careermantraमी अकरावीत विज्ञान शाखेत शिकत असून मला संशोधनात करिअर करायचंय. मला कॉस्मॉलॉजी किंवा अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये विशेष रस आहे. बारावीनंतर कुठलं शिक्षण घेतलं तर मला संशोधन क्षेत्रात जाता येईल?
               – संचेती राऊत
बारावीमध्ये उत्तम गुण प्राप्त केल्यास संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने इन्स्पायर (INSPIRE)) ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (पुणे, मोहाली, भोपाळ) या संस्थेमध्ये पाच वष्रे कालावधीचा बीएस-एमएस हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथील बीएस या चार वष्रे कालावधीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. त्यानंतर थेट संशोधनाशी संबधित अभ्यासक्रमासही जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट फॉर एम.एस्सी. या परीक्षेद्वारे आयआयटी आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये पीएच.डी.साठी प्रवेश मिळू शकतो. आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई-अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यास इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेतील बीटेक्- ऐरोस्पेस टेक्नॉलॉजी, बीटेक्-फिजिकल सायन्स या अभ्यासक्रमाला व आयआयटीमधील भौतिकशास्त्र विषयातील इंटिग्रेटेड अभ्यासक्रमालाही प्रवेश मिळू शकतो.

मी बारावीत शिकत आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्राविषयी  आणि या क्षेत्रातील संशोधन संधींविषयी माहिती द्यावी.
    – ओंकार केतकर
जगातील प्रगत देशांप्रमाणे भारतातही जैवतंत्रज्ञान क्षेत्र विस्तारत आहे. त्यामुळे या क्षेत्रात तज्ज्ञ मनुष्यबळाची मोठी गरज  भासणार आहे.
बायोटेक्नॉलॉजी या विषयात पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तसेच बायोटेक्नॉलॉजी इंजिनीअिरग ही पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी उत्तम संधी आहेत. जैवतंत्रज्ञान कंपन्यांमध्ये निर्मिती प्रकिया, संशोधक, अभियंते, गुणवत्ता नियंत्रक, विविध उत्पादने बाजारपेठेत प्रत्यक्ष पाठविण्यापूर्वीचे परीक्षण अशा संधी मिळू शकतात. शिवाय कृषी, पोषण-आहार, पशुवैद्यक, अन्नप्रक्रिया, औषधी निर्माण, जैविक उत्पादने, वस्त्रप्रावरणे या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी मिळू शकतात.
ही आंतरशाखीय ज्ञानशाखा आहे. शरीरातील पेशींमध्ये होणाऱ्या अनियमिततेचा अभ्यास आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी या विषयातील तज्ज्ञांचे साहाय्य लाभते. जैविक उत्पादनांची गुणवत्ता सतत वृद्धिंगत करण्यासाठी हे तज्ज्ञ प्रयत्नशील असतात. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड बायोटेक्नॉलॉजी आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्स या दोन संस्थांशी चारशेहून अधिक जैवतंत्रज्ञान विषयाशी निगडित संस्था संलग्न आहेत. जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकार आíथक साहाय्य करीत असते. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत या विषयातील संशोधनासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी जैवतंत्रज्ञान विषयीच्या ज्ञानाची अर्हता चाचणी घेतली जाते.
 
