सुट्टीत नेहमीच्या रुटीनपासून ब्रेक हवा, खेळायला मिळायला हवं आणि मजा यायला हवी, तरच सुट्टीची खरी मौज आहे. सुट्टीतला अभ्यास प्लॅन करताना स्वत: मुलांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्याही हे ध्यानात असणं फार महत्त्वाचं आहे.दिवाळी आता आठवडय़ाभरावर आली आहे, काही शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत आणि काही शाळांच्या संपायच्या मार्गावर आहेत. घरीदारी सुट्टय़ांचे वेध लागले आहेत. सणासुदीची गंमत, सहली, प्रवास, खरेदी असा सुट्टय़ांचा सगळा एकदम भरगच्च प्लॅन असतो. दररोजची शाळा, क्लास, तोच तोच अभ्यास या चक्रात अडकलेल्या मुलांना जराही इकडे तिकडे हलायला वाव नसतो. त्यांनाही निवांतपणा, मोकळा वेळ, स्वातंत्र्य हवं असतं. सुट्टीच्या निमित्ताने अशी संधी मुलांना मिळते. पण त्यातही बऱ्याचशा शाळांमधून मुलांना दिवाळीचा भरपूर अभ्यास दिलेला असतो.
दोन किंवा तीन आठवडय़ांच्या सुट्टीत मुलांचा अभ्यासाचा टच सुटू नये, एरवी ज्या गोष्टी करायला जमत नाहीत (म्हणजे रोजचं लेखन, पाढे म्हणणं) त्या केल्या जाव्यात, हा वेळ सत्कारणी लागावा असा त्यामागचा चांगला हेतू. पण काही मोजक्या शाळा वगळता एकंदर दिवाळीच्या अभ्यासाच्या आघाडीवर काय स्थिती दिसते?
रोज शुद्धलेखन (मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही भाषांमध्ये) रोजचे पाढे लिहिणं (हे प्राथमिक शाळेसाठी), रोज पाच उदाहरणं सोडवणं, दिवाळीशी संबंधित हस्तकला चित्रकलेचं काही काम, एखादा काही संग्रह करणे (उदा. बिया, पाने, चित्र) एखादं मॉडेल बनविणे, काही ठराविक निबंध लिहिणे असे फार सरधोपट अभ्यास त्यात दिलेले असतात. माध्यमिक शाळांमध्ये दिवाळीत हमखास प्रोजेक्ट येतो. एकंदरच मुलांना सुट्टीत अभ्यास करायला कंटाळाच येतो, त्यात जर वर्षांनुवर्षे त्याच प्रकारचे गृहपाठ असतील तर शिक्षक, मुलं, पालक कुणालाच त्यात फारसा रस नसतो. तो बराचसा साठून राहतो, त्यामुळे शेवटच्या दोन-चार दिवसांत तो कसा तरी उरकून टाकला जातो. त्याचा पालक म्हणून त्रासच जास्त होतो. पण सुट्टी सुरू झाल्यापासून हा अभ्यास मुलांकडून कसा करून घेता येईल, त्यातून खरोखरच मुलांची काही वेगळी कौशल्यं जोपासता येतील का, याचा आज विचार करून पाहू या आणि कल्पना सुचवून दिली तर यातल्या बहुतेक गोष्टी मुलांना स्वत:च्या स्वत:ला करता येण्यासारख्या आहेत. ‘अ अभ्यासाचा’ या सदरातून मुलांना अभ्यास आपला वाटला पाहिजे याबद्दल आपण वारंवार बोलतो आहोत. एखादी गोष्ट करताना मुलांना मजा आली, तर ती त्यांना पुन्हा स्वत:हून करावीशी वाटते. ही साधी मेख यातली आहे.
आपण अगदी टिपिकल अशा रोजच्या शुद्धलेखनापासून सुरुवात करू. रोज एखाद्या पुस्तकात पाहून उतारा लिहिला पाहिजे, असं आहे का? यात आपल्याला वेगळं कसं काय करता येईल, ते पाहू या.
* छोटय़ा मुलांना कार्टून कॅरॅक्टर्स आवडतात. मुलं त्यांच्या लकबी, हावभाव हुबेहूब करून दाखवतात. अशा पात्रांच्या तोंडचे संवादच शुद्धलेखन म्हणून लिहिता येतील.
