मुलुंड पूर्व मिठागर रोडवरील व्हीपीएम रमणिकलाल शहा महाविद्यालयात नुकताच कॅम्पस इंटरव्ह्य़ू पार पडला. महाविद्यालयांतील विविध शाखांमधील मुलांच्या मुलाखती झाल्या. टाटा कन्सल्टन्सीमार्फत घेण्यात आलेल्या मुलाखतीतून ४० विद्यार्थ्यांची, तर नोकिया कंपनीने २० विद्यार्थ्यांची निवड केली. या विद्यार्थ्यांचा तृतीय वर्षांचा निकाल लागल्यावर त्यांना कामावर रुजू करण्यात येणार आहे. कॉलेजच्या प्राचार्या सौ. कविता शर्मा आणि कॉलेजचे प्लेसमेंट ऑफिसर प्रा. युवराज वाघ, मंगेश कोर्डे हे गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम महाविद्यालयात राबवत आहेत. एचसीएल, इन्फो सॉफ्ट, नोकिया, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, आयसीआयसी बँक, कोटक
महिन्द्रा, सिंचेल, एचडीएफसी बँक, आदी नामांकित संस्था, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी महाविद्यालयात मुलाखती घेण्यासाठी येत असतात. अभियोग्यता चाचणी, गटचर्चा, वैयक्तिक मुलाखत अशा टप्प्यांतून विद्यार्थ्यांना या मुलाखतीला सामोरे जावे लागते. यापुढेही विविध कंपन्यांमार्फत अशी संधी विद्यार्थ्यांना लाभणार असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
खबऱ्या
सद्याच्या तरुणाईला वाचनाची आवड नाही.. त्यांना स्वत:ची भूमिका नाही..अशी ओरड सातत्याने होत असते. मात्र प्रत्यक्षात महाविद्यालयीन कट्टय़ांपासून ते सिलिकॉन व्हॅलीपर्यंत भारतीय तरुणाईची कल्पकता आणि त्यांचे काम पाहवयास मिळते. महाविद्यालयांमध्ये काय सुरू आहे. कॅम्पसमध्ये आणि कॅम्पसबाहेर विद्यार्थी नेमके काय करत आहेत. त्यांच्या कट्टय़ावरच्या गप्पांमध्ये सध्या कोणते विषय चर्चेत आहेत. त्यांची यशोगाथा, त्यांची मते. या सर्वाचा वेधक आढावा घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी ‘कॅम्पस कट्टा’ हे पान घेऊन आलो आहोत.अर्थात या पानासाठी तुम्ही लिखाण campuskattamumbai@gmail.com वर पाठवायचे आहे. तर मग करा लॉगइन..