देशातील नामवंत संस्थांबरोबरच व्यवस्थापन शिक्षण घेतलेले विद्यार्थ्यांना बडय़ा पगाराच्या नोकरी मिळत असल्याचे नेहमीच पाहतो. पण पारंपरिक अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता कंपन्या थेट कॅम्पसमधूनच निवडू लागले आहेत. हे कॅम्पस इंटरव्यू विद्यार्थ्यांसाठी चांगल्या संधी घेऊन येत आहेत.

महाविद्यालयात अखेरच्या वर्षांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होता होताच नोकरीचे वेध लागू लागतात. आपल्या आवडीच्या क्षेत्रात व नामांकित संस्था, कंपनीमध्ये नोकरी करता यावी, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. नोकरी मिळवणे ही तशी तारेवरची कसरत असल्यानेच विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांत शिकत असतानाच यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांच्या या प्रयत्नांना आता महाविद्यालयेही आपल्यापरीने साथ देत आहेत. गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठांचे विविध विभाग तसेच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अखेरच्या वर्षांत शिकत असतानाच चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करणारे प्लेसमेंट विभाग कार्यरत असलेले दिसतात. विद्यार्थ्यांना नोकरीचे अधिकाधिक चांगले पर्याय उपलब्ध करून देणे, चांगल्या नामांकित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांची भेट घडवून आणणे, महाविद्यालयांमध्येच नोकरी मिळवून देणारी शिबिरे आयोजित करणे, यासाठी हे प्लेसमेंट विभाग काम करत असतात.
बी.एम.एम., आय.टी., फायनान्स, कॉम्प्यूटर सायन्स आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांबरोबरच बीए, बीकॉम, बीएस्सीसारख्या पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांंनाही शेवटच्या वर्षांत असतानाच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात व नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवणे आता सोपे झाले आहे. महाविद्यालयांमध्ये होणारे कॅम्पस इंटरव्ह्य़ू व प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंना चांगल्या पगाराच्या व नाविण्यपूर्ण कामाचा अनुभव देऊ करणाऱ्या नोकऱ्या मिळू लागल्या आहेत. बहुतांश महाविद्यालयांमध्ये आता अशाप्रकारचे प्लेसमेंट विभाग सुरु झाले असून त्यासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापकांची प्लेसमेंट समितीही नियुक्त केली जाते. व्यावसायिक कंपन्यामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये यावे यासाठी विभागाकडून सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट किंवा कॉर्पोरेट रेडिनेस प्रोग्राम यांसारखे विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. बायोडाटा कसा लिहावा, मुलाखतीला कसे सामोरे जावे तसेच व्यकतीमत्त्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे ज्ञानही यातून दिले जाते. याशिवाय अस्खलित इंग्रजी बोलता येण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही काही महाविद्यालयांमधून दिले जाते. यामुळे बँका, वि मा कंपन्या, बीपीओ, केपीओ, प्रसार माध्यमे यांच्यासह रिअल इस्टेट, पर्यटन व आरोग्य व्यवस्थापन, स्वयंसेवी संस्था अशा अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये महाविद्यालयांत कॅम्पस इंटरव्ह्य़ू घेतले जातात. यासाठी काहीवेळा विविध एजन्सींच्या माध्यमातून या कंपन्या महाविद्यालयांशी संपर्क साधत असतात. शेवटच्या वर्षांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची या मुलाखतींमधून निवड केली जाते. यंदाही महाविद्यालयांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्य़ू सुरु झाले असून काही ठिकाणी यातून विद्यार्थ्यांना नोकरीही मिळाली आहे. अभियोग्यता चाचणी, गटचर्चा, वैयक्तिक मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये ही प्रक्रीया पार पडत असते. यात सहभागी होण्यासाठी काही कंपन्यांनी पदवीच्या गुणांची अटही काही ठिकाणी ठेवलेली आहे. साधारणपणे ५५ ते ६० टक्क्यांच्या पुढे गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना यात प्राधान्य दिले जात आहे. याशिवाय इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या किंवा इंग्रजी भाषेतून संवाद साधू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना यात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळताना दिसत आहेत.