विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दरवर्षी देशभरातील विविध महाविद्यालयांना ‘पोटेंशल फॉर एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा देशभरातून ३५० महाविद्यालयांनी या पुरस्कारासाठी अर्ज केला होता. त्यातून १२४ महाविद्यालयांना हा पुरस्कार मिळाला. यात यंदा मुंबईतील आठ महाविद्यालयांना नुकतेच हा पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाले आहे. कोणत्याही महाविद्यालयासाठी राष्ट्रीय स्तरावरचा हा सन्मान मिळणे भूषणावहच आहे. कारण, महाविद्यालयांमधील शैक्षणिक व पायाभूत सुविधा, तसेच नॅक दर्जा, शोध प्रकल्प या सर्व बाबींना गृहीत धरून हा पुरस्कार दिला जातो.

* पुरस्कारासाठी महाविद्यालयांना आयोगाकडून प्रत्येकी दीड कोटी रुपयांचे अनुदान
* अनुदानाचा वापर महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, अभ्याससाहित्य खरेदी, संशोधन प्रकल्प राबवण्यासाठी करणे अपेक्षित
* प्रत्येक महाविद्यालय पुरस्कारासाठी अर्ज करताना या अनुदानाचा वापर कशासाठी करणार आहे, याचा अहवाल आयोगाकडे सादर करतात.
* तीन वर्षांच्या कालावधीत महाविद्यालयाने या अनुदानाचा वापर शैक्षणिक व पायभूत सुविधांच्या निर्मितीकरिता केल्यानंतर आयोगाकडून पुन्हा त्याचे मूल्यांकन केले जाते.
* या पुनर्मूल्यांकनाच्या आधारे महाविद्यालयांना ‘कॉलेज विथ एक्सलंस’ हा पुरस्कारही दिला जातो. मुंबईमधील यंदा हा पुरस्करा पटकाविलेल्या काही महाविद्यालयांची ही ओळख

नानावटी महाविद्यालय
होम सायन्सचे विविध अभ्यासक्रम शिकविणाऱ्या माटुंगा येथील डॉ. भानुबेन महेंद्र नानावटी महाविद्यालयाने यंदाचा ‘पोटेंशियल फॉर एक्सलंस’ पुरस्कार पटकावला आहे. सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीकडून १९८४ साली महाविद्यालयाची स्थापना झाली असून येथे आहार शास्त्र, टेक्सटाइल, मानव विकास, पर्यटन, व्यवस्थापन आदी विषयातील विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. नॅककडून महाविद्यालयाला ‘अ’ श्रेणीही मिळाली आहे. महाविद्यालयात सध्या सुमारे १५०० विद्यार्थिनी शिक्षण घेत असून त्यांच्या सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थिनींसाठी येथे विवाहपूर्व समुपदेशनाचे सत्रही घेतले जाते. तसेच गांधीविचारांच्या अभ्यासासाठी येथे विशेष अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या महाविद्यालयात येत्या काळात विविध प्रकल्प व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शिल्पा चरणकर यांनी सांगितले. यात महाविद्यालयात पायभूत सुविधा, प्रयोगशाळांचे नूतनीकरण, संशोधन-प्रकल्प राबवले जाणार आहेत. विशेष म्हणजे टेक्सटाइल विषयातील अभ्यासक्रम महाविद्यालयाकडून शिकविले जात असून येत्या काळात महाविद्यालयात ‘टेक्सटाइल संग्रहालय’ही उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयात भारतातील हजारो वर्षांच्या वस्त्र निर्मितीचा इतिहास जिवंत करण्यात येणार आहे. विविध राज्यांमधील वस्त्रांची विविधता, कपडय़ांचे विविध प्रकार, त्यांच्यावरील नक्षीकाम आदी बाबीही यात पाहायला मिळणार आहेत.

के. जे. सोमय्या महाविद्यालय
माटुंगा येथील श्रीमती मनीबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयानेही यंदाचा ‘पोटेंशियल फॉर एक्सलंस’ पुरस्कार पटकावला आहे. १९५७ साली स्थापन झालेल्या महाविद्यालयातर्फे विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक अभ्यासक्रम राबवून गेल्या साठ वर्षांत विद्यार्थिनींच्या विविध क्षेत्रांतील वाटचालीसाठी पुढाकार घेतला आहे. धारावी, वडाळा, अँटॉप हिल आदी भागांतील सुमारे २५०० विद्यार्थिनी येथे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच त्यांना कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठीही येथे प्रयत्न केले जातात. येथे विद्यार्थिनींसाठी ‘टिचर असिस्टंट स्कीम’ राबवली जाते. ज्यात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी पदवी स्तरावरील विद्यार्थिनींना अध्यापन करतात. त्यामुळे विद्यार्थिनींना आत्मविश्वास मिळण्यास मदत होते. याशिवाय विद्यार्थिनींना महत्त्वाच्या विषयावर समुपदेशनही केले जाते. तसेच अवांतर उपक्रम, संशोधन प्रकल्प, पायभूत सुविधा, व्यवस्थापन, प्रशासन यांना केंद्रस्थानी ठेवत महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, असे प्रा. अर्चना पत्की यांनी सांगितले.
यंदा मुंबई विद्यापीठाकडून गुणांकन करून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठविण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये सर्वात जास्त गुणांकन मिळविणारे महाविद्यालय म्हणजे विद्याविहार येथील के. जे. सोमय्या महाविद्यालय. या गुणांकनामध्ये इतरांपेक्षा पुढे राहत महाविद्यालयाने यंदा विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पोटेंशियल फॉर एक्सलंस हा पुरस्कारही पटकावला आहे. सोमय्या महाविद्यालय हे त्यांच्या नवनवीन शैक्षणिक उपक्रमांसाठी ओळखले जाते. आता हा पुरस्कार मिळाल्यानंतर महाविद्यालयाकडून येत्या काळात विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकल्प व पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत, असे प्राचार्य डॉ. विजय जोशी यांनी सांगितले. यात ‘फ्लीपक्लास’ ही विद्यार्थी-शिक्षक संवादाची नवी पद्धत अवलंबली जाणार आहे. ज्यात शिकवला जाणारा भाग दृकश्राव्य माध्यमात विद्यार्थ्यांनी घरीच पाहायला मिळणार असून विद्यार्थ्यांंनी त्याद्वारे अभ्यास करून वर्गात प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. तसेच विविध अभ्यासक्रमांचे अभ्याससाहित्य डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांकडून सध्या मोठय़ा प्रमाणात मोबाईलचा वापर केला जातो. त्यामुळे मोबाइलवरच विद्यार्थ्यांना अभ्याससाहित्य उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना त्याचा सहज उपयोग करता येऊ शकतो. त्यामुळे लवकरच महाविद्यालयाकडून ‘एम- लर्निग’ हा अनोखा उपक्रमही राबवला जाणार आहे. ज्यात विद्यार्थ्यांंना त्यांच्या अभ्यासक्रमांशी संबंधित अभ्याससाहित्य मोबाइलवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय महाविद्यालयात असलेल्या भूरचनाशास्त्र या विषयाचे संग्रहालयाला आणखी समृद्ध करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

खालसा महाविद्यालय
मुंबईमधील जुन्या महाविद्यालयांपैकी एक असणाऱ्या माटुंगा येथील जी. एन. खालसा महाविद्यालयाला आतापर्यंत विज्ञान व तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान या दोन अभ्यासशाखांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदान मिळाले आहे. तसेच नुकतेच सर्व अभ्यासशाखांसाठी असलेला पोटेंशल फॉर एक्सलंस पुरस्कारही मिळाला आहे. १९३६ साली स्थापना झालेल्या खालसा महाविद्यालयांत सध्या सहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये प्रावीण्य मिळवावे यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच येथे येत्या काळात महाविद्यालयात भारतीय इतिहासाची माहिती देणारे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यात इतिहास विषयाचे विविध माहितीपट, पुस्तके , दुर्मीळ नाणी, हस्तलिखिते आहेत. तसेच शीख धर्माच्या इतिहासाविषयी या संग्रहालयात खास विभागही असणार आहे. याशिवाय विविध विषयांवरील तज्ज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा संग्रहालयातर्फे आयोजित केल्या जाणार आहेत. तसेच महाविद्यालयाकडून हिंदी भाषेचा प्रसार करण्यासाठी विशेष केंद्रही स्थापन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषा शिकावी यासाठी विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम निर्माण केले जाणार आहेत. शुद्ध हिंदी भाषा बोलता, लिहिता यावी यासाठी या केंद्रातर्फे विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. हिंदीतून मराठी आणि इंग्रजीत अनुवादासाठी विद्यार्थ्यांंना प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय अनुदानामुळे वाणीज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘कॉम्पॅक्ट’ हे संशोधन केंद्र तसेच गणितीय शास्त्र विषयातील संशोधन केंद्रही स्थापले जाईल, असे प्राचार्य किरण माणगावकर यांनी सांगितले.

