मुंबई विद्यापीठाच्या १६०व्या वर्षमहोत्सवाच्या निमित्ताने कालिनाच्या प्रांगणात चार कोटी खर्च करून १५० फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला. विद्यापीठातील अडचणीची यादी या १५० फूट ध्वजस्तंभाहूनही अधिक उंच आहे. सद्य:परिस्थितीची जाणीव असताना आमच्या कुलगुरूंना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा चार कोटी खर्च करून देशात प्रथमच मुंबई विद्यापीठात ध्वजस्तंभ उभारण्याचा गाजावाजा करणे योग्य नाही. नेहमीप्रमाणे या महोत्सवातही विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, पाहुण्यांसाठी गेस्ट हाऊस सुरू करण्याची फक्त आश्वासनेच दिली गेली. त्यावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. मात्र ध्वजस्तंभ उभारण्यासाठी कसूर न करता तातडीने कृती करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी १५० फूट उंचीच्या ध्वजस्तंभाची आवश्यकता नाही. हाच निधी शैक्षणिक कामासाठी खर्च केले असते तर त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी झाला असता अशी तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

पहिली गोष्ट म्हणजे मुळातच मुंबई विद्यापीठाचे वसतिगृहे, अभ्यास केंद्रे सोडल्यास अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सुधारण्याची गरज आहे. येथील वर्ग, प्रसाधनगृह आणि सभागृह यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट झाली आहे. या सगळ्या गोष्टींवर पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे आणि तिथला एकूणच कारभारावर सुसंगती नाही. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त ध्वजस्तंभासाठी एवढा खर्च करणे योग्य नाही असे मला वाटते.

अथर्व चव्हाण, रुपारेल महाविद्यालय

मुंबई विद्यापीठाच्या १६०व्या वर्षमहोत्सवाचे औचित्य साधून १५० फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला. मात्र यापेक्षा विद्यार्थी आणि शैक्षणिक  बाबींसाठी पैसे खर्च करणे केव्हाही योग्य ठरले असते. मात्र कुलगुरूंचा हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नाही. आमचे देशावरील प्रेम आहे यासाठी चार कोटींचा खर्च करण्याची आवश्यकता नव्हती याऐवजी लहान ध्वजस्तंभ उभारला असता तरी चालले असते. मात्र विद्यापीठातील अनेक अनुत्तरित समस्या असतानाही चार कोटी यासाठी खर्च करणे योग्य नाही.

रुचिता भालेराव, एसएनडीटी विद्यापीठ

विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वायफाय सेवा सुरू करण्यात आली असली तरी अनेकदा यंत्रणा काम करीत नाही. त्यामुळे वायफाय सेवा दिल्याचे सांगितले जाते मात्र त्याबाबत तपासणी केली जात नाही. अनेकदा तक्रार देऊनही त्यात सुधारणा केली जात नाही. आधीच विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या मुद्दय़ांवरून वाद सुरू असताना इतका खर्च करणे योग्य नाही असेच मला वाटते.

सागर पवार, खालसा महाविद्यालय