आज आपण कृषी विषयाशी संबंधित अशा दोन आगळ्यावेगळ्या संग्रहालयांची ओळख करून घेऊ.
सागवानी लाकडाचे संग्रहालय, केरळ
सागवानी लाकूड किंवा सागाचे झाड हे विविध वृक्षांच्या जाती-प्रजातींमध्ये महत्त्वाचे आणि मौल्यवान समजले जाते. सागाची नसíगक लागवड भारत, म्यानमार, थायलंड येथे केलेली दिसून येते. भारतात सागाची प्रमुख जंगले केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान या राज्यांत आढळतात. सागवानी लाकडाची जगातील पहिली लागवड १८४० साली केरळ येथे करण्यात आली.
‘सागवान लाकूड’ या संकल्पनेवर आधारित असे हे ‘टीक म्युझियम’ मे १९९५ मध्ये केरळ येथे उभारण्यात आले. केरळ राज्य वन खाते आणि केरळ राज्य वन संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेले हे म्युझियम केरळमधील निलांबर वन परिसरात आहे. या वनभागात सुमारे दीडशे वर्षांपासून सागाच्या विविध प्रजातींवर संशोधन होत आहे. सागवानी लाकडाचा इतिहास, पदास, नियोजन, वापर, सागवानी लाकूड आणि अर्थकारण या सर्व पलूंवर प्रकाश टाकणारे अशा प्रकारचे जगातील एकमेव संग्रहालय असल्याचे समजते.
संग्रहालयाच्या एका मजल्यावर सागवानी लाकडाचे ऐतिहासिक आणि कलात्मक मूल्य उद्धृत करणाऱ्या कलावस्तू प्रदíशत करण्यात आल्या आहेत. संग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावर सागवानी लाकूड आणि त्याच्या प्रजातींविषयी वैज्ञानिक स्वरूपाची माहिती मिळते. सागवानी लाकडाच्या संदर्भातील जगभरात प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा संग्रहही आपल्याला येथे पाहायला मिळतो.
संग्रहालयाच्या प्रवेशद्वारात आपले स्वागत करण्यासाठी अस्सल सागवान लाकडात बनवलेले सागाच्या झाडाच्या खोडासहित मुळांच्या जाळ्याचे शिल्प आपल्या दृष्टीस पडते. केरळच्या जंगलात वाढणाऱ्या सर्वात मोठय़ा सागाच्या झाडाची हुबेहूब लाकडी प्रतिकृतीही आपल्याला येथे पाहायला मिळते.
सागाच्या लाकडापासून बनवलेल्या होडय़ा, चित्रेही येथे दिसतात. या भित्तिचित्रांमधून अठराव्या-एकोणिसाव्या शतकात सुरू झालेल्या सागाच्या शास्त्रोक्त लागवडीचे चित्र रेखाटले आहे. ७.६ मीटर परीघ असलेले ३८ मीटर उंचीच्या सागाच्या झाडाचे छायाचित्र म्युझियममध्ये दिसते. ११६ वष्रे जुन्या सागवानी झाडाच्या खोडाचे चार ओंडके येथे प्रदर्शनीय वस्तू म्हणून ठेवण्यात आले आहेत. सागाच्या झाडाची विशिष्ट पद्धतीची मूळ संस्था येथे चित्ररूपात विशद केली आहे. या संग्रहालयात ४८० वष्रे जुन्या सागाच्या खोडाचा भाग पाहायला मिळतो. सागाच्या झाडाच्या विविध भागांची मानवजातीला होणाऱ्या उपयोगांची माहितीही या संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आली आहे.
या म्युझियममधील आणखी एक आकर्षण म्हणजे दर्शकांसाठी योजलेला ‘नेचर ट्रेल’. ही निसर्गातील भटकंती म्युझियमला लागून असलेल्या तळ्यापासून सुरू होते. बांबूची बने, औषधी वनस्पतींची लागवड केलेल्या बागा, फुलपाखरांची बाग, वृक्षोद्यान अशी जैवविविधतेची अनेक रूपे या सफरीत आपल्याला पाहायला मिळतात. या ट्रेलमध्ये अनेक देशी तसेच स्थलांतरित पक्ष्यांचेही दर्शन होते.