मला भौतिकशास्त्रातील करिअरचे पर्याय सांगा.
    – अ‍ॅश जाधव
 भौतिकशास्त्राने अंतराळ संशोधन आणि पृथ्वीवरील भौतिकीय वातावरण, उपग्रह दळववळण आणि विविध ग्रहांचा, अंतराळातील घटणाऱ्या घडामोडींचा शोध आणि मागोवा घेऊन मानवी प्रगतीला अधिक उंचावर नेलं आहे. हवामान अंदाजतज्ज्ञ, उपग्रह आणि अवकाशयानांना अंतराळात घेऊन जाणारे तंत्रज्ञान, पृथ्वीच्या उपग्रहीय कक्षामध्ये कृत्रिम उपग्रह पाठविण्याचे तंत्रज्ञान, सुपर कॉम्प्युटरमधील कंडक्टर्सच्या प्रकियेचे तंत्रज्ञान, रिमोट कॅमेरा आदी विषयातील तंत्रज्ञानाचा पाया हा भौतिकशास्त्र आहे. भौतिकशास्त्र हे मूलभूत शास्त्र असल्याने अभियंते, डॉक्टर, जीव शास्त्रज्ञ, रसायन शास्त्रज्ञ, औषधीनिर्माण शास्त्रज्ञ यांना भौतिकशास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक ठरते.
अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, बायोफिजिक्स, जिओफिजिक्स, मेडिकल फिजिक्स, न्युक्लिअर फिजिक्स, मेटिऑरॉलॉजी, अ‍ॅस्ट्रॉनॉमी या काही शाखा मूळ भौतिकशास्त्रामधून विकसित झाल्या आहेत. अणुविज्ञान, सापेक्षता, क्वॉन्टम थिअरी या शाखाही विकसित झाल्या. प्लाझ्मा फिजिक्स, क्रिस्टिलोग्राफी, क्रायोजेनिक्स ही भौतिकशास्त्रातील नवी क्षेत्रे गेल्या दशकात अधिक विकसित झाली आहेत. मेकॅनिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स, अ‍ॅटोमिक अ‍ॅण्ड मॉलेक्युलर फिजिक्स, हिट, ऑप्टिक्स, ऑकस्टिक्स, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रॉनिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, फिजिक्स ऑफ फ्लुइड्स या काही भौतिकशास्त्राच्या स्पेशलाइज्ड शाखा आहेत. भौतिकशास्त्रात तज्ज्ञांना मिळविणाऱ्यांना रडार प्रोजेक्ट मॅनेजर, साऊंड इंजिनीअिरग, वेदर फोरकास्टर, पार्टकिल फिजिसिस्ट, अ‍ॅस्ट्रोफिजिसिस्ट, लेसर फ्युजन सायंटिस्ट, मटेरिअल सायंटिस्ट, पायरोटेक्निशिएन, रिन्यूएबल एनर्जी मॅनेजर, सोलर एनर्जी फिजिसिस्ट, ग्रॅव्हिटी रिसर्चर आदी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते.

 मी २०१४ मध्ये बीई सिव्हिल केले आहे. मला भारतीय लष्करात भरती व्हायचे आहे.
    – कृष्णा देशपांडे
भारतीय लष्कराला सिव्हिल अभियंत्यांची गरज भासत असते. वेगवेगळ्या शाखांमधील अभियंत्यांच्या नियुक्तीसाठी जाहिराती दिल्या जातात. त्याकडे लक्ष ठेवावे. पुढील दोन प्रकारे आपल्याला भारतीय लष्करात प्रवेश करता येऊ शकतो- १. अभियंते (पुरुष)- दरवर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात जाहिरात देण्यात येते. शैक्षणिक अर्हता- जाहिरातीमध्ये नमूद शाखेतील बीई / बीटेक्. वयोमर्यादा- २० ते २७ वष्रे. प्रशिक्षणाचा कालावधी- एक वर्ष. हे प्रशिक्षण इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडेमी, देहरादून येथे दिले जाते. प्रशिक्षण जानेवारी आणि जुल महिन्यात सुरू होते.
२. शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन- (पुरुष) तांत्रिक- वर्षांतून एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात अशी दोनदा जाहिरात दिली जाते. प्रत्येकी ५० उमेदवारांची भरती केली जाते. वयोमर्यादा २० ते २७ वष्रे. अर्हता- संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी. चेन्नईच्या  ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकेडमीमध्ये दरवर्षी ऑक्टोबर आणि एप्रिलमध्ये हे प्रशिक्षण सुरू होते. कालावधी- ४९ आठवडे.  लष्कर भरतीमध्ये बौद्धिक क्षमतेसह शारीरिक क्षमतेचाही कस लागतो, हे लक्षात घ्यावे.
माझी मुलगी आठवीमध्ये आहे. तिला सामुद्री वनस्पती आणि सागरी जीवन या विषयात रस आहे. या विषयात अभ्यासक्रम आणि देशा-परदेशातील करिअर संधींविषयी माहिती द्याल का?
    – संदीप मेहरकर
ओशनोग्रॅफी हा आंतरशाखीय विषय असून विज्ञान शाखेतील इतर विषयही त्यात अंतर्भूत होतात. विशेषत: प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र ,भौतिकशास्त्र आणि अशनीशास्त्र (मिटिऑरॉलॉजी) या शास्त्रांची विविध तत्त्वे ओशनीग्रॅफीच्या अभ्यासात समाविष्ट असतात. या विषयांच्या अभ्यासाने सागरशास्त्राचा अभ्यास अधिक वस्तुनिष्ठ होतो. त्यामुळे तिला आधी उत्तमरीत्या बारावी उत्तीर्ण होऊ द्या. अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात येणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशनची तयारी करून चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करावा किंवा चांगल्या विज्ञान महाविद्यालयामध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा भूगर्भशास्त्रात बी.एस्सी. व त्यानंतर एम.एस्सी. करावे. भूगोल विषयात एम.ए. केल्यानंतरही या क्षेत्रात करिअरच्या संधी मिळू शकतात. आयआयटी- मद्रासच्या अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेन्ट ऑफ ओशन इंजिनीअिरगने बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (ऑनर्स) इन ओशन इंजिनीअिरग अ‍ॅण्ड नेव्हल आíकटेक्चर आणि बीटेक्-एमटेक् इन ओशन इंजिनीअिरग अ‍ॅण्ड नेव्हल आíकटेक्चर (डय़ुएल डिग्री) हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. प्रवेश- जेईई अ‍ॅडव्हान्स्डद्वारे दिला जातो.
करिअरच्या संधी- ऑइल इंडिया, जिआलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया, मिटिऑरॉलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया, डिपार्टमेन्ट ऑफ ओशनोग्रॅफी, डिपार्टमेन्ट ऑफ मरिन सायन्स, फिशरीज सव्‍‌र्हे ऑफ इंडिआ, कोस्टल मरिन फिशरिज रिसर्च इन्स्टिटय़ूट, सेन्ट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिटय़ूट, सेन्ट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिश टेक्नॉलॉजी, झुऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया या संस्थांमध्ये अभियंते, संशोधक, तंत्रज्ञ म्हणून संधी
उपलब्ध आहेत.

