मुंबईतील अनेक महाविद्यालये आता ‘वायफाय’युक्त आहेत. समाजमाध्यमांमधून महाविद्यालयीन तरुणाई दर सेकंदाला एकमेकांच्या संपर्कात असते. इंटरनेटमुळे आज अनेक गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहेत. ‘यू-टय़ूब’च्या माध्यमातून प्रत्येक जण कला आणि काम जगभर पोहोचवत आहे. मोबाइलचा वापर कमालीचा वाढला आहे. इंटरनेटची सुविधा विशेषकरून ‘वायफाय’च्या माध्यमातून मिळत आहे. त्याचा वापर महाविद्यालयांमधूनही मोठय़ा प्रमाणावर होताना दिसत आहे. परंतु विद्यार्थ्यांनी मोबाइलचा वापर कमी करण्यासाठी ‘जॅमर’ बसविण्यात आले आहेत. काही विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा पूर्णवेळ खुली आहे. बहुतांश महाविद्यालयांमध्ये ‘वायफाय’ची सेवा अद्याप उपलब्धच नाही. वायफायच्या रेंगाळलेल्या रेंजविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांनी नाराजीच व्यक्त केली, तर काही जणच वेगवान ‘मोबाइल सर्फिग’मुळे आनंदी आहेत.

रुईयाचा व्यापक उद्देश 

रामनारायण रुईया महाविद्यालय ‘वायफाय’ सेवेत अग्रेसर आहे. संपूर्ण महाविद्यालयातील विभागांना ‘वायफाय’ सेवेने जोडण्यात आले आहे. शिक्षकांप्रमाणेच विद्यार्थ्यांनाही ही सुविधा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बऱ्याच महाविद्यालयांमध्ये ‘फेसबुक आणि यूटय़ूब’सारख्या माध्यमांना इंटरनेट सुविधेमधून वगळले जाते. यात गुगलची सुविधा अनेकांना दिलेली असते. माहिती अधिक मिळविता येईल, यामागचा उद्देश असतो; मात्र रुईया महाविद्यालयात इंटरनेट वापरावर तशी कोणतीही बंधने नाहीत. विद्यार्थ्यांना अभ्यास आणि माहितीसाठी सर्व माध्यमे खुली आहेत. इंटरनेट सुविधेचा वापर विद्यार्थ्यांनी उन्नतीसाठी करावा, त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठीच ही सुविधा देण्यात आल्याचे रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. ऊर्मी पलन यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठातही महाजाल

कलिनातील मुंबई विद्यापीठाच्या आवारात ‘वाय-फाय’ची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनाही या मोफत सेवेचा लाभ घेता येणार आहे. उपाहारगृह, ग्रंथालय तसेच विविध विभागांमध्येही ‘वायफाय’च्या संपर्कात विद्यार्थ्यांना राहता येणार आहे. यासाठी विभागानिहाय ‘राऊटर’ची सोय विद्यापीठाने केली आहे. यात तासिकेतही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमविषयक माहिती जाणून घेता येणार आहे. यात काही महत्त्वाच्या पुस्तकांची ‘पीडीएफ’ डाऊनलोड करता येणार आहे. सुट्टीच्या दिवशीही ‘प्रोजेक्ट’चे काम करण्यासाठी विद्यार्थीही याचा लाभ घेऊ शकतील.

वायफाय असूनही अडचण

शीव येथील ‘एसआयईएस’ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना काही विशिष्ट काळातच ‘वायफाय’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान, कला आणि वाणिज्य या शाखा आहेत. दोन्ही महाविद्यालयांत ‘वायफाय’ची सेवा आहे; काही वेळेसाठीच ती विद्यार्थ्यांना वापरता येते. विज्ञान आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांना केवळ महाविद्यालयातील महोत्सवांच्या काळात ही सुविधा पुरवली जाते. याबाबत कैवल्य पिटले हिने तक्रार नोंदवली. वाणिज्य शाखेत याउलट स्थिती आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘वायफाय’ असले तरी त्याद्वारे केवळ ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील संदेश पाहता अथवा पाठविण्यापुरताच ‘डाटा’ मिळतो. तर संकेतस्थळ वा एखादे अ‍ॅप्लिकेशन तसेच माहिती ‘डाऊनलोड’ करणे शक्य होत नाही. यासाठी महाविद्यालयात ‘जॅमर’ लावण्यात आल्याची माहिती पुशन भट याने दिली.

एस. के. सोमय्या महाविद्यालय

सोमय्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘वायफाय’ सुविधा उपलब्ध नाही. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक स्वत:च्या ‘नेटपॅक’चा वापर करतात. विद्यार्थ्यांना प्रोजेक्टसाठी इंटरनेटची गरज भासते. एखाद्या सॉफ्टवेअरविषयक माहितीही त्यातून मिळू शकते. अशा वेळी महाविद्यालयात दोन संगणक कक्ष आहेत. महाविद्यालयीन वेळेत विद्यार्थी या संगणक कक्षाचा वापर करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॅम्पसच्या बाहेर जाण्याची वेळ येत नाही. अडचण आल्यासच वर्गातच शिक्षकांशी बोलून ती सोडवण्यास मदत होते.

बसथांबे, स्थानक परिसरात ‘वायफाय’ची सुविधा आहे. महाविद्यालय तर ज्ञानग्रहणाचे केंद्र आहे. इंटरनेट सेवेचा योग्य वापर कसा करावा, हे विद्यार्थी योग्य रीतीने जाणतात. विद्यार्थ्यांना बंधनांऐवजी जबाबदारीने वापराची मुभा दिली तर ते त्याचा वापर तसा करतात. त्यामुळे शिक्षक विद्यार्थी जोडले जातात. डॉ. सुहास पेडणेकर, प्राचार्य, रुईया महाविद्यलय.

(संकलन : नीलेश अडसूळ, पराग गोगटे)