देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये कृषी क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतीच्या उत्पादन वाढीत कृषी शिक्षणाचा व संशोधनाचा मोलाचा वाटा असतो. देशाची अर्थव्यवस्था व विकास दर शेतीच्या उत्पादकतेवर अवलंबून आहे. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी, तसेच कृषिसंलग्न व्यवसायाची भरभराट होण्यासाठी कृषी व कृषिसंलग्न विषयातील शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. फळ उत्पादनाकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येतो. त्यामुळेच आज अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा फळांचे उत्पादन वाढलेले दिसून येते. दुग्ध उत्पादन, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन याकडे शेतीपूरक व्यवसाय म्हणून पाहिले जाते. शेतीमध्ये काम करण्यासाठी मजुरांची कमतरता भासू लागल्यामुळे कृषी अवजारांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळून स्वयंचलित अवजारांचा शेती व्यवसायात वापर वाढलेला दिसून येतो. शेतीसाठी पाण्याची कमतरता भासू लागल्यामुळे सूक्ष्मसिंचन पद्धतीचा वापर वाढलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करता उत्कृष्ट शेती व्यवसायासाठी कृषी व कृषिसंलग्न क्षेत्रात उदा. उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, अन्न-तंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान, मत्स्य विज्ञान, वनिकी व पशुसंवर्धन या विषयांतील प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे काळाची गरज आहे.
आज कृषी क्षेत्रात अनेक बाबींना महत्त्व प्राप्त झाले आहे. आर्थिक गुंतवणूक, कृषी मालासाठी उपलब्ध असलेली बाजारपेठ, अधिक उत्पादकतेसाठी स्पर्धात्मकता, अत्याधुनिक अवजारांचा उपयोग, प्रक्रिया उद्योग, तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर, शेतीपूरक उद्योगाची निर्मिती, दुग्धोत्पादन या बाबींचा शेती व्यवसायामध्ये समावेश झालेला दिसून येतो. लोकसंख्या वाढीमुळे अन्नधान्याची उत्पादकता वाढवणे, भाजीपाला व फळे यांचे गरजेनुसार अधिक उत्पादन करणे आवश्यक ठरत आहे. त्यामुळे कृषी आणि उद्यानविद्या या शाखांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या विषयात कुशल मनुष्यबळ निर्माण करणे आवश्यक झाले आहे.  कृषी उद्योगासाठीच्या प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी अन्न-तंत्रज्ञान महाविद्यालयांची आवश्यकता भासत आहे. सध्या शेती कामासाठीच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे उत्पादकतेवर परिणाम झालेला दिसून येतो. यामुळेच कृषी अभियांत्रिकीद्वारे शेती अवजारांची निर्मिती, इतर  प्रक्रिया व सूक्ष्मसिंचन पद्धत महत्त्वाच्या ठरतात. शेती व्यवसाय हा फक्त शेतीमालाची उत्पादकता वाढवणे एवढय़ावर अवलंबून न राहता शेतीसंलग्न व्यवसायांमधून शेतीचे एकत्रित उत्पादन वाढवणे आज क्रमप्राप्त बनले आहे. भाजीपाला व फळांच्या अधिक उत्पादनामुळे प्रक्रिया उद्योगाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
आजच्या घडीला देशभरात ५३ कृषी विद्यापीठे, पाच अभिमत विद्यापीठे, एक केंद्रीय कृषी विद्यापीठ आणि चार केंद्रीय विद्यापीठे कार्यरत आहेत. या सर्व विद्यापीठांमधून कृषी क्षेत्रासाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार केले जाते.
राज्याची वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती, हवामान व पीक पद्धतीचा विचार करून १९६९ ते १९७२ या कालावधीत महाराष्ट्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठ (१९६९), राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख, कृषी विद्यापीठ, अकोला (१९६९), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (१९७२) आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (१९७२) या चार कृषी विद्यापीठांची स्थापना झाली.

