‘गरज’ ही शोधाची जननी आहे, असं म्हटलं जातं. सुखरंजन मिस्त्री या तिशी ओलांडलेल्या युवकाच्या बाबतीत हे वाक्य तंतोतंत खरं ठरलं. सुखरंजन मिस्त्री हा उत्तराखंड राज्यातल्या उधमसिंग नगर जिल्ह्यात शक्ती फार्म नावाच्या खेडेगावात राहणारा. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुखरंजनचं बालपण गावातल्या इतर मुलांप्रमाणेच गेलं. गावात जितकी शिक्षणाची सोय होती तितकं शिक्षण गावात झालं आणि मग पुढच्या शिक्षणासाठी सुखरंजन रुद्रापूर इथे गेला. तिथल्याच कॉलेजमधून त्याने बी.ए.ची पदवी घेतली.
पदवी घेतल्यावर सुखरंजन पुन्हा आपल्या गावात परतला. गावातल्या राहत्या घराची दुरुस्ती करावी आणि त्यामध्ये काही सोयीसुविधा करून घ्यावात अशी सुखरंजनचे वडील मेघनाथ यांची इच्छा होती. मुख्य म्हणजे त्यांना आपल्या घराचं छत नीट करून घ्यायचं होतं. पण अडचण अशी होती की, त्यासाठी पुरेसे पसे त्यांच्याकडे नव्हते. सुखरंजनने मग स्वत:च घराच्या छतासाठी कौलं तयार करायचं ठरवलं. कौलं मजबूत व्हावीत यासाठी त्याने मातीऐवजी सिमेंटची कौलं तयार करायचा निर्णय घेतला. पण प्रत्यक्षात उलटंच घडलं. नुसत्या सिमेंटच्या वापरामुळे कौलांना मजबुती तर आली नाहीच; पण ती ठिसूळ झाली. त्यामुळे सिमेंटची कौलं करण्याचा नाद सुखरंजनने सोडून दिला.
काही दिवसांनी शहरात कामासाठी गेलेल्या सुखरंजनचं लक्ष तिथे सुरू असलेल्या पूल बांधणीच्या कामाकडे गेलं. या बांधकामात सिमेंट काँक्रीटचा वापर केला जात होता. सुखरंजन या कामाचं बारकाईने निरीक्षण करायला लागला. यातून त्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की, सिमेंटच्या बांधकामाला जर मजबुती प्राप्त व्हायला हवी असेल तर त्यामध्ये इतरही काही घटक मिसळावे लागतील आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, हे घटक एकमेकांमध्ये व्यवस्थितपणे मिसळले जाणं आवश्यक आहे. त्यासाठी मिश्रण घुसळणारा मिक्सर या साऱ्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचप्रमाणे सिमेंट काँक्रीटचं मिश्रण घट्ट होताना त्यामध्ये फटी किंवा पोकळ्या राहू नयेत म्हणून हे मिश्रण जिथे टाकलं आहे, तिथे यंत्राच्या मदतीने कंपनं निर्माण केली जातात.
गावातलं आपलं घर शाकारायला लागणारी कौलं तयार करण्यासाठी अशी सगळी यंत्रणा वापरणं हे अर्थातच सुखरंजनच्या आवाक्याबाहेरचं होतं. सिमेंट असलेलं मिश्रण घुसळण्यासाठी आणि ते स्थिरस्थावर होताना कोणत्याही पोकळ्या राहू नयेत यासाठी ते मिश्रण घट्ट होताना त्यामध्ये कंपनं निर्माण करणं आवश्यक आहे, ही गोष्ट सुखरंजनच्या डोक्यातून जाईना. मग त्यासाठी त्याने कंपन निर्माण करणारं यंत्र तयार करण्याचं मनावर घेतलं. मग अर्थातच वडिलांशी सल्लामसलत झाली आणि दोघेही असं यंत्र तयार करण्याच्या उद्योगाला लागले. सुरुवातीला या यंत्राचा आराखडा तयार झाला. या आराखडय़ाप्रमाणे यंत्र तयार करून ते व्यवस्थित काम करतं की नाही हे पाहाणं, हा दुसरा टप्पा होता.
