आर्किटेक्चर विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागते. राज्यातील सरकारी महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी ‘एमएच सीईटी’ तर देशभरच्या खासगी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी ‘नाटा’ प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते.  ‘नाटा’ प्रवेशपरीक्षेची सविस्तर माहिती
अन्न, वस्त्र व निवारा या केवळ प्राथमिक गरजाच आहेत, असं न समजता त्या उत्तम करिअरसाठी योग्य दिशा आहेत, असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. करिअरच्या दृष्टिकोनातून अन्न ज्यासाठी हॉटेल मॅनेजमेन्ट, वस्त्र ज्यासाठी फॅशन/ ड्रेस डिझायनिंग तसेच निवारा ज्यासाठी आर्किटेक्चर यापैकी कोणतेही करिअर निवडता येते.
यापैकी आर्किटेक्चरचा पर्याय थोडासा हटके आहे. या पर्यायाचा करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कामाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. सरकारी अथवा निमसरकारी तसेच खासगी नोकरी, स्वतंत्र व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक अशा अनेक संधी विविध पर्याय आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असतात. आर्किटेक्चरचे शिक्षण घेत असताना त्या पाच वर्षांत आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा आणि आपल्या आवडीचा असा पर्याय निवडण्यासंबंधीचा विचार करून विद्यार्थ्यांने निर्णय घ्यावा.
आर्किटेक्चरचा प्रवेश हा अनेकदा काहीजणांना संभ्रमात टाकणारा विषय ठरतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी प्रवेशाचे निकष समजून घेणे गरजेचे असते, अन्यथा प्रवेशपरीक्षेच्या वेळी तारांबळ उडते.
आर्किटेक्चरच्या प्रवेशासाठी काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरकडून घेण्यात येणाऱ्या ‘नाटा’ (nata) नॅशनल अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट इन आर्किटेक्चर ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. या परीक्षेत मिळणाऱ्या कमीत कमी किती मार्कस् मिळवणे आवश्यक आहे, त्याचे निकषही काऊन्सिलने ठरवले आहेत. या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून आर्किटेक्चरचा पाच वर्षे पूर्ण वेळ अभ्यासक्रम करण्याच्या परीक्षार्थीच्या योग्यतेची चाचणी घेतली जाते. आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि तो टिकवण्यासाठी काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या आधिपत्याखाली व पूर्ण नियंत्रणाखाली या ‘नाटा’ परीक्षेच्या निकालानुसार परीक्षार्थीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होते. १९८३च्या काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या नियमानुसार केंद्र सरकारच्या मान्यतेने प्रवेशाचे काही नियम ठरविण्यात आले आणि ते अमलात आणण्यात आले. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही कारणास्तव या अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षांत प्रवेश दिला जात नाही.
नाटा २०१३ :
‘नाटा’ (नॅशनल अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट इन आर्किटेक्चर) म्हणजे नेमकं काय?
या परीक्षेच्या माध्यमातून प्रवेशेच्छू विद्यार्थ्यांच्या पात्रतेची चाचणी घेतली जाते. याद्वारे विद्यार्थ्यांची सौंदर्यशास्त्राची समज आणि चित्रकलेतील गती याचा कस लागतो.
‘नाटा’ कुणासाठी?
ज्यांना एक उत्तम करिअर म्हणून आर्किटेक्चर या पाच वर्षांच्या पूर्ण वेळ अभ्यासक्रमाची निवड आपल्या आवडीनुसार करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी प्रथम वर्ष आर्किटेक्चरच्या प्रवेशासाठी ‘नाटा’ देणे अनिवार्य ठरते.
‘नाटा’ कुठे देता येते?
काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर ने ‘नाटा’ घेण्यास मान्यता दिलेल्या देशभरातील केंद्रे, महाविद्यालये, आर्किटेक्चरल स्कूल्समध्ये ‘नाटा’ देता येते. या शैक्षणिक संस्थांची यादी http:www.nata.in  या संकेतस्थळावर उपलब्ध होते.
‘नाटा’ कधी देता येते?
‘नाटा २०१३’ देण्याची सुरुवात २० मार्च २०१३ पासून मान्यताप्राप्त परीक्षा केंद्रांवर झाली असून त्याची अंतिम दिवसाविषयीची माहिती संबंधित केंद्रांवरच उपलब्ध आहे. ‘नाटा’ देण्यासाठी कोणत्याही कामकाजाच्या दिवशी परीक्षा केंद्रांवर नोंदणी करून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या पद्धतीने परीक्षा देता येते.
‘नाटा’साठी नोंदणी कशी करावी?
