गणेशोत्सव सुरू होण्याच्या महिनाभर आधीच मंडळांच्या उत्सवाला उधाण येते. ‘अवघे जग माझे घर’ या उक्तीप्रमाणे सर्व जगावर आपलेच ‘राज’ आहे, या आविर्भावात ध्वनिप्रदूषणाची पर्वा न करता ‘पारो’च्या तालावर धांगडधिंगा सुरू असतो, तर रस्त्यांवर मंडपाची आरास रचलेली असते. रस्ता हा वाहनांसाठी आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी आहे हे विसरून जणू काही मंडप बांधण्यासाठीच रस्त्याची बांधणी केली आहे, अशा मानसिकतेतून गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते पोलिसांसोबत वाद करीत असतात. मुंबईतील रस्ते हे खड्डेमय असताना मंडप बांधण्यासाठी खड्डे करणे आणि रस्ता अडवून वाहतुकीचा खोळंबा करणे ही गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत नाही. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी स्वत:वर आवर घालून रस्ते ही सार्वजनिक मालमत्ता आहे याचे भान असू द्यावे.

आणखी किती खड्डे करणार?

दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की मंडप उभारण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खणले जातात. आधीच रस्त्यांवर इतके खड्डे असताना आणखी किती खड्डे करणार? तर वाहतुकीचा विचार न करता रस्ताभर मंडप बांधले जातात. यामुळे वाहतुकीचे अनेक प्रश्न निर्माण होतात. गणेशोत्सव मंडळांमध्ये मंडप, गणपतीची मूर्ती, देखावा यांमध्ये स्पर्धा सुरू झाल्यापासून गणेशोत्सवाला महोत्सवाचे स्वरूप मिळाले आहे. गणेशोत्सवात रस्त्यावरून चालणे कठीण होते, तर लाऊडस्पीकरच्या मोठय़ा आवाजामुळेही त्रास होतो. सार्वजनिक मालमत्तेचा दुरुपयोग करणे हे योग्य नसून यामुळे उत्सवांमध्ये चुकीचा पायंडा पडत आहे.

प्राजक्ता धुमाळे, मुंबई विद्यापी

अडथळ्यांची शर्यत

सध्या मुंबईत गणेशोत्सव मंडळाची संख्या प्रचंड वाढली आहे. यामुळे गणेशमूर्ती स्थापना करण्यासाठी जागेची कमतरता भासत आहे. प्रत्येक गल्लीबोळ्यात गणपती साजरा केला जातो आणि त्यामुळेच रस्त्यांवर मंडप मांडण्याशिवाय या मंडळाकडे पर्याय उपलब्ध नसतो. या सगळ्या प्रकारामुळे वाहतुकीला तर अडथळा निर्माण होतो पण खड्डेही पडतात. उत्सवानंतर ही खड्डे बुजवले न गेल्याने पावसाळ्यात त्याची परिस्थिती अधिक बिकट होते. तसेच सध्या आगमन सोहळा, पाटपूजन, पाद्यपूजन अशा सगळ्या प्रकारांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो, हा वेगळाच त्यामुळे उत्सव साजरा अशा प्रकारे करावा जेणेकरून त्याचा धोका नागरी संपत्तीला पोहोचणार नाही.

निशा चव्हाण, रुपारेल महाविद्यालय

सण नियमांत हवेत

नागरी संपत्तीची नासधूस करून आणि ज्यामुळे शहरी वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होईल अशा प्रकारे आपण उत्सव साजरे करूच नये. आपणच नियम नस पाळता उत्सव साजरा करतो आणि त्यावर न्यायपालिकेने र्निबध लावल्यानंतर आपण त्याचा विरोध करतो, यासाठी आपणच जर नियमात राहून सण साजरा केला तर ही परिस्थिती उद्भवणार नाही.

पूजा पाटील, साठय़े महाविद्यालय