जुनी फळकुटं, वापरत नसलेल्या सायकलचं चाक, दोन लोखंडी सळ्या आणि जाड दोरी अशी साधनसामग्री वापरून टेबल तयार झालं. या यंत्रातला मुख्य भाग होता, कौल तयार करण्याची फ्रेम. ही फ्रेम कशी असावी यावर विचार करण्यातच जवळपास महिना गेला. पण शेवटी अगदी मनासारखं यंत्र तयार झालं.
सुखरंजनने तयार केलेलं यंत्र अगदी साधं आहे. हे यंत्र चालवायला वीज लागत नाही. दोन्ही पायांनी पायडल मारून चाक फिरवलं जातं आणि चाक गतिमान झालं की टेबलवर चार िस्प्रगवर बसवलेली फ्रेम कंपन पावायला लागते.
कौल तयार करण्यासाठी वाळू, सिमेंट आणि पाणी यांचं योग्य प्रमाणातलं घट्ट मिश्रण घेतलं जातं. हे मिश्रण टेबलावर बसवण्यात आलेल्या फ्रेमवर ठेवण्यात आलेल्या पॉलिथिनच्या कागदावर एकसारखं पसरलं जातं. एकसारख्या जाडीचं मिश्रण पॉलिथीनच्या कागदावर पसरल्यावर दोन्ही पायांनी पायडल मारून यंत्राचं चाक फिरवलं जातं. त्यामुळे निर्माण झालेल्या कंपनांमुळे पॉलिथीन कागदावर पसरलेलं वाळू-सिमेंटचं मिश्रण चांगल्या प्रकारे स्थिरस्थावर होतं. मग पॉलिथिन कागद मिश्रणासकट फ्रेमवरून खाली सरकवून साच्यावर घेतला जातो. साच्यामुळे या मिश्रणाला वक्राकार प्राप्त होतो. मिश्रण चांगलं सुकल्यावर तयार झालेलं कौल पॉलिथीन कागदापासून वेगळं केलं जातं.
सुखरंजनने तयार केलेल्या या यंत्राचा महत्त्वाचा फायदा म्हणजे कौलं तयार करण्यासाठी लागणारा अत्यंत कमी वेळ! कोणत्याही यंत्राची मदत न घेता केवळ हातांच्या मदतीने मातीची कौलं तयार करणं हे खूपच वेळखाऊ काम आहे. मात्र सुखरंजनने तयार केलेल्या या यंत्राच्या मदतीने एका मिनिटात एक कौल याप्रमाणे दिवसभरात ३०० कौलं तयार करणं शक्य होतं. हे यंत्र वापरण्यासाठी अतिशय सोपं असल्याने अकुशल कामगारसुद्धा या यंत्राच्या मदतीने कौलं तयार करू शकतो.
आपलं घर शाकारण्यासाठी कमीत कमी खर्चात कौलांची गरज असल्याने सुखरंजनने हे यंत्र तयार केलं. पण हेच यंत्र आता अनेकांच्या रोजगाराचं साधन बनलं आहे. या वैशिष्टय़पूर्ण यंत्राबद्दल ‘नॅशनल इनोव्हेशन फौंडेशन’तर्फे राष्ट्रीय पुरस्कार देऊन सुखरंजनचा गौरव केला. इतकेच नव्हे तर या यंत्राचं स्वामित्व हक्क मिळवण्यासाठीही मोलाची मदत केली.
केवळ आपलंच घर नव्हे, तर अनेकांची घरं उत्तम, सुरक्षित आणि मजबूत अशा कौलांनी शाकारली जावीत, अशीच हे यंत्र तयार करणाऱ्या सुखरंजन मिस्त्रीची भावना आहे.     
hemantlagvankar@gmail.com