* संभाषणाच्या स्वरूपातलं लेखन. मग ते दोन मित्रांमधलं असेल, आजी-आजोबांमधलं असेल किंवा आजोबा-नातवंडांमधलं असेल, हे संभाषण गमतीचं असू शकतं. किंवा चौकशी, भांडण अशा कोणत्याही स्वरूपाचं. यात खूप मजा मजा करणं शक्य आहे. मुळात हे संभाषण मुलांच्या स्वत:च्या अनुभवविश्वाशी निगडित असल्यामुळे प्रत्येकाकडे त्यात सांगण्यासारखं काही तरी असतंच.
* बहुसंख्य मुलांना जोक्स आवडतात. त्यामुळे एखादा जोक लेखन म्हणून लिहिता येईल.
* कोडं किंवा शब्दकोडय़ासाठी शब्दांची यादी तयार करणं, हाही एखादा लेखनाचा स्वाध्याय होऊ शकेल.
* एखाद्या सिनेमा किंवा नाटकातला प्रसंग लिहिता आला तोही स्वत:च्या शब्दात तर यात अनेक गोष्टी साध्य होऊन जातात.
शुद्धलेखनासारखा प्रकार पाढय़ांबाबत होतो. रोज पाढे लिहिले तर पाहिजेत. नुसती पानं भरत राहण्याला काही अर्थ नाही. ते पाठही व्हायला हवेत ना! त्यासाठी काय करता येईल पाहू या.
* आजची तारीख सम असेल तर सगळे सम पाढे लिहायचे किंवा म्हणायचे. विषम तारखेला विषम पाढे.
* पाढे म्हणताना मधला एक टप्पा वगळून म्हणायचा. म्हणजे सात एके सात, सात त्रिक एकवीस, सात पंचे पस्तीस..
* पाढय़ांची चौकट (टेबल) नेहमीसारखी आखून घ्यायची. पण नेहमी उभे पाढे लिहितो, तर कधी आडवे पाढेही लिहायचे. म्हणजे समजा चोकचा पाढा लिहायचा झाला तर तो अकरा चोक चव्वेचाळीस, बारा चोक अठ्ठेचाळीस, तेरा चोक बावन्न.. यात मग आडव्या ओळीतल्या दोन लगतच्या संख्यांमधला फरक तेवढाच असतो, हे आपोआप लक्षात येईल. (गंमत म्हणजे संस्कृत शब्दांची रूपं लक्षात ठेवायलाही हीच तंत्रं कामी येतील.)
* कधी संख्यांच्या चिठ्ठय़ा तयार करता येतील आणि रोज कोणत्याही पाच चिठ्ठय़ा उचलायच्या आणि त्यात येईल त्या संख्येचा पाढा लिहायचा असे करता येईल. मुळात पाढे प्रकरण रंजक करायचं असेल तर रोज पाढे लिहून असा कडवा आग्रह शाळेने धरून उपयोगाचं नाही. त्यात थोडी तरी लवचिकता हवी.
गणितात अचूक आकडेमोडीला पर्याय नाही, त्यासाठी रोज ५ उदाहरणं सोडवणं हा तर चांगला उपाय आहे, खास करून ज्यांना गणित खूप सहज येत नाही किंवा आकडेमोडीमध्ये गोंधळ होतो, अशांसाठी तर हा सराव खासच उपयोगाचा. पण मग उदाहरणं पुस्तकातली किंवा सराव प्रश्नसंचातली असावीत का? ज्यांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार अशा मूलभूत क्रियांचा सराव करायचा आहे, त्यांच्यासाठी प्रत्यक्ष व्यवहारातली उदाहरणं घेता येतील आणि ती केवळ कागदावर न सोडवता मुळात बाजारात जाऊन अनुभवता येतील.
* मोजके पैसे घेऊन बाजारातून अर्धा किलो भाजी, अर्धा डझन फळं आणणं किंवा दिलेल्या यादीनुसार सामान आणणं.
* रेल्वे स्टेशनवर जाऊन तीन फुल दोन हाफ तिकिटं काढणं.
* घरातल्या जेवणाच्या ताटाचा/ ताटलीचा व्यास मोजून परीघ काढणं.