नोकरी/ व्यवसाय संधी
कृषी पदवीधारकांना कृषी विद्यापीठांतर्गत पदवी-पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये व्याख्याता, कृषी तंत्रनिकेतन, कृषी तंत्र विद्यालयांमध्ये शिक्षक हे पद मिळू शकते. शेती विषयात  माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये, कृषीविषयक किमान कौशल्य अभ्यासक्रम राबविण्यात येत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक होता येईल. कृषी विद्यापीठांतर्गत कृषी संशोधन केंद्रामध्ये शास्त्रज्ञ या पदावर तसेच कृषी विस्तार कार्य करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. कृषी पदवीधर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या विविध राष्ट्रीय संशोधन केंद्रांवर शास्त्रज्ञ म्हणून काम करू शकतात. राज्य सरकारच्या कृषी विभागामध्ये विविध पदांवर काम करण्याची संधीही उपलब्ध आहे. याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यामध्येही विविध पदांवर कृषी अधिकारी/ ग्रामसेवक या पदांवर काम करण्याच्या संधी या
पदवीधारकांना आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध विभागातील उदा. महसूल विभाग, वन विभाग, पोलीस खाते, वित्त विभाग इत्यादी विभागांमध्ये वर्ग-१, वर्ग-२ पर्यंतच्या सर्व पदांवर कृषी पदवीधारकांना नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. या पदावर कृषी पदविकाधारकांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे नेमणूक होत आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी पदवीधर यशस्वी होत आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कृषी अधिकारी/ विकास अधिकारी या पदावर कृषी पदवीधरांची नेमणूक होत आहे. अन्न महामंडळ, पणन महामंडळ व खादी ग्रामोद्योग या ठिकाणीही कृषी पदवीधारकांना नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. सरकारच्या विविध योजनांमध्येही कृषी पदवीधर आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. राज्य व केंद्रस्तरीय विविध प्रयोगशाळांमध्येही कृषी पदवीधारकांना काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी पदवीधरांना विविध पदांवर काम करण्याच्या संधी आहेत. अशा प्रकारे बहुतांश शासकीय सेवेमध्ये कृषी पदवीधारकांना नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
खासगी क्षेत्रामध्येही कृषी पदवीधारकांना अनेक बियाणे, कीटकनाशके, खते, ठिबक व तुषार सिंचन कंपन्या, खासगी क्षेत्रातील बँका, प्रक्रिया उद्योग, तसेच कृषी सेवा सल्ला, विमा कंपन्या व खासगी क्षेत्रातील इतर विविध कंपन्या इत्यादी ठिकाणी काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. या पदवीधारकांना प्रसारमाध्यमे उदा. आकाशवाणी, दूरदर्शन व कृषी पत्रकारिता यामध्येही करिअर संधी आहेत. या पदवीधारकांना सहकारी व खासगी संस्थांच्या प्रक्षेत्र व्यवस्थापनाचे तसेच काटेकोर शेती व्यवस्थापनामध्ये काम करण्याच्या संधी आहेत.
कृषी क्षेत्राशी संलग्न अनेक प्रयोगशाळा, उदा. माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, ऊतीसंवर्धन प्रयोगशाळा, बीजप्रक्रिया, कृषी जैवतंत्रज्ञान, पशुखाद्य पृथक्करण, दुग्धजन्य पदार्थ प्रयोगशाळा तसेच संशोधन व विकास प्रयोगशाळा यामध्ये काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. कृषी पदवीधरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याच्यासुद्धा संधी उपलब्ध आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय बँका, आशियाई विकास बँक, आंतरराष्ट्रीय वित्त, कॉर्पोरेशन, बहुराष्ट्रीय कंपन्या व कृषी आयात-निर्यातीमध्ये काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत.
कृषी पदवीधर विविध उद्योग स्थापन करू शकतात. यामध्ये जैविक खतनिर्मिती, उच्च तंत्रज्ञान शेती, प्रक्रिया उद्योग, शेतीपूरक उद्योग, मशरूम उद्योग, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, पशु-पक्षीपालन, रोपवाटिका, शेळी-मेंढीपालन, रेशीम उद्योग, बीजोत्पादन, दुग्धोत्पादन असे अनेक उद्योग कृषी पदवीधर निर्माण करू शकतात व त्याद्वारे स्वयंरोजगारनिर्मिती होऊ शकते. कृषी पदवीधरांना पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी या उच्च शिक्षणाच्या तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्याही संधी उपलब्ध आहेत. अशा प्रकारे कृषी पदवीधरांना उच्च शिक्षणाबरोबरच शासकीय, निमशासकीय, खासगी, सहकारी क्षेत्रामध्ये राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय बँका व कंपन्या, शैक्षणिक, प्रशासकीय, उद्योग, शास्त्रज्ञ, शिक्षक, व्यवस्थापक, प्रशासकीय सेवा या सर्व क्षेत्रांमध्ये कार्य करण्याच्या संधी उपलब्ध आहेत.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील  कृषी व संलग्न पदवी अभ्यासक्रम
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठातील ३३ घटक व १२४ विनाअनुदानित कृषी व संलग्न महाविद्यालयांतून एकूण १२,६१७ विद्यार्थ्यांना कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येतो.
कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया
पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी किमान बारावी विज्ञान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे प्रवेश दिला जातो. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद, पुणे यांच्याद्वारे कल्प टेक्नॉलॉजी प्रा. लि. (केटीपीएल) पुणेमार्फत ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते.
यासाठी विद्यार्थ्यांनी एकच अर्ज maha-agriadmission.in या संकेतस्थळाला भेट देऊन भरावा. अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावरील प्रवेश माहितीपुस्तिका काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानुसार अर्ज भरावा. प्रवेश माहितीपुस्तिकेमध्ये प्रवेश प्रक्रिया, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
डॉ. बी. आर. उल्मेक, संचालक, शिक्षण
 डॉ. बी. टी. सिनारे, साहायक प्राध्यापक, (कृषी विद्या)
शिक्षण संचालनालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,
 राहुरी, जि. अहमदनगर.

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
gadchiroli lok sabha marathi news, gadchiroli lok sabha election marathi news
७ हेलिकॉप्टर, १५ हजारांहून अधिक जवान, गडचिरोलीत युद्ध क्षेत्राचा भास व्हावा…..
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती