१३ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’ या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने बाजी मारली आहे. हा महोत्सव २२ ते २६ जानेवारी दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात संगीत, नृत्य, रंगभूमी, साहित्य व फाईन आर्ट या विभागांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी संगीत, नृत्य आणि रंगभूमी या विभागांतील स्पर्धामध्ये प्रथम क्रमांकाचे स्थान पटकवून मुंबई विद्यापीठाने ५९ गुणांची कमाई करीत अव्वल स्थान मिळवले आहे. या स्पर्धेमध्ये २० विद्यापीठे सहभागी झाली होती. तर ‘गोल्डन बॉय’ म्हणून मुंबई विद्यापीठातील डहाणूकर महाविद्यालयाचा यशोमन आपटे आणि ‘गोल्डन गर्ल’ म्हणून कुडाळ येथील एसआरएम महाविद्यालय तृप्ती दामले यांनी बाजी मारली. भारतीय संगीत, लोकसंगीत, एकपात्री, भित्तीपत्रक बनविणे, नक्कला, कोलाज या स्पर्धामध्ये प्रथम आणि साहित्य प्रश्नावली स्पर्धा, शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य यामध्ये द्वितीय तर पाश्चात्य नृत्य, भारतीय संगीत-गट, तालवाद्य, तालवाद्य व्यतिरिक्त इतर वाद्यवादन, मूक अभिनय या स्पर्धामध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या सहकार्याने आम्हाला हा विजयी पताका फडकावता आला असल्याचे विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिका डॉ. मनाली लोंढे यांनी सांगितले.

चिपळूणकर व्याख्यानमाला
रुईया महाविद्यालयाच्या मराठी विभागने आयोजित केलेल्या ‘विष्णूशास्त्री चिपळूणकर व्याख्यानमाले’त पहिल्या दिवशी २३ जानेवारी रोजी डॉ. बाळ फोंडके यांचे ‘अज्ञात आईन्स्टाईन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. लेझर तंत्रज्ञान, जी.पी.एस. प्रणाली, बारकोड प्रणाली, रेफ्रिजरेटर अशा अनेक तंत्रज्ञानामागे आईन्स्टाईनचा हातभार कसा लागला आहे, आईन्स्टाईनचे विविध क्षेत्रातील योगदान, त्यांचे भारताशी असलेले नाते, त्यांनी घेतलेली अणुबॉम्बविरोधी भूमिका असे आईन्स्टाईनच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलु डॉ. बाळ फोंडकें यांनी आपल्या भाषणात उलगडले. दुसऱ्या अभिजीत घोरपडे यांनी ‘पाण्या तुझा रंग कसा?’ या व्याख्यानात पाण्याचे विविध रंग उलगडले. तिसऱ्या दिवशी ‘आतंरराष्ट्रीय दहशतवाद’ या विषयावर बोलताना पत्रकार निळू दामले यांनी दहशतवादाची आतंरराष्ट्रीय व्याप्ती स्पष्ट केली.

कै.प्रा.ल.ग.जोग स्मृती व्याख्यानमाला
डी.जी.रुपारेल महाविद्यालयाच्यावतीने शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी कै.प्रा.ल.ग.जोग स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या व्याख्यानमालेमध्ये ज्येष्ठ मराठी साहित्यिक अरुण साधु हे ‘राजकारण आणि साहित्य’ या विषयावर संवाद साधणार आहेत. सदर व्याख्यानमाला महाविद्यालयाच्या ‘विज्ञान २’ सभागृहात सकाळी ११.३० वाजता सुरु होणार आहे.

व्यसनमुक्तीसाठी जनजागृती
वाढत्या व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी, तरूणांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सिद्धार्थ महाविद्यालयाने केलेल्या कार्याबद्दल यंदाचा राज्य सरकारचा ‘समाजकल्याण विभागा’कडून दिला जाणारा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ या महाविद्यालयाला जाहीर झाला आहे.
ग्रामीण भागात जाऊन व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत गावक ऱ्यांचे प्रबोधन करणे, ग्रामीण विकासात व्यसनमुक्ती हा विषय प्राधान्याने चर्चेत यावा यासाठी विद्यार्थी सतत प्रयत्नशील असतात. व्यसनमुक्ती विषयी पथनाटय़, व्याख्याने, शिबिरे, संदेश मोहिम याद्वारे प्रबोधन करत विद्यार्थ्यांनी गेल्या दोन वर्षांत जनजागृती करण्याचा विशेष प्रयत्न केला आहे. पनवेल येथे चार गावेही महाविद्यालयाने दत्तक घेतली असून तिथे ग्रामीण विकासाचे प्रकल्प राबवत असतानाच व्यसनमुक्तीसाठी गावकऱ्यांचे प्रबोधनही करण्यात येते.
खबऱ्या