कागदाच्या फटाक्याचा वापर

दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण मानला जातो, पण पारंपरिक पद्धतीने दिवाळी हा सण साजरा करण्याऐवजी आता तो साजरा करण्याचे स्वरूप बदलले आहे. पण मी माझ्या वैयक्तिक स्तरावर पर्यावरणाला हानी न पोहचवता दिवाळी साजरी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. यावर्षीही हा प्रयत्न राहणार असून स्फोट होऊन कागदाचे तुकडे उडवणारा फटाक्याचा प्रकार मी खरेदी केला आहे. ज्यामुळे फटाके फोडण्याची हौस पूर्ण होईल आणि पर्यावरणालाही हानी पोहचणार नाही.

सिद्धी वेंगुर्लेकर, विद्यालंकार महाविद्यालय.

पर्यावरणस्नेही वस्तूंचा अभाव

पर्यावरणपूरक पद्धतीने आपण सण साजरे करायचे म्हणतो, पण आपण बाजारात गेल्यावर आज कोणत्याही प्रकारे पर्यावरणस्नेहाच्या दृष्टीने पूरक अशा वस्तू बाजारात सहज उपलब्ध नसतात. दिवाळी सणात फटाक्यांची मागणी पाहता भरपूर आवाज, धूर निर्माण करणाऱ्या फटाक्यांची मागणी जास्त असते, म्हणून मी जरी माझ्या बाजूने दिवाळसण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार केला तरी आजूबाजूचा समाज हा पर्यावरणास घातक ठरेल अशा पद्धतीनेच तो साजरा करणार, त्यामुळे यासाठी मोठय़ा प्रमाणात समाजप्रबोधनाची गरज आहे.

 निकिता सुर्वे, सरदार वल्लभभाई पटेल तांत्रिक महाविद्यालय.

पर्याय उपलब्ध पण मागणी नाही

दिवाळी सणात सगळ्यात पर्यावरणास घातक गोष्ट म्हणजे फटाके. तरी आज बाजारात पर्यावरणस्नेही फटाके उपलब्ध आहेत, पण त्यांची मागणी फार नाही. शिवाय ते सहज उपलब्धही होत नाहीत. या सगळ्याच कारणामुळे मी बाजरात नेहमी उपलब्ध असणारे फटाकेच खरेदी करतो.

– अभिषेक पाष्टे, आंबेडकर महाविद्यालय.

निर्णयाचे स्वागत

काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी घेतलेला फटाक्याचा कचरा केल्यास दंड आकारण्याचा निर्णय मला पटला आहे. किमान या कारणाने तरी लोक कमी फटाके घेतील अशी आशा वाटते आणि घेतले तर त्यांचा कचरा स्वत:च उचलून परिसर पुन्हा नव्यासारखा स्वच्छही करतील. पण या निर्णयावर कडक कारवाई होणेही अपेक्षित आहे, तरच समाजात थोडी जागृतता निर्माण होईल.

– तुषार मांडवकर, कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय.