नवागत आणि अनुभवी संशोधकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनपर कामासाठी प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)तर्फे फेलोशिप्स देण्यात येतात. २०१५-२०१६ या शैक्षणिक सत्रासाठी देण्यात येणाऱ्या संशोधनपर फेलोशिपसाठी पात्रताधारक संशोधक-उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
फेलोशिपची संख्या
या योजनेअंतर्गत १८ फेलोशिप देण्यात येणार असून त्यापैकी १२ फेलोशिप्स युवा वैज्ञानिकांसाठी आहेत तर सहा फेलोशिप्स अनुभवी संशोधकांसाठी उपलब्ध आहेत.
शैक्षणिक अर्हता
अर्जदारांनी वैद्यकशास्त्र अथवा संबंधित विषयातील एम.डी. अथवा पीएच.डी. यांसारखी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संशोधनपर कार्यामध्ये रुची असायला हवी.
अनुभव
उमेदवारांपैकी युवा संशोधकांना संबंधित क्षेत्रातील कामाचा तीन वर्षांचा तर अनुभवी संशोधकांना संशोधनपर कामाचा १५ वर्षांचा अनुभव गाठीशी असावा.
वयोमर्यादा
युवा उमेदवारांचे वय ४५ वर्षांपेक्षा अधिक तर अनुभवी उमेदवारांचे वय ५७ वर्षांहून अधिक नसावे.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना ‘आयसीएमआर’तर्फे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
फेलोशिपचा तपशील
निवड झालेल्या उमेदवारांना विदेशातील वैद्यक शिक्षण व संशोधन संस्थांमध्ये १० ते १५ दिवसांपासून तीन ते सहा महिने कालावधीसाठी संशोधनपर फेलोशिप देण्यात येईल.
या कालावधीत निवड झालेल्या संशोधक उमेदवारांना युवा  संशोधकांना दरमहा तीन हजार अमेरिकन डॉलर्स व आकस्मिक खर्चापोटी २० हजार रुपये तर अनुभवी संशोधकांना प्रत्येक दिवशी २०० अमेरिकन डॉलर्स व आकस्मिक खर्चापोटी २० हजार रुपये संशोधन कालावधीत फेलोशिप स्वरूपात देण्यात येतील.
या फेलोशिपचा कालावधी फेब्रुवारी २०१६ पर्यंत असेल.
अधिक माहिती
संशोधनपर फेलोशिप योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची जाहिरात पाहावी अथवा आयसीएमआरच्या   
http://www.icmr.nic.in   या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्रे आणि विदेशातील संशोधन संस्थेच्या आमंत्रणपत्रासह असणारे अर्ज इंटरनॅशनल हेल्थ डिव्हिजन (आयएचडी), इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, ५, रामलिंगस्वामी भवन, पोस्ट बॉक्स नं. ४९११, अन्सारीनगर, नवी दिल्ली- ११००२९ या पत्त्यावर १० मार्च २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.