Any.do
कमीत कमी वेळात चटकन नोट्स घेण्यासाठी हे अ‍ॅप अत्यंत उपयुक्त ठरतं. दिसायला छान आणि वापरायलाही सहजसोपं असलेलं हे अ‍ॅप काळ्या-पांढऱ्या रंगांच्या थीममध्ये उपलब्ध आहे. नोट्स घेण्यासोबतच कॉल करता येणं, मेसेज पाठवता येणं आणि मीटिंग्सचे वेळापत्रक  ठरवता येणं ही या अ‍ॅपची काही महत्त्वाची वैशिष्टय़े आहेत. फोल्डर व्ह्यू आणि डेट व्ह्यू असे टॉगिलगचे पर्याय यात आहेत. त्यामुळे वेळेनुसार किंवा तुमच्या कामाचे ग्रुप्स आदी प्राधान्यक्रमांनुसार तुम्हाला कामं लावता येतील.
यातलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे आलेल्या मिस्ड कॉल्सना यात रिमाइंडर्स किंवा टास्क म्हणून ठेवता येतं. बरेचदा कामाच्या गडबडीत अथवा मीटिंगमध्ये- लेक्चरमध्ये असताना काही महत्त्वाचे फोन येतात. आपण ते पाहतो, पण नंतर फोन करायला विसरून जातो. अशा वेळी हे अ‍ॅप तुम्हाला आठवण करून देतं. तसंच यामध्ये एखादे टास्क तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या व्यक्तींना जोडता येते. त्यामुळे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला काही दिवसांनी ईमेल करायचा असल्यास तसं आधीच सेटिंग करून ठेवल्यास विशिष्ट दिवशी मेल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अ‍ॅन्ड्रॉइड व आयओएससाठी हे अ‍ॅप उपलब्ध आहे.

Todoist
यात नोट्स आणि टास्कसाठी वेगवेगळ्या विग्नेट्स वापरता येतात. तसंच यात अमर्यादित टास्क तसंच सब-टास्क तयार करण्याची सोय आहे. तुम्हाला त्याची विभागणी करायची असल्यास लेबल्स किंवा रंग वापरता येतात. क्लाउडबेस असल्याने तुमची सगळी माहिती क्लाउडवर साठवली जाते, त्यामुळे हे अ‍ॅप ऑफलाइनही वापरता येतं आणि याचं प्रीमियम व्हर्शन विकत घेतल्यास ईमेल, नोटिफिकेशन्स, एसएमएस आदी सुविधा उपलब्ध मिळतात.

Wunderlist  
अ‍ॅन्ड्रॉइड व आयओएस यूजर्समध्ये हे अ‍ॅप लोकप्रिय आहे. कित्येक लाख लोकांनी ते डाउनलोड केलं असून Any.do प्रमाणेच हे अ‍ॅपही टास्क तयार करून ते लोकांसोबत शेअर करणं, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी उत्तम ठरतं. यामध्ये तयार केलेलं एखादं टास्क तुम्ही लॉक स्क्रीनवरती ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याची कायम आठवण राहील. यामध्ये तुम्ही तुमच्या ओळखीच्या व्यक्तींचे वाढदिवस किंवा अतिमहत्त्वाची कामं याची नोंद करू शकता. हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉइडबरोबरच, आयओएस, िवडोज अशा प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध आहे. त्याचे प्रो-व्हर्जन विकत घेतल्यास फोल्डर्स तयार करता येणं, प्राधान्यक्रमानुसार कामं ठरवणं तसंच फोटोज, स्प्रेडशीट्स आदी गोष्टी शेअर करणं, पीडीएफ पाहणं इत्यादी सुविधा या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत.

Task List
या अ‍ॅपमध्ये तुम्ही  आवाज रेकॉर्ड करून टास्क तयार करू शकता. ते शेअर करू शकता तसेच एडिटही करू शकता. यातली माहिती तुम्हाला गुगल अकाउंटलाही जोडता येते. यात प्रकार, तारीख यांसारख्या प्राधान्यक्रमानुसार टास्क तयार करता येतात. ते एसएमएस किंवा ईमेलने शेअरही करता येतात. वापरायला अतिशय सोप्या असलेल्या या अ‍ॅपमध्ये अ‍ॅलर्टस् लावण्याचीही सोय आहे.