शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या अभ्यासाकडे वळावे आणि त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन मिळावे, याकरता ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना’ राबविण्यात येते. या अंतर्गत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत-
अर्जदार विद्यार्थ्यांसाठीची अर्हता
गट एसए : अर्जदार विद्यार्थ्यांनी विज्ञान विषय घेऊन अकरावीला प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थी सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांच्या दहावीच्या परीक्षेतील गणित व विज्ञान या विषयांसह गुणांची टक्केवारी ८० टक्के (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के) असावी.
गट एसएक्स : अर्जदार विद्यार्थ्यांनी गणित व विज्ञान विषयांसह बारावीच्या अभ्यासक्रमासाठी २०१४-२०१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेश घेतलेला असावा. ते सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांची दहावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी कमीत कमी ८० टक्के (राखीव गटातील उमेदवारांसाठी ७० टक्के) तर बारावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी कमीत कमी ६० टक्के (राखीव गटातील उमेदवारांसाठी ५० टक्के) असावी. त्यांची विज्ञान, गणित, सांख्यिकी यांसारख्या विषयांसह पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी तयारी असावी.
गट एसबी : अर्जदार विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित वा सांख्यिकी विषयांसह २०१४-२०१५ या शैक्षणिक सत्रात पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांत प्रवेश घेतलेला असावा. उमेदवार सर्वसाधारण गटातील असल्यास बारावीच्या गुणांची टक्केवारी वरील विषयांसह कमीत कमी६० टक्के (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के) असावी.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या विद्यमाने देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर
२ नोव्हेंबर २०१४ रोजी घेण्यात येईल.
विद्यार्थ्यांची संबंधित पात्रता, परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणवत्ता क्रमांक याच्या आधारे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी अंतिम निवड करण्यात येईल.
शिष्यवृत्तीची रक्कम व तपशील
किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑगस्ट २०१५ पासून त्यांच्या संबंधित अभ्यासक्रम कालावधीसाठी दरमहा पाच हजार ते सात हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क : अर्जदार विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जासह  ५०० रु. शुल्क भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती : योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजने’ची
जाहिरात पाहावी. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरूच्या http://www.kvpy.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व अंतिम तारीख
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्र असणारे अर्ज ‘दि कन्व्हेनर, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरू – ५६००१२’ या पत्त्यावर २८ ऑगस्ट २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.