* टी.व्ही.ची उंची इंच, सेंटीमीटर आणि मिलीमीटरमध्ये मोजणं.
* घरातल्या कोणत्याही एका भिंतीचं क्षेत्रफळ काढणं. घरातल्या प्रत्येक फरशीचं क्षेत्रफळ काढणं. अशा किती फरशा एका खोलीत लागल्या आहेत, हे पाहणं. त्या खोलीचं क्षेत्रफळ काढून फरशांची संख्या बरोबर येते हे पडताळून पाहणं.
* बिस्किटाच्या पुडय़ाचं घनफळ काढणं.
अशीच गंमत प्रकल्पाबाबत करता येईल. दर वर्षी दिवाळीसंबंधित काही तरी प्रकल्प असतो, त्यात आपल्याला सरसकट दिवाळी असं न म्हणता दिवाळीशी संबंधित असे काही विषय निवडता येतील. उदाहरणार्थ-
* भारताच्या वेगवेगळ्या भागांत दिवाळी कशी साजरी होते?
* दिवाळीचे पूर्वीपासूनचे फराळाचे जिन्नस.
* आकाशकंदिलांचा उगम कसा झाला, त्यांचे प्रकार
* रांगोळ्यांमधलं प्रांताप्रांतामधलं वैविध्य.    
* फटाके, त्यात वापरली जाणारी रसायनं, फटाक्यांची निर्मिती कुठे आणि कशी होते?
या सगळ्यात मुलांना कल्पनाशक्ती वापरता येते, निवडीला वाव राहतो, नेहमीपेक्षा काही तरी वेगळं करता येतं, हे फार महत्त्वाचं.
मुलांबरोबर वाचणं हा तर सुट्टीतला फार छान उद्योग होतो. आवडीच्या विषयाचं पुस्तक निवडलं तर मजाही येते आणि वाचनाचाही सराव होतो. ज्यांना वाचायला जड जातं, आवडत नाही अशांबरोबर थोडं वाचून दाखवणं, थोडं आईबाबांनी वाचणं असं नेटाने करावं लागतं, त्यासाठी विषय मात्र त्यांच्या इंटरेस्टचा असायला हवा.
बऱ्याचदा एखादा विषय मुलांना समजलेला नसतो. मुलांचे एखाद्या विषयातले मार्क्स पाहून किंवा त्यांचा अभ्यास घेताना पालक म्हणून आपल्याला हे जाणवलेलं असतं किंवा एकंदरच आपल्या मुलाचा एखादा विषय कच्चा राहून गेलेला असतो आणि जसजसा अभ्यास वाढत जातो, तसा आधीच्या वर्गातल्या संकल्पना स्पष्ट व्हायला वावच राहत नाही आणि आधीच्या संकल्पना स्पष्ट नाहीत म्हणून पुढच्या कळत नाहीत, अशा दुष्टचक्रात मुलं अडकली जातात आणि मुळातून काही संकल्पनांवर काम करायचं तर रोजच्या धबडग्यात त्यासाठी वेळ कुठे असतो? म्हणून सुट्टीत आधीच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी वेळ देता येईल.
पाचवीत गेलं की चौथीचा अभ्यास सोपा वाटतो आणि अकरावीत गेलं की दहावीचा. हा आपला सगळ्यांचा अनुभव असतो. हे असं का होतं? बऱ्याचदा पुढच्या काही गोष्टी शिकलं की आधीच्या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहता येतं. त्यानेही खूप फरक पडतो आणि एकदा या अभ्यासक्रमावर आधारित असा पेपर लिहायचा नाही, हे मनात असलं की शिकणं मग परीक्षेसाठी राहत नाही, ते स्वत:साठी होतं, मग सगळी मानसिकताच बदलून जाते.
अशा गोष्टी मुलांच्या मुलांना जाणवल्या तर उत्तमच. पण ज्यांना आपणहून ते कळत वळत नाही, अशांना आपण ते कसं सांगतो, हे फार महत्त्वाचं ठरतं. ‘तुझा अमुक भाग कच्चा आहे ना, म्हणून आता जरा पाचवीच्या पुस्तकातली उदाहरणं सोडव’, असं म्हटलं तर मुलाला ते अपमानास्पद वाटण्याची शक्यताच जास्त. मग पुढे त्यातून नेट लावून तो काही करेल हे कठीणच. म्हणून मग, ‘आपण जरा आधीची उदाहरणं सोडवून पाहू या.’ ‘भागाकाराची आणखी थोडी प्रॅक्टिस करायला हवी असं वाटतं’, ‘चौकोनांच्या प्रकाराचे गुणधर्म सगळे एकदम आले की गोंधळायला होतंय, त्याची सुट्टीत थोडी रिव्हिजन करून पाहू या’, ‘संस्कृतचा ‘भगवत्’ शब्द अडतोय तर त्याचंही पाढय़ांप्रमाणे टेबल करू या’, अशा वाक्यांमधून सकारात्मकता दिसते.
भूगोल हा तर अनेकांचा खास नावडता विषय असतो. अशांकडून तो अभ्यास करून घ्यायचा असेल तर बरीच चिकाटी लागते. त्यातले नकाशे हे प्रकरण तर अनेकांना फार आवाक्याबाहेरचं वाटतं. खरं तर ज्यांना नकाशे आवडत नाहीत, त्यातल्या बऱ्याच जणांना ते योग्य प्रकारे वाचायला कधी शिकवलेलंच नसतं. त्यामुळे त्यांना नकाशा डोळ्यासमोर आणता येत नाही. नकाशा समोर ठेवून (किंवा गुगल मॅप्सवर जाऊन) त्यातली वेगवेगळी ठिकाणं शोधून काढत राहिलं तर नकाशे डोळ्यासमोर आणणं जमू लागतं. पण ज्यांना हे सहजासहजी जमत नाही, त्यांच्यासाठी नकाशे पुन्हा पुन्हा नजरेखालून जावे लागतात. एखादा नकाशा ओळखीचा झाला, की भूगोलातल्या खूपशा गोष्टींचा बाऊ वाटणं कमी होतं. मात्र यासाठी वेळ द्यावा लागतो. असा वेळ सुट्टीशिवाय कुठून मिळणार?
अनेकदा विज्ञानाच्या पुस्तकात मुलांनी करून पाहावे असे साधे प्रयोग, कृती दिलेल्या असतात. त्यातल्या बऱ्याच घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून करता येण्यासारख्या असतात. त्या सगळ्याच काही शाळा सुरू असताना करायला जमतात असं नाही. त्या करून पाहण्यातही एक वेगळी गंमत आहे. मुलांना त्यात खूप रस वाटतो. आपण आतापर्यंत ‘अ अभ्यासाचा’ या सदरातून ‘लर्निग स्टाइल्स’बद्दल बरंच बोललो आहोत. केनेस्थेटिक मुलांना (चळवळी, सतत हालचाल, हातचाळा सुरू असणारी, खेळ अतिप्रिय असणारी मुलं) सहसा अभ्यास नको असतो आणि तो सुट्टीतला अभ्यास असेल तर खासच नकोसा असतो. अशा मुलांसाठी विज्ञानाचे प्रयोग म्हणजे अलिबाबाची गुहा उघडल्यासारखं होतं. अशी मुलंही प्रयोगांमध्ये खूप रमतात.
सुट्टी मुलांना रोजच्या रुटीनमधून मोठा ब्रेक देते, त्यात काही तरी वेगळं करायला- शिकायला त्यांना वाव मिळतो. आजकाल स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मुलं सुट्टीभर बांधली गेलेली असतात. नववी-दहावीपासून तर मुलांचे क्लासेस सुट्टीत जास्त वेळ घेतले जातात. बरीचशी मुलं शाळा सुरू असताना खेळूच शकत नाहीत, असं चित्रं तर आता महानगरच नाहीत तर लहान शहरांमधूनही दिसत आहे. अशा मुलांसाठी सुट्टीत खेळायला मिळणं ही तर फारच महत्त्वाची बाब ठरते. त्यामुळे सुट्टीत नेहमीच्या रुटीनपासून ब्रेक हवा, खेळायला मिळायला हवं आणि मजा यायला हवी, तरच सुट्टीची खरी मौज आहे. सुट्टीतला अभ्यास प्लॅन करताना स्वत: मुलांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्याही हे ध्यानात असणं फार महत्त्वाचं आहे.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता