deshodeshiतेल-अविव विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना
इस्रायल सरकारद्वारे पोस्ट डॉक्टरल संशोधनासाठी भारतीय व चिनी विद्यार्थ्यांसाठी विशेष (पूर्ण) शिष्यवृत्त्या दिल्या जात असून त्याकरता तेल-अविव विद्यापीठ हा उत्तम पर्याय आहे. २०१५-१६ या वर्षांत शिकण्यासाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० मे २०१५ आहे.
तेल अविव विद्यापीठ या इस्रायलमधील सगळ्यात मोठय़ा विद्यापीठात बारावी उत्तीर्ण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी बीएस्सी इन इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरग हा चार वर्षांचा तर बीए इन लिबरल आर्ट्स हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. इंजिनीअिरगमध्ये इलेक्ट्रिकल डिवाइसेस, इलेक्ट्रो-ऑप्टिक्स, कंट्रोल सिस्टीम्स, बायो-इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इंजिनीअिरग, टेलिकम्युनिकेशन्स, सिग्नल प्रोसेसिंग आणि कॉम्प्युटर सिस्टीम अशी आठ स्पेशलायझेशन्स असून वार्षकि शिकवणी शुल्क १२,५०० डॉलर आहे. लिबरल आर्ट्समध्ये पश्चिम अशिया, तत्त्वज्ञान, साहित्य, मानसशास्त्र, कम्युनिकेशन आणि डिजिटल कल्चर असे विविध पर्याय उपलब्ध असून त्याचे शुल्क
११ हजार डॉलर आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्त्या तसेच अर्थसाहाय्य उपलब्ध आहे.
याशिवाय विविध सहामाही किंवा वार्षकि ‘स्टडी अब्रॉड’ कार्यक्रम, अ‍ॅकॅडमिक गॅप इयर कार्यक्रम तसेच उद्योजकता, नावीन्यपूर्णता आणि इस्रायलमधील उद्योग या विषयांवर या विद्यापीठात छोटेखानी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
इस्रायलमधील शिकण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे येथील उच्च शिक्षण अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातील अनेक विद्यापीठांपेक्षा स्वस्त आहे.  
तेल-अवीव विद्यापीठात ९ विद्याशाखा आणि त्याअंतर्गत सुमारे १२५ विभाग असून सुमारे ३० हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. इस्रायलची आíथक आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या तेल-अविवमध्ये हे विद्यापीठ स्थित आहे. विविध आंतरराष्ट्रीय रँकिंगप्रमाणे तेल-अविव विद्यापीठाचा समावेश जगातील सर्वोत्तम १०० विद्यापीठांत तर अशियातील सर्वोत्तम २५ विद्यापीठांत होतो. विद्यापीठाने आजवर २४००हून अधिक पेटंट दाखल केली असून याबाबतील ते इस्रायलमध्ये पहिल्या तर जगात २९व्या क्रमांकावर आहे. विज्ञान, संगणक विज्ञान, बायोइन्फोम्रेटिक्स आणि अल्गोरिदम यासाठी ते जगभरात नावाजलेले आहे.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी एक वर्षांत पदव्युत्तर शिक्षण (एमए किंवा एमएस्सी) घेण्याची सुविधा असून त्यात आíकऑलॉजी आणि बायबलच्या भूमीचा इतिहास, आंतरराष्ट्रीय एलएलएम, कॉन्फ्लिक्ट रेझॉल्युशन आणि मेडिएशन, क्रायसिस आणि ट्रॉमा स्टडीज, संरक्षण आणि कूटनीती, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन आणि आंतरराष्ट्रीय एमबीए असे भरपूर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पदव्युत्तर शिक्षणाचे शुल्क १५-२० हजार डॉलर इतके असून एमबीएसाठी ते ३२ हजार डॉलर इतके आहे. येथे  विविध शिष्यवृत्त्या आणि अर्थसाहाय्य योजना उपलब्ध आहेत.

इस्रायलमध्ये उच्च शिक्षणाचे माध्यम हिब्रू असले तरी प्रत्येक विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय विभाग असून त्यात सर्व अभ्यासक्रम इंग्लिशमध्ये शिकवले जातात. तेल-अविव विद्यापीठात जगभरातील १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून या विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय कँपसवरच असून त्यात विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार एकटय़ासाठी स्टुडिओ अपार्टमेंट किंवा एका रूममध्ये दोन विद्यार्थी आणि कॉमन स्वयंपाकघर आणि बाथरूम असलेले फ्लॅट उपलब्ध आहेत. ही व्यवस्था सर्व सोयींनी युक्त असून कँपसवर सर्वत्र वाय-फाय सेवा आहे. कँपसमधील प्रत्येक विभागात अहोरात्र सुरक्षा व्यवस्था असते. याशिवाय गरज लागल्यास मदतीला इस्रायली समुपदेशकही असतात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात विविध सहली, कार्यशाळा, पर्यटन, इंटर्नशीप असे उपक्रम असल्याने चौफेर दृष्टी विकसित होते.
इस्रायलकडे आज पूर्वेची सिलिकॉन व्हॅली म्हणून बघितले जाते. दरडोई संशोधनावर होणाऱ्या गुंतवणुकीत इस्रायल जगात पहिल्या क्रमांकावर असून स्टार्ट-अप उद्योजकतेतही तो सर्वात पुढे आहे. नॅसडॅकवर अमेरिका आणि चीनच्या खालोखाल इस्रायली कंपन्या असून अ‍ॅपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, जीई, एचपी, इन्टेल, आयबीएम या आणि अशा अनेक जागतिक कंपन्यांची संशोधन केंद्रे इस्रायलमध्ये आहेत. इस्रायलमध्ये शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अशा जागतिक कंपन्यांमध्ये इंटर्नशीपची संधी मिळते आणि नोकरी मिळत असल्यास शिक्षण संपल्यानंतरही तिथे राहता येते. इस्रायली विद्यापीठांचा जगातील (खासकरून अमेरिका आणि युरोपातील) सर्वोत्तम विद्यापीठांशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे इस्रायलमध्ये पदवी-पद्व्युत्तर शिक्षण घेतल्यास अशा विद्यापीठांची दारे तुमच्यासाठी सहज उघडतात. भारत-इस्रायल यांच्यात वार्षकि पाच अब्ज डॉलर व्यापार असल्यामुळे शिक्षण झाल्यावर भारतात यायचे तरी अनेक उत्तम पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असतात.
इस्रायलमध्ये उद्योजकतेला महत्त्व दिले जात असल्याने तिथे शिकायला गेलेले अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी स्वत:ची स्टार्ट-अप कंपनी उघडायला प्राधान्य देतात.
तेल-अविव विद्यापीठात शिकण्यासंबंधी अधिक माहितीसाठी संपर्क- श्रीमती दलित पास्रेर (मार्केटिंग संचालक)
ई-मेल: parsser@tau.ac.il