मी बारावी सायन्सची परीक्षा दिली आहे. मला अभियांत्रिकी आणि वैद्यक शाखांना न जाता व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम शिकायचे आहेत.  फारसा अभ्यास करण्याची इच्छा नसून मला फील्ड वर्कमध्ये अधिक रस आहे. त्यासाठी  करिअर संधी व अभ्यासक्रम कोणते?
– अतुल पाटील
पुढे शिकायचे नसल्यास काही सॉफ्ट स्किल्स संपादन करणे महत्त्वाचे ठरेल. उदाहरणार्थ- संवादकौशल्य, सादरीकरण, संभाषण कला, संगणकाचा मूलभूत अभ्यासक्रम इत्यादी. यासाठी अल्पावधीचे अभ्यासक्रम उपलब्ध असतात. आपल्याला व्यापार करायचा असला तरी त्या विषयाचे ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. पंतप्रधान रोजगार योजनेंतर्गत तुम्हाला व्यवसाय/उद्योग करण्यासाठी कर्ज मिळू शकते. याची माहिती जिल्हा उद्योग केंद्रात मिळू शकेल. इव्हेंट मॅनेजमेंटसारखे अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्यासंबंधीचा व्यवसाय पूर्ण करता येईल.

मी बीएस्सी वनस्पती शास्त्रात केले आहे. पुढील करिअर संधींची माहिती द्याल का?
    – सचिन पावळ
तुम्हाला पुढील क्षेत्रांत संधी मिळू शकते- इकॉलॉजिस्ट, टॅक्सानॉमिस्ट, कन्झव्‍‌र्हेटिस्ट, फॉरेस्टर, प्लान्ट एक्सप्लोरर. गणिताची पाश्र्वभूमी असल्यास बायोफिजिस्ट, डेव्हलपमेंटल बॉटनिस्ट, जेनेटिक्स. रसायनशास्त्राच्या पाश्र्वभूमीसह प्लान्ट फिजिओलॉजिस्ट, प्लान्ट बायोकेमिस्ट, मॉलेक्युलर बायोलॉजिस्ट, केमोटॅक्सोनॉमिस्ट, ऑर्नमेंटल हॉर्टकिल्चर, लँडस्केप डिझाइन ,प्लान्ट पॅथालॉजी,  प्लान्ट ब्रििडग, अ‍ॅग्रोनॉमी, हॉर्टकिल्चर.
तुम्ही भारतीय वन सेवेची परीक्षा देऊन देशाच्या वनखात्यात उच्च पदावर जाऊ शकता.
राज्य सरकारच्या वन विभागातही रेंज फॉरेस्ट ऑफिसर किंवा असिस्टंट कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्टर म्हणून तुम्हाला संधी मिळू शकेल.
तुम्ही एमएस्सी आणि पीएच.डी केल्यास अध्यापनाच्या क्षेत्रात जाता येईल. शिवाय देशाच्या मोठय़ा संशोधन प्रकल्पांमध्ये तुम्हाला संशोधन करण्याची संधी मिळू शकेल.

मी बीएस्सी हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रम पूर्ण केला असून नोकरी करत आहे.  बहि:शाल पद्धतीने मला एलएलबी करता येईल का?
    – तुषार पेढांबाकर
आपण बहि:शाल पद्धतीने एलएलबी करू शकत नाही. आपल्याला नियमित स्वरूपात एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागेल. काही संस्थांमध्ये संध्याकाळचे वर्ग चालवले जातात.

मी बीएएमएसच्या प्रथम वर्षांला शिकत असून मला नागरी सेवेत जायचे आहे. या परीक्षांची पूर्वतयारी कशी करू?
    – लोकेश भागडकर, नागपूर<br />नागरी सेवा परीक्षांसाठी कोणत्याही विषयातील पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला आधी बीएमएमएस पूर्ण करावे लागेल किंवा मुक्त विद्यापीठामधून एखाद्या विषयात पदवी घ्यावी लागेल. नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते. पहिला टप्पा पूर्वपरीक्षेचा आहे. दुसरा टप्पा मुख्य परीक्षेचा आणि तिसरा टप्पा मुलाखतीचा आहे. पहिला टप्पा मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी असतो. पूर्वपरीक्षा बहुपर्यायी तर मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीची असते. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांवर आधारित अंतिम निवड यादी तयार केली जाते. गुणानुक्रमे वरच्या श्रेणीतील उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय परदेश सेवेमध्ये नियुक्ती
दिली जाते.

