नवरात्रीचा उत्सव नवलाईचा. रोज नव्याने अवतरणारा. वेशभूषा, रंगभूषा आणि दागिन्यांनी सजून तरुणाई जणू नयनोत्सवच साजरा करीत असते. विविध महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये सध्या ‘गरबा’ आणि ‘दांडिया नाइट’ होत आहेत. गरब्यातील विशेष आकर्षण म्हणजे कपडे. भारतीय संस्कृतीचा नव्याने आविष्कार नृत्यातून करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही महिन्यांपासून धडे घेण्यास सुरुवात केली होती आणि आता काही जण कपडय़ांची तयारी करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरजरी साज

‘संकल्पनांवर आधारित ‘गरबा नाइट’ महाविद्यालयांमध्ये आहेत. अनेकांचा पेहराव त्याच ढंगाचा असतो. काहींनी कपडे खरेदी न करता घरात कपाटात पडून असलेल्या कपडय़ांचे ‘फ्यूजन’ साधले आहे. यातून वेगळं दिसणं हा उद्देश साधला गेलाय’. ‘अप्रा’च्या स्टाइल डिझायनर संस्थेच्या प्राजक्ता आणि अश्विनी सांगतात. भरजरी घागरा वर्षांतून एकदाच परिधान केला जातो. यासाठी साडी हा उत्तम पर्याय असतो, असे प्राजक्ता म्हणाल्या. जुनंच आहे, पण नव्याने दिसण्याचा प्रयत्न असेल तर काठापदराची साडी घागरा म्हणून नेसता येते. त्यावर भरजरी जामेवार कापडाचा दुपट्टा, याशिवाय साडीच्या घागऱ्यावर पूर्ण लांबीचे जॅकेटही उत्तम पर्याय असेल. गरबा मराठी असतो. ही संकल्पना त्यात आताशा रूढ झाली आहे. पाश्चिमात्य गरबा कपडय़ांमधून दिसतो. जीन्स आणि केडिया स्वरूपाचा टॉप नजाकतदार पर्याय आहे. यात तरुण आणि तरुणींसाठी पर्याय आहेत. मुलांसाठी जॅकेट उपलब्ध आहेत. मराठी गरब्यात दागिन्यांचा आविष्कार तितकाच महत्त्वाचा आहे. यात केवळ जाडदार ठुशी घालण्याचा पर्याय मुलींसाठी आहे, असे अश्विनी यांनी सांगितले. वेगळं दिसणं आहेच, पण त्यासोबत आत्मविश्वासही मिळतो, असेही त्या म्हणाल्या.

केशरचना

केशरचना हा तितकाच महत्त्वाचा घटक आहे. केसांची बांधणी आणि त्यांना व्यक्तिमत्त्वानुसार आकार दिल्यास उठावदार व्यक्तिमत्त्व दिसेल. केशरचनाकार वा ब्युटी पार्लर नवरात्रीच्या काळात ‘गरबा लुक’साठी सवलती देतात. त्यामुळे जर शक्य असल्यास अशा सवलतींचा फायदा घेता येईल.

पदलालित्य

उठावदार दिसण्यातच सर्व काही सामावलेले नाही. नृत्य हा त्याचा अविभाज्य भाग आहे. दांडियाच्या आणि रास गरब्याचे पदलालित्य शिकून घेणे आवश्यक आहे. ते जमल्यास अनेकांना त्याची भुरळ पडेल. गरबा नृत्य शिकवण्या सध्या सुरू आहेत. यातील पदलालित्य शिकण्यासाठी सध्या ‘यूटय़ूब’सारखा अन्य दुसरा पर्याय नाही. बदलत्या संगीतानुसार नृत्याच्या अदा बदलल्यास त्यात दर वेळी नावीन्य तयार करता येईल.

ताल – नृत्य

  • सोम्मया महाविद्यालय, विद्याविहार
  • पोद्दार महाविद्यालय, माटुंगा
  • विद्यालंकार महाविद्यालय, वडाळा
  • मुंबई विद्यापीठ पत्रकारिता विभाग, कलिना

महाविद्यालयात गरबा नाही, पण बाहेरील आयोजनात सहभागी होण्याचा विचार आहे. तिथे मित्र-मैत्रिणी असतीलच. नृत्याचे धडे घेतलेच आहेत. पहिल्यांदाच गरबा आयोजनात जात असल्याने उत्साह आहे. मराठी गरब्याला साजेल अशा पेहरावावर भर आहे.

निशा चव्हाण, रुपारेल महाविद्यालय.

तांत्रिक महाविद्यालयात शिकत असल्याने गरब्यात सहभागी झाले नाही. यंदा मात्र काही तरी नवीन करण्याचा इरादा आहे. घरातील जुन्याच कपडय़ांमधून वेशभूषा तयार करायचा विचार आहे.

 – भारती मोरे, विद्यालंकार महाविद्यालय.

पत्रकारिता विभागात दर वर्षीच गरब्याची धूम असते. मात्र गरब्यापेक्षा कोजागरी पौर्णिमा आम्ही मोठय़ा स्वरूपात साजरी करीत असल्याने त्यासाठीच्या तयारीला मी लागली आहे. यासाठी पारंपरिकतेवर माझा भर असून साडीला प्रथम प्राधान्य आहे.

प्राची सोनवणे, मुंबई विद्यापीठ

मराठीतील सर्व कॅम्पसकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri 2017 college campus dandiya
First published on: 23-09-2017 at 02:53 IST