स्वयंपाकघरातील एल.पी.जी.वर चालणारी शेगडी पेटवण्यासाठी आता अनेक ठिकाणी लायटरचा वापर केला जात असला तरी त्यामुळे आगपेटी हद्दपार झालेली नाही. आगपेटीच्या काडय़ांचा आजही मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. कोणत्याही खरखरीत किंवा विशिष्ट प्रकारच्या पृष्ठभागावर घासल्यावर पेट घेऊ शकेल, पण त्यामुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही, असं रासायनिक पदार्थाचं मिश्रण ज्या काडीच्या टोकाला लावलेलं असतं, ती ‘आगकाडी’!
दैनंदिन जीवनात विस्तवाचा उपयोग स्वयंपाक करण्यापासून ते कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या औद्योगिक प्रक्रिया करण्यापर्यंत अनेक ठिकाणी केला जातो. पण, विस्तव निर्माण करणं ही गोष्ट आपल्याला वाटते तेवढी सोपी नव्हती. विशिष्ट प्रकारचे दगड एकमेकांवर घासून अग्नी प्रज्वलित करण्याचा यशस्वी प्रयत्न प्राचीन काळीच मानवाने करून दाखवला असला तरी आपल्याला हवा तेव्हा सोप्या पद्धतीने विस्तव कसा निर्माण करायचा ही मोठी समस्या होती.
एखाद्या रासायनिक अभिक्रियेच्या मदतीने आपल्याला हवा तेव्हा अग्नी निर्माण करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळाली ती तुलेनेने अगदी अलीकडे म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला! खरं म्हणजे, आगकाडीमध्ये असलेल्या महत्त्वाच्या घटकाचा, फॉस्फरसचा शोध १६६९ सालीच हेिनग ब्रँड या जर्मन किमयागाराने (अल्केमिस्ट) लावला होता. फॉस्फरसचा समावेश असलेला आणि बराच काळ जळत राहील असा क्षार शोधण्यातसुद्धा त्याला यश आलं होतं. पण आपल्या या शोधाचा उपयोग करून कुणीतरी भरपूर प्रमाणात सोनं तयार करेल, या भीतीपोटी त्याने आपल्याला लागलेला शोध अनेक र्वष गुप्त ठेवला.
पुढे रॉबर्ट बॉईल या ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञाने फॉस्फरस आणि गंधक एकमेकांवर घासून विस्तव पेटू शकतो हे दाखवून दिलं. आपल्याला हवा तेव्हा अग्नी पेटवू शकण्याच्या या पद्धतीचा फायदा त्यावेळच्या ना शास्त्रज्ञांनी करून घेतला, ना इतर लोकांनी. त्यानंतर तब्बल दीडशे र्वष रासायनिक पदार्थाचा उपयोग करून आग निर्माण करण्याचे फारसे प्रयत्न कुणी केले नाहीत.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला पोटॅशियम क्लोरेट, शर्करा आणि िडक यांचं मिश्रण लावलेली काडी सल्फ्युरिक आम्लात बुडवली तर पेट घेते, हे लक्षात आलं, पण ही पद्धत अत्यंत धोक्याची आणि वापरण्याच्या दृष्टीने गरसोयीची असल्याने लवकरच मागे पडली.
१८२७ साली अपघातानेच एक घटना घडली; अगदी ध्यानीमनी नसताना! वैद्यक आणि औषधशास्त्राचं शिक्षण घेतलेला, पण रसायनशास्त्रात विशेष रुची असलेला ब्रिटिश संशोधक जॉन वॉकर काही प्रयोग करण्यात गुंतला होता. एका भांडय़ात अँटिमनी सल्फाइड, पोटॅशियम क्लोरेट, स्टार्च आणि िडक यांचं मिश्रण लाकडी काठीने ढवळून त्याने ठेवलं होतं. थोडय़ा वेळाने जॉन वॉकरचं लक्ष त्या लाकडी काठीकडे गेलं. काठीच्या टोकाला मिश्रणाचा घट्ट गोळा तयार झाला होता. हा गोळा खरवडून काढण्यासाठी त्याने काठी जमिनीवर घासली. आश्चर्य म्हणजे, काठीवर जमा झालेल्या त्या मिश्रणाच्या घट्ट गोळ्याने पेट घेतला.. आणि आपण सध्या ज्या स्वरूपात आगकाडी वापरतो, त्या आगकाडीचा जन्म झाला.
