कॉलेजमध्ये मिळणाऱ्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना इतिहास, अर्थशास्त्र, गणिती सिद्धांत तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवर वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळत असते. अशा प्रकारचे शिक्षण परीक्षेला मिळणाऱ्या गुणांसाठी महत्त्वपूर्ण ठरतेच. तरी जगताना पुस्तकाच्या बाहेर मिळणारा अनुभव माणसाला समृद्ध करीत असतो. त्यामुळे कॉलेजमध्ये शिकत असताना अनेक मुले पुस्तकी किडा राहण्यापलीकडे आपल्या अनुभवाचा परीघ उंचाविण्यासाठी भ्रमंती करीत असतात. पावसाळ्यात कॉलेज सुरू झाले की वेगवेगळ्या सणांची मांदियाळी सुरू होते. त्याबरोबरच जाती-धर्माच्या पलीकडे माणसातील माणुसकीला जागवणारा, लहानथोरांना ‘माऊली’ म्हणजेच ‘आई’ म्हणून संबोधणाऱ्या आषाढ शुद्ध एकादशीच्या सोहळ्याची चाहूल लागते. ‘फॉरवर्ड’ विचारांचे म्हणून हिणवले जात असताना आजही अनेक ‘कॉलेजिअन्स’ वारीची आतुरतेने वाट बघत असतात. कॉलेज आणि तासांचे गणित सांभाळून ही मुले पांडुरंगाच्या भक्तांबरोबर नवा अध्याय शिकण्यासाठी तर काही मुले आपल्या घरची परंपरा पाळण्यासाठी गेली अनेक वर्षे पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. वारीच्या दरम्यान महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून गरीब-श्रीमंत सर्व स्तरांवरील लोक आनंदाने सामील होतात. या वारकऱ्यांमधील एकोपा आणि दरीखोऱ्यातील निसर्ग अनुभवण्यासाठी कॉलेजमधील वारकरीही वारीमध्ये सामील होत आहेत. तर बोला.. ‘पुंडलिक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा हरिनामाचा गजर विद्यार्थ्यांच्या मुखातूनही ऐकू येत आहे..

संत साहित्याच्या खोलात शिरण्याची संधी म्हणजे ‘वारी’

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Record Number of Students Register for MHTCET
अभियांत्रिकी, औषधनिर्माण प्रवेशासाठी स्पर्धा, सीईटीसाठी किती विद्यार्थ्यांची नोंदणी?
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव

महाविद्यालयात मराठी साहित्याचा अभ्यास करीत असताना वारकरी संप्रदाय अभ्यासाचा विषय म्हणून समोर आला आणि त्याचा अभ्यास करीत असताना हळूहळू माझ्याही ओठांवर भारूड आणि भजनांनी ठेका धरला. लहानपणापासून शाळेमध्ये आषाढीला दिंडी आयोजित केली जात होती. कुणी विठ्ठल तर कुणी रुक्मिणीच्या कपडय़ांमध्ये मिरवताना मजा येत होती. मात्र वारीहा विषय फक्त दिंडीपूरता सीमित नसून त्यामागे संत वाङ्मयाची मोठी परंपरा आहे हे हा विषय अभ्यासताना कळले. हा अभ्यास करताना आपसूकच नाथांच्या भारुडांशी माझं वेगळ नातं तयार झालं. तर तुकोबा आणि ज्ञानोबांच्या साहित्याचे अभ्यास करताना जीवनाच्या समीकरणाबरोबर देव, निसर्ग या विषयांबद्दल माझ्या मनातील गुंता हळूहळू सुटत गेला. त्यामुळे ‘याचा देही याची डोळा’ दर्शन व्हावे यासाठी मी आणि दोन मित्र या वर्षी वारीला जाणार आहोत. आज पंढरीची वारी करण्यामागे भक्ती हाच एकमेव उद्देश नसून अभ्यासाच्या दृष्टीने, काही नवीन जाणून घेण्याच्या इच्छेनेही ही वारी अर्थपूर्ण ठरणार आहे. कारण मराठी साहित्यातील सर्वाधिक वाङ्मय रचना ही वारकरी संप्रदायाची आहे. तसेच गुरुशिष्य परंपरा, संप्रदायाची शिकवण, शिस्त, अभंगातील उपदेश, भारुडातील मार्मिक चपराक आणि एकंदरच संत वाङ्मय हे चिरकाळ टिकणारं आहे. ज्याला संसार आणि परमार्थ यांच्यामधील गमक उलगडले तो वारकरी. असं बरंच ज्ञान या संप्रदायाने मला दिलं. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संप्रदाय, पंथ निर्माण झाले, काळानुसार लोप पावले. गेली अनेक वर्षे इतर वारकऱ्यांकडून ऐकलेला अनुभव स्वत: पाहण्याची संधी मिळणार आहे. मित्रांच्या सोबतीने सुरू झालेली वारीमुळे अनुभवांचे दार उघडे केले आहे.

रूईया महाविद्यालय, मुकुंद पाबाळे आणि निलेश अडसूळ

वारीमुळे समृद्ध झालो..!

