वर्षांनुवर्षे परीक्षा काळातच नवरात्र येते. त्यामुळे ना धड आनंद, ना अभ्यास अशा विचित्र कोंडीत विद्यार्थी सापडतात. रात्री अभ्यासाला बसले तरी गरब्याच्या ढोलांनी मनाची स्थिरता भंगते आणि पायात रासदांडियाचा ताल फेर धरू लागतो. ‘बाहेर जावे की जाऊ नये’ प्रश्नाने विद्यार्थ्यांचा छळवाद मांडलेला असतो. गरबा खेळायला जाण्याची तीव्र इच्छा असतानाही घरातल्यांच्या एका जळजळीत कटाक्षाने उत्साह मावळून जातो. ‘परीक्षा नेमक्या नवरात्रात का बरे असतात’, ‘विद्यापीठाला निषेधाचे पत्र पाठवायला हवे’ असे अनेक तर्कवितर्क करीत गरब्याला जाण्याचे मार्ग शोधले जातात आणि त्यात गेल्या वर्षीपासून परीक्षांचा कालावधी कमी झाल्यामुळे एरवी २०-२५ दिवस चालणाऱ्या परीक्षा यंदा १० ते १२ दिवसांत संपत आहेत. त्यामुळे परीक्षा सांभाळून गरबा खेळण्यासाठी काय करता येईल, आई-बाबांना कसे वळवायचे असे प्रयत्न सुरू आहेत.

काही विद्यार्थ्यांनी तर विषय आणि गरब्याचे वेळापत्रकच तयार केले आहे. आतापासून अभ्यासाला सुरुवात करून नवरात्रीपर्यंत कठीण विषयांचा अभ्यास पूर्ण करून नवरात्रीत एकदा उजळणी करण्याचे ठरविले जात आहे. तर सोप्या विषयाची परीक्षा असेल त्याच्या आधीच्या रात्री गरबा खेळायचे नियोजन सुरू आहे. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आता अभ्यासाला लागले असून येत्या नवरात्रात परीक्षा असतानाही गरबा आणि दांडिया दणक्यात खेळला जाणार आहे.

शाळेपासून महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षांपर्यंत नेहमीच नवरात्रोत्सवात परीक्षा यायची. सध्या मी शेवटच्या वर्षांला आहे, त्यामुळे आमची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. असे जरी असले तरी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रकल्प तयार करून शिक्षकांना द्यायचा आहे. मात्र इतर वर्षांच्या तुलनेत या वर्षीच्या नवरात्रात माझ्या डोक्याला परीक्षेचे टेंशन नाही याचा आनंद आहे. गेल्या अनेक वर्षांतही मी अभ्यासाचे गणित लक्षात घेऊन गरबा खेळला आहे. सोप्या विषयाचा पेपर असेल तेव्हा गरबा खेळायला नक्की जात होते. एक दिन तो बनता है असे म्हणज आम्ही नऊ दिवसातील किमान पाच दिवस तरी गरबा खेळायला जात होतो. वर्षांतील केवळ नऊ दिवस गरबा खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे मैदानात गरबा सुरू झाला की पाय आपोआप नाचायला लागतात.

वृषाली गांवकर, डहाणूकर महाविद्यालय.

मी दरवर्षी नवरात्रोत्सवात गरबा खेळायला जाते. परीक्षा असली तरी दिवसभर अभ्यास करून रात्री मनसोक्त गरबा खेळायला जाते. मी ठाण्याला वसंत विला विहारमध्ये राहते. गेल्या वर्षी माझी परीक्षा सकाळची होती. त्यामुळे सकाळी पेपर दिल्यावर साधारण ११ वाजता मी अभ्यासाला बसायचे आणि संध्याकाळी ७ पर्यंत उजळणी करून ८ वाजता गरबा खेळण्यासाठी तयार असायचे. दोन तास मनसोक्त गरबा खेळला की पुढच्या पेपरसाठी मी तयार राहायचे. हेच मी या वर्षीही करणार आहे. अनेकदा माझ्या अनेक मैत्रिणी नवरात्रात घराबाहेर न पडता शांतपणे अभ्यास करतात. मात्र मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक नवरात्र खूप आनंदाने घालवली आहे आणि अभ्यास सांभाळून गरबा खेळायला आई-बाबांनीही कधी विरोध केला नाही, याचा जास्त आनंद आहे.

तेजश्री शिंदेरचना संसद महाविद्यालय 

नवरात्रीतील हे नऊ दिवस खूप धम्माल असते. मी एसएनडीटी विद्यापीठात शिकते, त्यामुळे आम्ही सर्व मुली एकत्र येऊन गरबा खेळतो. महाविद्यालयातील आणि शेजारील मित्रमैत्रिणी एकत्र गरबा खेळायला जातो. गरबा हे नृत्य तुम्हाला वेगळ्यात विश्वात घेऊन जाते. संगीताची लय जशजशी वाढत जाते, तसतसे तुम्ही त्यात आणखी खोल शिरता. वय, लिंग, जात, धर्म सर्वकाही विसरून सर्व जण एकत्र येऊन नाचतात आणि खूप मजा-मस्ती करतात. परीक्षा असली तरी त्यातून वेळ काढून गरबा खेळला जातो.

श्रद्धा भालेराव, एसएनडीटी विद्यापीठ

गरबा खेळायला जायचे नाही असा निश्चय करूनही रात्री पाय आपोआप घराबाहेर पडतात. त्यात चौकाचौकावर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ असल्यामुळे रात्री अभ्यासाला बसताना ढोलाचे आवाज कानावर पडत असतात. अशा परिस्थितीत अभ्यास होणे कठीण असते. त्यामुळे परीक्षा सुरू होण्यापूर्वी अभ्यास करून नवरात्रात गरबा खेळला जातो. या वेळी नातेवाईक, मित्रमैत्रिणी एकत्र येऊन आनंदाने हा सण साजरा करतात.

निशा बागडीचेतना महाविद्यालय