आयसीआयसीआय बँकेच्या निवडक शाखांमधून रुपये एक हजार शुल्क भरून ‘नाटा’चे माहितीपत्रक व परीक्षा अर्ज खरेदी करता येतो. हा परीक्षा अर्ज पूर्णपणे भरून, संबंधित कागदपत्रांसह शैक्षणिक व व्यक्तिगत कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती तयार करून ठेवावा. परीक्षार्थीच्या सोयीचे काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरने मान्य केलेले परीक्षा केंद्र निवडावे. त्याची यादी  http:www.nata.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असते. निवडलेल्या परीक्षा केंद्रांवर कागदपत्रांसह भरून ठेवलेला परीक्षाअर्ज दाखल करून परीक्षा देण्याची सोयीस्कर वेळ आणि दिवस निवडावा. संबंधित केंद्रांमधून परीक्षेचा दिवस व वेळ निश्चित केल्याची पोचपावती घ्यावी आणि निश्चित केल्यानुसार परीक्षा द्यावी.
‘नाटा’ देण्यासाठीची तयारी
परीक्षेच्या वेळी किमान अर्धा तास पोहोचणे योग्य, सोबत परीक्षेची पावती, परीक्षा केंद्राचा प्रवेशपरवाना (हॉलतिकीट), फोटो आयडेंटिटी तसेच ड्रॉइंगचे साहित्यसामग्री असणे आवश्यक आहे. संबंधित केंद्रातील अधिकारी व्यक्तीकडून पुढील सूचना मिळाल्यावर परीक्षा सुरू करावी.
‘नाटा’चा निकाल कधी आणि कुठे?
सर्वसाधारणपणे परीक्षेच्या दिवसापासून कामकाजाच्या चौथ्या दिवशी नाटाच्या संकेतस्थळावर ई- फॉर्मेटमध्ये नाटाचा निकाल उपलब्ध होतो.
‘नाटा’मध्ये किती मार्कस् मिळणे आवश्यक असतात – काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या नियमानुसार ज्या परीक्षार्थीला पाच वर्षे कालावधीच्या प्रथम वर्षांसाठी प्रवेश घ्यायचा असेल त्याला किमान ४० टक्के गुण ‘नाटा’मध्ये मिळालेले असणे आवश्यक असते. म्हणजेच एकूण २०० मार्काच्या परीक्षेत किमान ४० टक्के म्हणजेच ८० गुण मिळणे आवश्यक ठरते.
महाविद्यालयीन प्रवेशाविषयी..
काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर मान्यताप्राप्त कोणत्याही सोयीच्या, आवडीच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांला प्रवेश घेता येतो. यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या नियमानुसार आवश्यक त्या प्रवेशाच्या प्रक्रियेची पूर्तता करून संबंधित  कागदपत्रे दाखल करून पाच वर्षे कालावधीच्या बी. आर्च. या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशाची निश्चिती करता येते.
‘नाटा’साठी शैक्षणिक पात्रता
‘नाटा’साठी काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरने लावलेल्या निकषांनुसार, कोणताही विद्यार्थी, ज्याने १० + २ असा नवीन अभ्यासक्रम गणित विषयासह यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे, अथवा असा विद्यार्थी ज्याने १० + ३ असा पदविका अभ्यासक्रम किमान ५० टक्के गुण मिळून यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे, तो विद्यार्थी ‘नाटा’ देण्यासाठी पात्र ठरतो.
‘नाटा’चे स्वरूप
‘नाटा’ प्रामुख्याने दोन निरनिराळ्या भागांत घेतली जाते. त्यापैकी एक ड्रॉइंगवर आधारित तर दुसरी सौंदर्यशास्त्राविषयीची संवेदनशीलतेशी संबंधित ऑनलाइन घेतली जाते. यापैकी ड्रॉइंगची प्रश्नपत्रिका दोन तासांमध्ये सोडवायची असते. यात कोणत्याही खालील स्वरूपाचे केवळ तीन प्रश्न सोडवणे अपेक्षित असते.
०    मुक्तहस्त प्रमाणबद्ध चित्र रेखाटणे – दिलेल्या वस्तूचे जशी ती वस्तू प्रत्यक्ष दिसत आहे, त्याचे हुबेहूब चित्र काढून रेंडर करणे.
०    संकल्पचित्रकृतीच्या माध्यमातून मुक्तहस्त प्रमाणबद्ध रेखाटलेल्या चित्रातील वस्तूला प्रकाश व सावली (लाइट व श्ॉडो) याच्या माध्यमातून वस्तूच्या सभोवतालच्या जागेचा अंतर्भाव त्या चित्रात असणे.
०    परस्पेक्टिव्ह ड्रॉइंग – दिलेल्या वस्तू, आकृतीचा उपयोग करून त्याच्या सहाय्याने वेगवेगळी कॉम्बिनेशन्स तयार करून त्याला एखाद्या इमारतीचे स्वरूप प्राप्त करून देणे. त्या आकृतीला इमारतीच्या स्वरूपात बदलणे.
०    दिलेल्या शेप्स व फॉम्र्सच्या सहाय्याने वैविध्यपूर्ण कॉम्पोझिशन्स तयार करणे – दिलेल्या कॉम्पोझिशनमध्ये रंगांच्या सहाय्याने व्हिज्युअल हार्मनी साकारणे. रंग आणि रंगसंगतीचा मेळ या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो.
०    स्केल आणि प्रपोर्शन यांची जाणीव ठेवून ड्रॉइंग काढणे.
०    कॉम्प्युटर बेस ऑनलाइन परीक्षा एक तासाची असते. ज्यामध्ये अ‍ॅस्थेटिकल सेन्सिटिव्हिटीशी संबंधित एकूण ४० बहुपर्यायी प्रश्न सोडवणे अपेक्षित असतात. यात परीक्षार्थीचे आकलन, कल्पनाशक्ती, निरीक्षण, सर्जनशीलता आणि संवाद साधण्याची क्षमता अजमावली जाते. या सर्वाचा संबंध कुठेतरी आर्किटेक्चरशी तो विद्यार्थी कसा वापरतो, हे प्राधान्याने पाहिले जाते. यामुळे अंतर्भाव असतो तो म्हणजे – टू डायमेन्शियल ड्रॉइंगला थ्री डायमेन्शियल ऑब्जेक्टच्या रूपात व्हिज्युअलाइज करणे.
०    थ्री डायमेन्शियल ऑब्जेक्टच्या सर्व तीन बाजूंपासून सहा बाजूंपर्यंत व्हिज्युअलाइज करणे.
०    सर्वसाधारणपणे वापरली जाणारी विविध मटेरिअल्स आणि ऑब्जेक्टस् यांना त्यांच्या रंग, पोत यावरून ओळखणे आणि निश्चित करणे.
०    अ‍ॅनॅलिटिकल रिझनिंग
०    मेन्टल एबिलिटी
०    इमॅजिनेटिव्ह कॉम्प्रिहेन्शन अ‍ॅण्ड एक्स्प्रेशन
०    आर्किटेक्चरल अवेअरनेस
‘नाटा’ परीक्षा देताना..
स्वत:चे फोटोआयकार्ड तसेच ‘नाटा’ अ‍ॅडमिट कार्ड, पावती परीक्षा केंद्रावर बाळगावी. तसेच ड्रॉइंगच्या पेपरसाठी किमान तीन-चार टोक केलेल्या साध्या लीड पेन्सिल्स (टू बी व एचबी) स्वच्छ व मऊ खोडरबर, सेट ऑफ कलर्स (वॉटर, पोस्टर्स, क्रेऑन्स, पेस्टल) सोबतच्या ब्रश तसेच इतर वस्तूंसह. भूमितीचा इन्स्ट्रमेन्ट बॉक्स, ब्ल्यू इंक पेन, ब्ल्यू इंक बॉलपॉइंट पेन इत्यादी साहित्य परीक्षेसाठी जाताना सोबत घेऊन जावे.

‘नाटा’ संबंधित वरील सर्व माहिती नीट समजून घेतल्यास आणि परीक्षेपूर्वी सविस्तर दिलेल्या विषयांचा, प्रश्नांचा सखोल अभ्यास केल्यास या परीक्षेत आणि पुढील आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमात फक्त यश आणि यशच प्राप्त होईल, यात शंका नाही.      ल्ल
प्राचार्य, महावीर इन्स्टिटय़ूट, पुणे<br />एम.एच. सीईटी
राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सरकारी महाविद्यालयांमधील आर्किटेक्चरच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा १९ मे रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेविषयीची सविस्तर माहिती http://dte.org.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पात्रतेचे काही निकष निश्चित केलेले आहेत. त्यात इतर काही निकषांसोबत विद्यार्थ्यांने १० +२ अभ्यासक्रम गणित या विषयासह पूर्ण करून त्यात ५० टक्के प्राप्त करणे (अनुसूचित जाती-जमातींसाठी ४५ टक्के) आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या परीक्षेचे स्वरूप ‘नाटा’ परीक्षेप्रमाणेच असून विषय तसेच मार्काची विभागणीही ‘नाटा’प्रमाणेच आहे.
प्राचार्य, महावीर इन्स्टिटय़ूट, पुणे –