मोर्चा आणि आंदोलनाचा बडगा उगारून आता मराठा समाजही आरक्षणासाठी उभा राहिला आहे. मुळात उच्च कुळातील लढाऊ समजल्या जाणाऱ्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय, असा प्रश्न सर्वसमाजातून विचारला जात आहे. आरक्षण मिळून मराठा समाजातील प्रश्न सुटतील का? की प्रत्येकाला आरक्षण देऊन आपण समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे अनेक प्रश्न मराठा समाजातील मुलांकडून विचारले जात आहे. मात्र सध्या मराठा आरक्षण हा विषय राजकीय हेतुपूरता सीमित राहिला आहे.

सर्व बाजूंनी विचार करायला हवा

महाराष्ट्रात इतक्या जाती-जमाती आहेत, प्रत्येकाने जर आरक्षण मागितले मग काय राज्यात भीषण परिस्थिती निर्माण होईल. यापूर्वी धनगर समाजानेही आरक्षणासाठी आंदोलने केली होती. यापूर्वीही मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलने आणि मोर्चे उभे केले होते. आता पुन्हा सर्वाचे लक्ष मराठा आरक्षण मोर्चाकडे लागले आहे. पण खरच मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे का? आरक्षण मिळून प्रश्न सुटणार नाही. उलट त्यामुळे मराठा समाज मिळालेल्या १६ टक्क्यांमध्ये अडकून पडेल. आरक्षणाव्यतिरिक्त या समाजातील अनेक प्रश्न आणि समस्यांचे निराकरण झालेले नाही.

– आनंदी आंब्रूले, साठय़े महाविद्यालय

 

सर्व धर्म समभाव आहे तरी कुठे?

मुळातच मराठा आरक्षणाची गरज सद्य:स्थितीत अधिक आहे. कारण मराठा समाजातील लोकांवर विशेषत: विद्यार्थ्यांवर अन्याय होताना दिसतो. सगळीच मूल हुशार असतात पण आरक्षणाच्या वाटेवरून जाताना मराठा समाजातील मुलांना आडवाटेनेच जावे लागते. प्रवेश प्रक्रिया होत असताना चांगले गुण असूनही त्यांना योग्य ते महाविद्यालय केवळ आरक्षणामुळे मिळत नाही आणि सर्वधर्मसमभाव असे जर आपण म्हणत असू तर तो या प्रकरणात कुठेही पाहायला मिळत नाही. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय राजघटनेत फक्त ५० टक्के जातीनिहाय आरक्षणाला मान्यता आहे. त्यामुळे आधीच मागास जातींना आणि स्त्रियांना आरक्षण दिल्यामुळे तो कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत शासनाला योग्य तो निर्णय घ्यावाच लागणार आहे.

– निशा चव्हाण, रुपारेल महाविद्यालय

 

राजकारण नको

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यात काही शंका नाही, पण त्यात राजकारण्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेता काम नये. आता एकूण चाललेल्या परिस्थितीवरून यात कोणत्याही राजकीय नेता सक्रियपणे सहभागी नाही. पण ही स्थिती शेवटपर्यंत तशीच राहणार का याबद्दल शंका आहे. नाही तर निवडणुकीच्या तोंडावर आरोप प्रत्यारोप करण्यात यांचा वेळ जाईल आणि मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष होईल. तसेच आरक्षणाबाबत राबविण्यात येणारे मूक मोच्रे असेच चालू राहिले तर नक्कीच यश हातात येईल.

– दीप्ती बाडकी, एसपीआयटी तांत्रिक महाविद्यालय