केंद्र सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे  देशस्तरावर सीमॅट परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेमार्फत विद्यार्थ्यांना देशभरातील साडेतीन हजारांहून अधिक व्यवस्थापन शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करता येतो. या परीक्षेची तयारी कशी करावी, याचे मार्गदर्शन करणारी लेखमालिका..
सध्याच्या स्पध्रेच्या युगात आपले करिअर उत्तम घडावे, यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. करिअरची व्यवस्थित घडण होण्याच्या दृष्टीने पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. व्यवसायाभिमुख शिक्षण देणाऱ्या एमबीए अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची अधिक पसंती मिळत आहे. एमबीए झाल्यावर भरघोस वेतन देणाऱ्या उत्तमोत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याने पदवीनंतर लगेच अथवा नोकरीचा थोडाफार अनुभव घेऊन विद्यार्थी व्यवस्थापन अभ्यासक्रमाकडे वळताना दिसतात. कंपनीतील व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी अशा मानाच्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी एमबीए अभ्यासक्रमाला पर्याय नाही. अशा स्वप्नवत करिअरचे उत्तुंग शिखर गाठण्यासाठी पहिली पायरी ठरते ती म्हणजे एमबीएची प्रवेश परीक्षा! भारतामध्ये CAT, XAT, CMAT, SNAP, CET अशा अनेक एमबीए प्रवेश परीक्षा विविध शैक्षणिक संस्थांमार्फत घेतल्या जातात. यापकी सीमॅट ही परीक्षा केंद्र सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे (AICTE) देशस्तरावर घेण्यात येते.
२०१२ पासून ‘एआयसीटीई’ने सीमॅट अर्थात सामायिक व्यवस्थापन प्रवेश चाचणी ही परीक्षा घेण्यास सुरुवात केली. ही परीक्षा वर्षांतून दोन वेळा घेण्यात येते. दरवर्षी सुमारे ६० हजारांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देतात. ‘सीमॅट’च्या परीक्षेमार्फत विद्यार्थ्यांना देशभरातील साडेतीन हजारांहून अधिक व्यवस्थापन शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करता येतो. साधारणत: सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा होते. या दोन्ही वेळेस परीक्षेला बसण्याची मुभा विद्यार्थ्यांना असते. विद्यार्थ्यांला दोन्ही परीक्षेत मिळालेल्या गुणांपकी सर्वोत्तम गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात. कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर परीक्षेसाठी पात्र असतो. देशभरातील सुमारे ६० हून अधिक शहरांत ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे :
एमबीए प्रवेशासाठी पात्रता
०     बारावीनंतर कोणत्याही शाखेत किमान तीन वष्रे पदवी शिक्षण घेऊन मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.
०     पदवी परीक्षेत किमान ५० टक्के व आरक्षित श्रेणीतील विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.
०     पदवी प्राप्त अथवा पदवीच्या शेवटच्या वर्षांतील विद्यार्थी सीमॅट परीक्षेला बसू शकतो.
शुल्क
०     सर्वसाधारण विध्यार्थ्यांकरिता १४०० रु. आणि आरक्षित श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी ७०० रु.
राज्यातील परीक्षा केंद्रे
०     अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे
महत्त्वाच्या तारखा
०     २५ ऑगस्ट २०१४ : परीक्षा नोंदणीचा अखेरचा दिवस
०     १२ सप्टेंबर २०१४ : हॉल तिकीट िपट्रसाठी उपलब्ध
०     २५ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०१४ : ऑनलाइन परीक्षा
०     ३० ऑक्टोबर २०१४ : परीक्षेचा निकाल
०     ३०ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०१४ : गुणपत्रक िपट्रसाठी उपलब्ध होईल.
परीक्षेचे स्वरूप
 सीमॅट परीक्षा एकूण ४०० गुणांची असते. हे ४०० गुण प्रत्येकी १०० गुणांच्या चार विषयांमध्ये विभागण्यात येतात. Quantitative Techniques and Data Interpretation (गणित), Logical Reasoning (बुद्धिमापन चाचणी), Language Comprehension (इंग्रजी) व General Awareness (सामान्य ज्ञान) असे चार विभाग असतात. प्रत्येक विभागात २५ बहुपर्यायी प्रश्न (Multiple choice question) विचारण्यात येतात. प्रत्येक योग्य उत्तरासाठी ४ गुण मिळतात तर चुकीच्या उत्तरासाठी मात्र प्रत्येकी १ गुण वजा होतो. या परीक्षेसाठी एकूण १८० मिनिटे अर्थात तीन तासांचा कालावधी असतो.