मी बीकॉमच्या प्रथम वर्षांचा विद्यार्थी असून मला बँकिंगमध्ये करिअर करायचे आहे. एसबीआय आणि ‘आरबीआय’मध्ये अधिकारी परीक्षांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असतो का? बँकिंग अधिकारी होण्यासाठी कोणत्या स्वतंत्र संस्था आहेत? नाशिकमध्ये राहूनच शिकता येईल की मुंबई, पुणे येथे जावे लागेल?
    – सकल सिद्धी
सर्वसाधारणपणे बँकांच्या परीक्षेचा पॅटर्न सारखाच असल्याने एसबीआय आणि ‘आरबीआय’मध्ये अधिकारी होण्यासाठी वेगवेगळा अभ्यास करावा लागत नाही. या अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शनासाठी अनेक संस्था आहेत.  या परीक्षेचा अभ्यास नाशिक येथे राहूनही करता येणे शक्य आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या चौफेर ज्ञानाची कसोटी पाहणारी परीक्षा आहे. त्यामुळे तुम्हाला चौफेर वाचनाची सवय लावावी लागेल. सातत्याने स्वत:चे ज्ञान अपडेट ठेवावे लागेल. विषयांच्या विविध बाजू समजून घ्याव्या लागतील. त्यासाठी दर्जेदार वृत्तपत्रे, नियतकालिके वाचावी लागतील. टीव्हीवरील चर्चा, बातमीचे विश्लेषण या स्वरूपाचे कार्यक्रम जरूर पाहावेत. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढवावे लागेल. मुख्य परीक्षेत दोन पर्यायी विषय निवडावे लागतील. त्याचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल.

मी मुंबई विद्यापीठामधून बीई इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन शिकत आहे. मात्र मला त्यात अपयश मिळाल्याने तीन ड्रॉप घ्यावे लागले. मला आता सद्य विद्याशाखेत बदल करावासा वाटतो. मी सिक्कीम मणिपाल डिस्टन्स एज्युकेशनमधून बीएस्सी इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड मॅनेजमेंटसाठी अर्ज केला आहे. ही पदवी नोकरीसाठी उपयुक्त ठरेल का? इतर काही पर्याय सुचवाल का? मला आयटीमध्ये हार्डवेअर आणि नेटवìकगमध्ये अधिक आवड आहे.
    – महेश पाटील
सर्वप्रथम आपल्याला कशामुळे ड्रॉप घ्यावा लागत आहे, याचा प्रामाणिकपणे विचार करणे आवश्यक आहे. आपल्या कमकुवत बाजूंविषयी आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांशी चर्चा करा. ते निश्चितपणे मार्ग सुचवतील. या टप्प्यावर दुसरा अभ्यासक्रम करायचा म्हणजे आपण आतापर्यंत जे शिकलात ते वाया जाण्याचा प्रकार आहे. यामुळे आतापर्यंत त्यावर घालवलेला वेळ, पसाही वाया जाईल. सध्या विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ते करणे फारसे कठीण नाही. मात्र, पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल. शिवाय इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विषयावरून तुमचे मन उडाले तसे या दुसऱ्या विषयांबाबतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कितीदा असे विषय तुम्ही बदलत राहाल? त्यामुळे आपण पुन्हा एकदा
नव्या उत्साहाने आणि प्राध्यापक आणि वर्गातील हुशार मित्रांच्या साहाय्याने सध्याचा अभ्यासक्रम पूर्ण करावा. कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवìकगमध्ये अनेक अल्पावधीचे अभ्यासक्रम इन्स्टिटय़ूट फॉर डिझाइन फॉर इलेक्ट्रिकल मेझिरग इन्स्ट्रमेंट्स या संस्थेने सुरू केले आहेत.
वेबसाइट-www.idemi.org
ईमेल- trainig@idemi.org

मी बीएचएमएसच्या पहिल्या वर्गात आहे. मला यंदा एमबीबीएस प्रवेशासाठीची एमएच-सीईटी देता येईल का ?
    – तेजस्वी पाटील
तुम्ही एमएच-सीईटी परीक्षा देऊ शकाल. मात्र त्यासाठी जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांमध्ये सरासरी ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. याशिवाय तुमचा जन्म ३१ डिसेंबर रोजी १९९८ रोजी अथवा त्यापूर्वी झालेला असावा.