मला वृत्तनिवेदक व्हायचे आहे. त्यासाठी कोणती तयारी करावी लागेल?
    – अमोल मुंजाळ
वृत्तनिवेदक होण्यासाठी पत्रकारितेची पदवी वा पदविका ही आवश्यक अर्हता मानली जाते. त्यामुळे आपण आधी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावा. त्यानंतर पत्रकारितेची पदवी वा पदव्युत्तर पदविका घ्यावी. त्यामुळे आपल्याला कामकाजाची माहिती मिळेल. वृत्तनिवेदकाची वाणी स्पष्ट असावी. भाषेवर प्रभुत्व असावे. वाचन दांडगे हवे. चालू घडामोडींची अद्ययावत माहिती हवी. संपादन कौशल्य आत्मसात करावे.
 
मी बीटेक् केले आहे. बँकेत करिअर करायचे आहे.
    – नेहा पाटील
 आपण स्टेट बँकेसह इतर राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रोबेशनरी ऑफिसर्स पदासाठी घेण्यात येणारी स्पर्धा परीक्षा देऊ शकता. या शिवाय बँकांमध्ये तांत्रिक पदांसाठी विशेष भरती सातत्याने केली जाते. या पदांसाठीही आपण अर्ज करू  शकता. रिझव्‍‌र्ह बँक आणि खासगी बँकांमधील भरतीसाठी स्वतंत्रपणे रिक्रूटमेंट ड्राइव्ह घेतल्या जातात.

मी दहावीनंतर सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदविका प्राप्त केली आहे. आता मी नोकरी करीत असून मला मुक्त विद्यापीठातून बी.ई. पदवी पूर्ण करता येईल का? त्यानंतर मला यूपीएससी-एमपीएससी परीक्षांना बसता येईल का?
    – वैभव वहाळे
मुक्त विद्यापीठामार्फत अभियांत्रिकी शाखांमध्ये बहि:शाल पद्धतीने पदवी अभ्यासक्रमाची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे आपण मुक्त विद्यापीठाची कला शाखेत पदवी घ्यावी. त्यानंतर आपल्याला एमपीएससी आणि यूपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा देता येतील.    
(करिअर अथवा अभ्यासक्रमासंबंधीचे आपले प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर ई-मेल करा.)