संपूर्ण देशभरातून विद्यार्थी सीमॅट परीक्षेला बसत असल्याने ही परीक्षा आव्हानात्मक असते. यात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी खूप जास्त नसली तरी विषयवार अभ्यासक्रमाचा आवाका मोठा आहे. तसेच चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा होत असल्याने विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे अतिशय सावधपणे द्यावी लागतात. प्रत्येक विषयात विद्यार्थ्यांने किमान गुण मिळवणे अनिवार्य असल्याने अभ्यासात चारही विषयांचा समतोल साधणे आवश्यक आहे. वेळेची मर्यादा, ऋण गुणांकन, विभागवार किमान गुणांची आवश्यकता इत्यादी घटकांमुळे सीमॅट अतिशय वैशिष्टय़पूर्ण आणि आव्हानात्मक ठरते. म्हणून परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचा व्यवस्थापन कौशल्याचा कस या प्रवेश परीक्षेपासूनच लागण्यास सुरुवात होते. परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करताना काही मूलभूत कौशल्ये विद्यार्थ्यांनी अंगीकारणे महत्त्वाचे आहे.
इंग्रजीचा सराव
या परीक्षेला बसणारे अनेक विद्यार्थी मराठी माध्यमाचे असतात. त्यांच्या मनात अनेकदा इंग्रजीबद्दल अनाठायी भीती असते. सीमॅट परीक्षा संपूर्णत: इंग्रजी भाषेतच असल्याने इंग्रजीची सवय असणे अत्यावश्यक ठरते. २५ प्रश्न विशेषत: इंग्रजी भाषेच्या ज्ञानावर आधारित असल्याने त्याचाही अभ्यास करावा लागतो (त्याविषयी अधिक माहिती पुढील लेखात घेऊ). त्यामुळे अभ्यास सुरू करण्यापूर्वी इंग्रजीच्या न्यूनगंडावर मात करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी इंग्रजीचे वाचन करणे गरजेचे आहे. नियमितपणे इंग्रजीचे वाचन केल्यास या भाषेची सवय होण्यास मदत होते. अशा परीक्षांमध्ये अनेकदा काही प्रश्न फसव्या स्वरूपाचे असतात. अशा वेळी दिलेल्या प्रश्नाचा योग्य अर्थ समजावून घेऊन ते सोडवावे लागतात. इंग्रजीचे नियमित वाचन व सराव केल्यास ते सोपे होते. आवडीचे पुस्तक, कादंबरी वाचल्यास लिखित इंग्रजी समजून घेणे सोपे आणि रंजक होऊ शकते. परीक्षेमध्ये इंग्रजी विभागात काही उतारे दिलेले असतात. त्यावर काही प्रश्न विचारले जातात. नियमित वाचनाचा सराव असल्यास वाचनाचा वेग वाढतो आणि आकलनक्षमता सुधारते. त्यामुळे असे प्रश्न हमखास गुण देणारे ठरतात.
वाचन
स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये वाचनाला सर्वाधिक महत्त्व आहे. आपण किती वाचतो, त्यापेक्षा आपण काय व कसे वाचतो याला अधिक महत्त्व आहे. सीमॅट परीक्षेत यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करणे गरजेचे आहे. नियमितपणे विद्यार्थ्यांनी एक इंग्रजी वृत्तपत्र, एक दर्जेदार नियतकालिक आणि त्याबरोबर एखादे उद्योगविषयक मासिक वाचावे. या वाचनामुळे इंग्रजी सुधारण्यास व सामान्य ज्ञानात वृद्धी होण्यास मदत होते. सीमॅट परीक्षेत सामान्य ज्ञानावर २५ प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञानाचा आवाका मोठा असल्याने त्याच्या तयारीसाठी नियमित वाचन मोलाचे ठरते.
