महाराष्ट्रातील अनेक भागांतील धरणांतील पाण्याने तळ गाठला आहे. सांगलीचे पाणी लातूरला रेल्वेच्या माध्यमातून नेले जात आहे. मात्र अशा गंभीर परिस्थितीत आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांसाठी ६० लाख लिटर पाण्याची उधळपट्टी करण्याची गरज नसून उच्च न्यायालयानेही आयपीएल महत्त्वाचे की लोक अशा प्रश्न विचारत या स्पर्धेसाठी लाखो लिटर पाणी खर्च करण्यावर नाराजी दर्शविली. पाणी या घडीला अत्यंत महत्त्वाची बाब ठरली आहे. त्यामुळे ती पुरवूनच वापरणे गरजे आहे, असे सांगत पाण्याची नासाडी करण्यापेक्षा आयपीएलचे सामने दुष्काळी परिस्थितीत घेतले जाऊ नये, असे मत विद्यार्थ्यांनी मांडले.

या वर्षीचा दुष्काळ अतिशय भीषण असून महाराष्ट्रातील जिल्हय़ांमध्ये पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाले आहे. गावातील विहीर ओस पडल्या असताना मुंबईत मात्र वेगवेगळ्या कारणांसाठी पाण्याची नासाडी केली जाते. सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या सामन्यांसाठी मोठय़ा प्रमाणात खर्च करीत आहे. क्रिकेटच्या मैदानात पाण्याचे फवारे मारले जातात. क्रिकेट सामन्यांच्या काळात कोटींमध्ये खर्च करण्याची गरज नाही. दुष्काळी भागात पाण्याची सोय करण्याऐवजी क्रिकेट सामन्यांसाठी खर्च करणे योग्य नाही. तर क्रिकेट संघटना आणि क्रिकेट संघाच्या मालकांनी पुढाकार घेऊन दुष्काळी परिस्थितीत क्रिकेट सामने रद्द करण्याची गरज आहे.
-अरुण शिंदे, जोशी बेडेकर महाविद्यालय

१९७२ च्या वेळेच्या दुष्काळाची तुलना या वर्षीच्या दुष्काळाशी केली जात आहे. गावांमध्ये पाणी नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. पाणी नसल्यामुळे शेती तर नाहीच मात्र इतर कुठलाच उद्योग करणे शक्य नाही. अशी परिस्थिती असताना क्रिकेटच्या सामन्यांसाठी कोटींमध्ये खर्च करणे योग्य नाही. आयपीएलसाठी सुमारे ५०० कोटी रुपये खर्च केला आहे आणि दुष्काळी भागात पाण्याशिवाय शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे. या मुद्दय़ावर न्यायालयाने राज्य शासनाचे चांगले कान उपटले आहे. खेळपट्टी तयार करण्यासाठी ६० लिटर पाण्याची गरज लागते. आयपीएलचे सात सामने हे वानखडे स्टेडियमवर खेळले जाणार आहे. या सामन्यासाठी खेळपट्टी तयार करण्यासाठी ४० लाख लिटर पाणी लागणार आहे. आम्ही पाणी विकत घेतो आणि पाण्याच अपव्यय होऊ नये यासाठी आम्ही तोडगा काढणार असल्याचे स्टेडियमकडून सांगण्यात आले आहे. मात्र गरजूंना पाण्याची मदत करण्यापेक्षा क्रिकेटच्या सामन्यांसाठी खर्च करणे हा शेतकऱ्यांवर आणि सर्वच दुष्काळग्रस्तांवर अन्याय आहे.
-सागर नेवरेकर, साठय़े महाविद्यालय

आपण पाणी निर्माण करू शकत नाही परंतु आपल्याकडे असलेल्या पाणी साठय़ाचा योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. लातूर जिल्हय़ामध्ये रेल्वेने पाणी पोहोचवावे लागते. असे असताना महाराष्ट्रात आयपीएलच्या सामन्यांसाठी पाण्याचा वापर करणे चुकीचे आहे. किमान दुष्काळी परिस्थिती असताना तरी आयपीएल सामने आयोजित केले जाऊ नयेत. जरी आयपीएलसाठी बीसीसीआय खर्च करीत असले तरी कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला मराठवाडय़ातील पाण्यासाठी चाललेली वणवण पाहून आयपीएलसाठी होणारा पाण्याचा वापर चुकीचा वाटेल.
-कीर्ती भोईटे, विधी महाविद्यालय

क्रिकेटच्या सामन्यांसाठी मैदानावर पाण्याचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. त्याहीपेक्षा क्रिकेट सामन्यासाठी तिकिटांच्या किमतीही खूप जास्त असतात. आयपीएलच्या सामन्यांच्या वेळी बॅटिंग लावणाऱ्या मंडळी पुढे सरसावतात. क्रिकेट हा एक खेळ म्हणून त्याला विरोध करणे योग्य नाही. परंतु किमान महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहता क्रिकेट सामन्यांसाठी होणारा खर्च थांबविण्याची गरज आहे. वानखेडे स्टेडिअमवर आयपीएलचे काही सामने होणार आहे. मुंबईत पाणीपुरवठा असला तरी मुंबई उपनगरात पाणीटंचाई आहे. शासनाने आधी जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्यात. त्यानंतर आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांना पाठिंबा द्यावा.
-अमृता राऊत, डी.जी.रुपारेल महाविद्यालय