माझ्या मते..
न्यायव्यवस्थेनेच अश्रू ढाळले तर सामान्यांचे काय?
विज्ञान भवनातील दोन दिवसांच्या परिषदेत सरन्यायाधीश न्यायव्यवस्थेविषयी बोलताना भावुक झाले आणि त्यांना आपल्या भावनांना आवर घालता आला नाही. नागरिकांना न्याय देणारी न्यायव्यवस्थेची ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांचा वाली कोण? सरन्यायाधीशांनी रडून आपल्या भावना मोकळ्या केल्या मात्र या व्यवस्थेवर अवलंबून असणारे कोटींमध्ये नागरिक गेली अनेक वर्षे अश्रू ढाळत आहेत त्याला बांध कोण आणि कसा घालणार?
– प्रसाद हावळे

ज्या न्यायालयीन व्यवस्थेवर सर्वाचा विश्वास आहे त्याच न्यायालयीन प्रमुख सरन्यायाधीश न्या. टी. एम. ठाकूर यांनी अश्रू ढाळणे ही गोष्ट फार दुर्दैवी आहे. सरन्यायाधीश यांच्या वक्तव्यानंतर न्यायव्यवस्थेतील बऱ्याच गोष्टी नागरिकांच्या समोर आल्या असल्या तरी हे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. गुन्हेगारीवर अंकुश ठेवायला शासनाला यश येत नाही तर न्यायव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. आज न्यायालयांमध्ये कोटींमध्ये खटले प्रलंबित असून आणि याचा कालावधीही अधिक आहे. तर अनेक न्यायालयांमध्ये गरज असतानाही न्यायालयांच्या जागा रिकामी आहे. सर्वसामान्य माणसाला न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा असते, मात्र आजही आरोप सिद्ध न झालेले कोठडीमध्ये न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आपण ज्या विभागाचे प्रमुख आहोत तेथे अशी परिस्थिती असताना ठाकूर यांना रडू आवरणे शक्य झाले नाही हे जरी मान्य केले तरी जर न्याय देणाऱ्या व्यवस्थेची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय?
– अश्विन महाजन, साठय़े महाविद्यालय.

न्यायालयीन प्रक्रियेत काम करणाऱ्या प्रत्येकाची खंत सरन्यायाधीश न्या. ठाकूर यांनी बिनदिक्कतपणे मांडली. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात जेव्हा कनिष्ठ न्यायालयातून खटला येतो तेव्हा तो अधिक जटिल आणि संवेदनशील बनतो. परंतु न्यायाधीशांच्या अभावी तो खटला तत्परतेने आणि जलदरीत्या निकालापर्यंत पोहोचवण्यात आडकाठी येते. भारतीय न्यायव्यवस्था जगातल्या सवरेत्कृष्ट न्यायव्यवस्थेपैकी एक आहे. जी लोकशाहीला प्राधान्य देते आणि भारताचे सरन्यायाधीश जेव्हा अशा प्रकारची संवेदनशील वक्तव्ये करतात त्या वेळी या प्रकरणातील गांभीर्य अधिक प्रकर्षांने जाणवते.
– मोहिनी धुमाळ, विधि महाविद्यालय.

सरन्यायाधीश न्या. टी. एस. ठाकूर यांच्यासारख्या इतक्या महत्त्वाच्या पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीला बैठकीत बोलत असताना अश्रू अनावर होणे हे आपल्या देशाला खरेच लज्जास्पद आहे. १९८७ साली विधि आयोगाच्या अहवालात उल्लेखलेली न्यायाधीशांची गरज लोकसंख्येत जवळपास ३६ कोटींनी वाढ झाल्यावर त्याच प्रमाणात वाढली आहे. पण तरीही ती गरज पूर्ण करण्यात आपण एक देश म्हणून कमी पडलो. न्यायव्यवस्थेमध्ये न्यायाधीशांची इतकी कमतरता हे एकंदरच लोकशाहीच्या ढिसाळपणाचे द्योतक म्हणावे लागेल. सरन्यायाधीश ठाकूर यांनी ढाळलेले अश्रू हे फक्त चर्चेपुरते न राहता यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.
– सर्वेश जोशी, डहाणूकर महाविद्यालय.

भारताला सशक्त करणे हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे, मात्र यासाठी देशाची न्यायव्यवस्था सुदृढ असणे गरजेचे आहे. शासनाच्या कुचकामी धोरणामुळे न्यायव्यवस्थादेखील लंगडी झाली आहे. हे जरी खरे असले तरी सरन्यायाधीश ठाकूर यांच्या डोळ्यातील अश्रूमुळे सध्याच्या परिस्थितीची जाणीव होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच्या बैठकीमध्ये ठाकूर यांनी सध्याच्या न्यायव्यवस्थेवर प्रकाश टाकला. हजारो खटले आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. सर्वाना कायद्याचा धाक असायला हवा अशी अपेक्षा करताना न्यायव्यवस्था कुचकामी असेल तर नागरिकांनी काय करावे? ठाकूर यांनी सर्वासमोर अश्रू ढाळून आपल्या भावना मुक्त केल्या, मात्र गेली अनेक वर्षे अश्रू ढाळणाऱ्या हजारो लोकांचा वाली कोण?
– दीपाली कोकरे, मुंबई विद्यापीठ.

 

संकलन – मीनल गांगुर्डे