आमच्या घरात वारकऱ्यांची परंपरा आहे. माझ्या आजीने अनेक वर्षे वारी केली. माझे चुलते शामराव रायकर यांनी गेली दहा वर्षे वारी केली. त्यांच्या गेल्यानंतर पुढे नकळत हा पांडुरंग भक्तीचा वारसा माझ्याकडे आला. मज्जा-मस्ती करणारी, भटकंती करणारी, खेळणारी माझी पाऊले विठ्ठल मंदिराकडे वळू लागली. शिप्पुर या गावी महाशिवरात्रीनिमित्त ‘अखंड हरिनाम सप्ताह’ असतो. यामळे पांडुरंगाशी थोडं नातं जुळलं. दोन वर्र्षांपूर्वी मी प्रथम वारीसाठी गेलो. महाविद्यालयाचे शिक्षण घेत असताना वारीला जाणे हा अनुभव समृद्ध करणारा होता. वारीमध्ये दिवसभर चालल्यानंतर रात्रभर भजन करणं हा माझा आवडीचा छंद झाला. यामध्ये तबला वादनही शिकलो. वारीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून वारकरी भक्तीभावाने सहभाग घेत आहेत. दिवसा माऊलीचे नामस्मरण करीत चालत राहायचे आणि विश्रांती घेताना कोणाच्याही शेजारी जाऊन जेवायला बसायचे. मात्र या वेळी तुम्हाला कोणीच हटकणार नाही. माऊली घ्या म्हणत त्यांच्यांकडे असलेली कांदा-भाकरी तुमच्या झोळीत दिली जाते.  आध्यात्मिकतेबरोबरच वारीमधील अनोळखी माणसांमधील घट्ट नाते पाहाता आले. यांमधील अनेक जण फक्त वारीच्या काळात एकमेकांना भेटत असतील, मात्र वर्षांच्या दुराव्यानंतरही त्यांच्यामधील एकोपा भारावणारा होता. देहू ते पंढरपूर या अद्भुत अनुभवामुळे खूप संपन्न झाल्यासारखे वाटले. कोणत्या दिवशी कुठे पोचायचं, कुठे विश्रांती करायची हे पूर्वनियोजित असतं आणि ते तितक्याच शिस्तप्रियपणे पार पाडले जाते. स्त्री-पुरुष, लहानथोर सगळेच या वारीत सहभागी होतात. ‘सकळासी इथे आहे अधिकार’ याप्रमाणे सर्वजण पांडुरंगाच्या भेटीसाठी चालत असतात. सकाळी सुरू झालेली िदडी चालत चालत हरिपाठ, अभंग, ज्ञानोबा-तुकाराम, राधा-कृष्ण-राधा ही भजने म्हणत सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत हा नामयज्ञ सुरू राहतो. रात्री एखाद्या ठिकाणी विश्रांती. पुन्हा दुसऱ्या दिवशी हा नामयज्ञ. हा दिनक्रम आचरत दहा ते बारा दिवसांत पंढरपुरात िदडी पोहोचते. रांग लावून विठोबाचे दर्शन घेऊन भरल्या मनानं माघारी यावं लागतं. पण घरी येण्यापेक्षा िदडीत आणि पंढरपुरातंच राहावं असं वाटतं. दोन वर्षे आलेला हा अनुभव सुखद व लाभदायक होता. वारीमध्ये मिळणाऱ्या अनुभवाबद्दल मी माझ्या कॉलेज मित्रमत्रिणींना नेहमी सांगतो. काहींना ते ऐकून वारीला जाण्याचा मोह झाला आहे. पण बऱ्याच जणांना ते आऊटडेटेड किंवा अडाणीपणाचे वाटते. तरुण मुला-मुलींची अशी मानसिकता असते की, हे आमच्या प्रोफेशनला हे शोभत नाही. परंतु अशा लोकांना सांगणं गरजेचं वाटतं की, ज्ञानेश्वरांनी तरुणपणात ज्ञानेश्वरी लिहिली आणि ही ज्ञानेश्वरी देवांचे महत्त्व सांगत नाही तर आयुष्याचे तत्त्वज्ञान सांगते.  माणसाने भौतिक जगातून आत्मिक विश्वात काढलेली सहल असते. वारी म्हणजे आत्माचा परमात्म्याकडे होणारा प्रवास असतो. वारीतून शिस्त शिकायला मिळते. पहाटे लवकर उठून स्नान करणे, रांगेतून चालणे अशा अनेक चांगल्या सवयी वारीमध्ये आत्मसात केल्या जातात. वारीत कुठलेही आरक्षण नसते, तेथे जात-धर्म न पाहता तुम्हाला माऊली म्हणून हाक मारली जाते. या मनाच्या निर्मळतेमुळे तुम्हाला ही अद्वैतत्त्वाचा अनुभव येतो. तुमच्यातला ज्ञानेश्वर जागा होतो. आणि तुम्हीही विश्वाच्या कल्याणासाठी विश्वात्मक, विश्वनाथ, विश्वंभरा अशा विठ्ठलाकडे पसायदान मागता. खरंच माझ्या दोन वर्षांच्या वारीच्या अनुभवामुळे मला खूप शिकायला मिळाले. यावर्षी माझे महाविद्यालयातील मित्रही माझ्यासोबत सहभागी होणार आहे. त्यामुळे नक्कीच आमचा आनंद द्विगुणित होईल यात शंका नाही.

नितेश रायकर, महर्षी दयानंद महाविद्यालय