संशोधक वृत्तीमुळे या घटनेचा अर्थ आणि महत्त्व जॉन वॉकरच्या ताबडतोब लक्षात आलं. या प्रक्रियेमुळे आपल्याला हवं तेव्हा आणि अगदी सुलभपणे अग्नी प्रज्वलित करता येणार होता. वॉकरने मग तीन इंच लांबीच्या लाकडी काडय़ांना ज्वलनशील मिश्रण लावलं आणि पहिल्यावहिल्या आगकाडय़ा तयार केल्या. त्यांना वॉकरने ‘घर्षण आगकाडय़ा’ असं नाव दिलं होतं. या घर्षण आगकाडय़ा पत्र्याच्या लंबगोलाकार डब्यांमध्ये भरून त्याने स्थानिक पुस्तक विक्रेत्याच्या दुकानात विक्रीसाठी ठेवल्या. घर्षण आगकाडय़ा पेटवण्यासाठी वॉकरने प्रत्येक डबीमध्ये खरकागदाचा तुकडा ठेवला होता. ५० घर्षण आगकाडय़ा असलेल्या एका डबीची किंमत एक शििलग होती.
वॉकरने तयार केलेल्या घर्षण आगकाडय़ांच्या ज्वलनाने तीव्र वास यायचा. पण तरीदेखील अपघाताने लागलेला वॉकरचा हा शोध प्रचंड लोकप्रिय ठरला. मोठय़ा प्रमाणावर घर्षण आगकाडय़ांची निर्मिती करण्याचे प्रस्ताव घेऊन अनेक व्यावसायिक वॉकरकडे आले. पण वॉकरला या आगकाडय़ांचा व्यवसाय करून पसे कमावण्यात किंवा या शोधाचं एकस्व मिळवण्यात अजिबात स्वारस्य नव्हतं. उलट या बाबतीत रस घेणाऱ्या प्रत्येकाला घर्षण आगकाडय़ा कशा करायच्या याचं प्रात्यक्षिक तो दाखवत असे.
कालांतराने आगकाडय़ा आणि आगपेटय़ा यांच्यात सुधारणा होत गेल्या; स्वरूप बदलत गेलं आणि आगकाडय़ांमधील घटक पदार्थही बदलले. आपण आज वापरतो त्या ‘सेफ्टी मॅच स्टिक्स’ म्हणजे सुरक्षित आगकाडय़ा १८५५ साली जोहान एडवर्ड लुंडस्ट्रॉम याने केल्या. जोहान लुंडस्ट्रॉम हा स्वीडनमध्ये आगकाडय़ांची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा मालक होता. त्याने आगकाडीला लावण्यात येणाऱ्या मिश्रणात लाल फॉस्फरसचा वापर केला.
आपल्या आवश्यकतेनुसार सुलभपणे अग्नी निर्माण करणाऱ्या साधनाचा म्हणजेच आगकाडय़ांचा शोध लावल्याबद्दल दुर्दैवाने जॉन वॉकरला ना पसा मिळाला, ना प्रसिद्धी! जी काही प्रसिद्धी त्याला मिळाली ती त्याच्या मृत्यूनंतर. पण वापरण्यासाठी आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी सुलभ असलेल्या आगकाडय़ा आज आपल्याला उपलब्ध झाल्या आहेत त्या जॉन वॉकरला अपघाताने लागलेल्या शोधामुळे आणि त्याच्या संशोधक  वृत्तीमुळेच, हे मात्र नक्की!    ल्ल                                                                                
hemantlagvankar@gmail.com