या वैशिष्टय़पूर्ण म्युझियमचा पत्ता आणि वेळा खालीलप्रमाणे –
टीक म्युझियम,
केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट- सब सेंटर
चान्दाकुन्नू ६७९३४२, निलांबर, केरळ
संकेतस्थळ : http://www.kfri@res.in
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.
दर सोमवारी संग्रहालय बंद.
मृदा संग्रहालय
केरळ राज्याच्या मृदा सर्वेक्षण आणि संरक्षण खात्याच्या प्रयत्नांनी केरळमधील ‘परोत्तुकोणम’ येथे उभारलेले ‘मृदा संग्रहालय’ (सॉइल म्युझिअम) १ जानेवारी २०१४ रोजी खुले करण्यात आले. अशा प्रकारचे देशातील हे पहिले संग्रहालय आहे. केरळ राज्यातील जमिनीच्या आणि खनिज स्रोतामधील वैविध्याचा परिचय सर्वसामान्यांना आणि मृदा अभ्यासकांना करून देणे, मृदा संरक्षणाची गरज जनतेच्या लक्षात आणून देणे हे संग्रहालय उभारणीचे हेतू आहेत. भूशास्त्र विद्यार्थी आणि संशोधकांच्या अभ्यासाकरता संग्रहालयातील ही माहिती महत्त्वाची ठरते. शेतकी अभ्यासकांसाठीही पिकांची पदास वाढवताना माती आणि खनिजांसंबंधी माहितीची मदत होऊ शकते. संग्रहालयातील कर्मचारीवर्गाने नेदरलँड्स येथील विद्यापीठातून विशेष प्रशिक्षण घेतले आहे.
केरळमधील प्रत्येक जिल्ह्यातील शेतजमिनीचे असलेले वेगवेगळे प्रकार व प्रत लक्षात घेऊन निरनिराळ्या मातीचे नमुने संग्रहालयात आहेत. या नमुन्यांमध्ये विशिष्ट प्रकारच्या मातीची मूलभूत वैशिष्टय़े कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. केरळ राज्यातील निरनिराळ्या जिल्ह्य़ातील मातीचे प्रतिनिधित्व करणारे साधारण दीड मीटर लांबीचे मातीचे खांब (मोनोलिथ) संग्रहालयात आहेत. केरळमध्ये प्रामुख्याने मातीचे आठ प्रकार आढळतात. संग्रहालयातील मातीचे हे वर्गीकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त अशा यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चर (यूडीए)च्या नियमांनुसार केले आहे. असे नमुने जमवणे, वैशिष्टय़े अबाधित राखून संग्रहालय स्थळापर्यंत वाहून आणणे आणि जतन करणे हे सारे खूपच कष्टप्रद असते. या प्रत्येक वर्गीकरणासोबत या नमुन्यातील मातीची कृषीविषयक उपयुक्तता, रासायनिक गुणधर्म, जैविक गुणधर्म, जमिनीचा कस टिकून राहण्यासाठी पिकांचे नियोजन याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. भेट देणाऱ्या प्रत्येकाला या सर्व माहितीचे छापील परिपत्रकही दिले जाते.
संग्रहालयाच्या दुसऱ्या भागात राज्यात सापडणारे विविध प्रकारचे दगड आणि खनिजांचे नमुने पाहता येतात. याबरोबरच जमिनीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे नियोजन, जमिनीवरील मातीच्या थराचे रक्षण यासाठी आवश्यक अशा उपायांची प्रतीकात्मक रूपात माहितीही देण्यात आली आहे.
पत्ता – सॉइल म्युझिअम, सॉइल अॅनॅलिटिकल लॅबोरॅटरी, पराओत्तुकोणम, केरळ. वेळ – सकाळी १० ते सायंकाळी ५.  आठवडय़ाचे सर्व दिवस खुले.
ईमेल – soilmuseum@kfri.res.in                      
geetazsoni@yahoo.co.in