अभ्यासाचे नियोजन
महाविद्यालयीन अभ्यासक्रम, त्याच्या अभ्यासाचा प्रकार आणि  स्पर्धा परीक्षेची तयारी यात खूप तफावत आहे. पदवी अभ्यासक्रमात अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तोंडावर आवश्यक तेवढा अभ्यास करून झटपट गुण मिळवण्याची सवय झालेली असते. ही सवय अशा स्पर्धा परीक्षांमध्ये हानिकारक ठरते. अशा ऐन वेळीच्या अभ्यासाची सवय मोडून नियमित अभ्यास करण्याची सवय लावून घ्यावी लागते. अभ्यासाचे नीट व्यवस्थापन करून त्याचे तपशीलवार वेळापत्रक तयार केल्यास त्याची खूप मदत होते. अभ्यासाचे नियोजन करताना पहिल्याच दिवसापासून खूप अभ्यास करू नये. तसे केल्यास सवय नसल्याने काही दिवसांतच अभ्यासाचा कंटाळा येतो व अपेक्षित परिणाम साधता येत नाही. त्याऐवजी सुरुवातीला दिवसाचे दोन-तीन तास अभ्यास व हळूहळू त्याचा कालावधी वाढवत न्यावा. त्यामुळे परीक्षा जवळ आल्यावर दिवसाचे सात-आठ तास सहज अभ्यास करता येतो व त्याचा फायदा होतो. तसेच परीक्षेतील चारही विषयांना योग्य महत्त्व आणि वेळ देणे गरजेचे आहे. वेळेचे नियोजन आणि विषयवार अभ्यासाचा समतोल साधणे यात यशाचे गमक दडले आहे.
परीक्षेबाबतचा दृष्टिकोन
या परीक्षेत अपेक्षित गुण मिळविण्यासाठी सर्वात निर्णायक ठरतो, तो म्हणजे परीक्षेबाबत असणारा दृष्टिकोन. सीमॅटच्या परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न इयत्ता दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. असे असले तरी या परीक्षेचे आव्हान कमी होत नाही, कारण शालेय परीक्षेचा दृष्टिकोन आणि स्पर्धा परीक्षेचा दृष्टिकोन हे मूलत: वेगळे आहेत. शालेय परीक्षांमध्ये ठराविक पद्धतीचेच प्रश्न विचारले जातात. त्याचे उत्तर देण्याची पद्धतही साचेबद्ध असते. लिहिलेल्या उत्तराच्या क्रमवार पायऱ्यांना गुण दिले जातात. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांचा भर पाठांतरावर असतो. स्पर्धा परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न मात्र बहुपर्यायी असल्याने त्यात प्रश्न सोडविण्याच्या पद्धतीला फारसे महत्त्व नाही. प्रश्न सोडवून दिलेल्या अंतिम उत्तरालाच सर्वस्वी महत्त्व आहे. त्यामुळे पाठांतराची सवय मोडून प्रश्नांचा विश्लेषणात्मक विचार (problem solving thinking) करण्याची सवय विद्यार्थ्यांना अंगी बाणवावी लागते. प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना त्यातील संकल्पना नीट समजावून घेत त्याचा सखोल, विश्लेषणात्मक विचार करावा. स्पर्धा परीक्षांमध्ये साचेबद्ध प्रश्न येत नाहीत. त्यांचे स्वरूप वेळोवेळी बदलत राहते. अशा वेळी समोर आलेला प्रश्न नीट समजून त्याचे योग्य विश्लेषण केल्यास असे प्रश्न सोडवणे सोपे होते व कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवता येतात.
इमारत बांधण्यापूर्वी त्याचा पाया पक्का करून घ्यावा लागतो. अगदी तसेच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी त्यासाठी स्वत:ला सज्ज करावे लागते. इंग्रजीची तयारी, नियमित वाचन, अभ्यासाचे नियोजन व स्पर्धा परीक्षेला पोषक दृष्टिकोन अशी प्राथमिक तयारी केल्यानंतरच पुढील अभ्यासाला सुरुवात करता येऊ शकते.
सप्टेंबरअखेरीस होणाऱ्या परीक्षेच्या अभ्यासाचा प्रारंभ करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी स्वत:ला सज्ज करावे. व्यक्तिमत्त्वाची यथायोग्य मशागत केल्याशिवाय अभ्यासाचे कितीही बियाणे पेरले तरी त्याला यशाचे अंकुर फुटत नाहीत. पुढील लेखात आपण विषयवार अभ्यासाची माहिती घेऊ.
 डॉ. वरदराज बापट
(सीए, पीएचडी)
प्राध्यापक, आयआयटी, मुंबई.
varadrajb@gmail.com
अजिंक्य नवरे
(एमबीए),
पीएच.डी. रिसर्च स्कॉलर, आयआयटी, मुंबई,
ajinkya.navare@gmail.com