मागील दोन वर्षांपासून स्थगिती असलेल्या विद्यापीठांच्या सर्व प्राधिकरण निवडणुकीची पुन:सुरुवात या वर्षी पारित झालेल्या नवीन विद्यापीठ कायद्यामुळे झाली आहे. मुंबई, सोलापूर, औरंगाबाद सहित महाराष्ट्रातील विद्यापीठात यावर्षी सिनेट निवडणूक होणार आहे. मुंबई विद्यापीठात १ जून पासून सिनेट निवडणुकीसाठी पदवीधर नोंदणीची सुरुवात झाली असून निवडणूकचे बिगूल वाजले आहे. ३० जून ही नोंदणीची अंतिम मुदत असून सर्वच उमेदवार, राजकीय पक्ष, संघटना आपल्या विजयासाठी ओळखीच्या पदवीधरांची नोंदणी करताना दिसून येत आहेत. कोणत्याही विद्यापीठाच्या जडणघडणीत सिनेट सदस्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते, विद्यापीठाचा विकास आणि शिक्षणाचा दर्जा ठरवण्यात सिनेट सदस्य महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. कारण त्यांना थेट माजी विद्यार्थ्यांनी निवडून दिलेले असते आणि ते स्वत: माजी विद्यार्थी असतात त्यामुळे अशा सदस्यांना प्रश्नांची योग्य ती जाण असते. दर पाच वर्षांनी ही निवडणूक होत असते. जे विद्यार्थी पदवीधर आहेत आणि ज्यांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीत केली आहे, असेच माजी विद्यार्थी या निवडणुकीत मतदान करू शकतात. यावर्षी खासकरून मुंबई विद्यापीठात ही निवडणूक अटीतटीची आणि चुरशीची होणार आहे. कारण मुंबईमध्ये शिवसेना, मनसे, अभाविप आणि इतर सर्व पक्ष आपल्या संपूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात इतर राजकीय निवडणुकांप्रमाणे एक चुरशीची लढत मुंबई विद्य्पीठात पाहायला मिळणार आहे.