द नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या संस्थेची स्थापना २९ मार्च १९५४ रोजी नवी दिल्ली येथे झाली. आधुनिक कला प्रकारांचे संकलन असलेल्या अशा देशपातळीवरील संस्थेच्या उभारणीचे संकल्पना बीज १९४९ मध्येच रोवले गेले आणि पुढे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, डॉ. राधाकृष्णन या संवेदनशील मनाच्या राजकारणी धुरीणांच्या प्रयत्नांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरली.
हे कला दालन असलेली वास्तू ‘जयपूर हाउस’ ब्रिटिशकालीन असून १९३६ मध्ये बांधली गेली. फुलपाखराच्या आकाराच्या या इमारतीची योजना, जयपूरच्या तत्कालीन महाराजांच्या निवासासाठी झाली होती. देशाच्या राजधानीचे शहर म्हणून, ब्रिटिशांकडून बांधल्या गेलेल्या दिल्लीतील काही खास दिमाखदार प्रासादांमध्ये या इमारतीची गणना होते. थोडक्यात आतील संग्राह्य वस्तूंबरोबरच, वास्तूही प्रेक्षणीय आहे. या कला दालनाचे प्रथम अभिरक्षक (क्युरेटर) प्रसिद्ध जर्मन कला इतिहास अभ्यासक गोएत्झ यांचा दालनाच्या उभारणीत, विस्तारीकरणात मोलाचा वाटा राहिला आहे.
कलासंग्रहालयाची निर्मिती, आधुनिक कलेच्या पुनरुत्थानाच्या हेतूने  झाली. १८५० सालापासूनच्या विविध कलावस्तूंचा शोध, जतन, पुनरुज्जीवनासाठी पावले उचलणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. संस्थेतील वस्तूंचा संग्रह १७ हजारांहूनही जास्त इतका भरपूर मोठा आणि वैविध्यपूर्ण आहे. दहाव्या शतकातील लघुचित्रकृतींपासून सध्याच्या काळातील आधुनिक कलाकृतींपर्यंत कलाविष्कारांचा संग्रह येथे पाहता येतो. राजा रविवर्मा, अबनिन्द्रनाथ टागोर यांच्या जुन्या चित्रशैलीबरोबरच अमृता शेरगिल, रवींद्रनाथ टागोर यांच्या आधुनिक चित्रशैली, १८५७ किंवा आधीच्या काळातील राजावशेष, १९११ साली दिल्ली दरबारातील समारंभात वापरलेल्या वस्तू अशा दुर्मीळ पुरातन वस्तू पाहायला मिळतात.
संस्थेच्या कलासंग्रहातील काही उल्लेखनीय कलावस्तूंची तोंडओळख खालीलप्रमाणे :
लघुचित्रे (मिनिएचर पेंटिंग)
आजमितीस अस्तित्वात असलेली दहाव्या शतकातील झाडाच्या पानांवर काढलेली चित्रे, चौदाव्या शतकातील कागदावरील पुरातन चित्रे येथे दिसतात. मुख्यत्वेकरून तेव्हाची ही चित्रे धार्मिक, पौराणिक प्रसंग दर्शवणारी होती. या चित्रांचे वर्णन करणारी त्या काळातील हस्तलिखितेही चित्रांबरोबर पाहता येतात. सोळाव्या शतकातील मुघल आक्रमणांनंतर चित्रांचे विषय राजे, महाराजे, दरबारातील राज्यकारभार, निसर्ग असे बदललेले जाणवतात. सर्वच चित्रांचा मूळ भर भावनांच्या माध्यमातून काव्यात्म संवाद साधण्यावर वाटतो. या प्रकारची परंपरा जपणारी मुघल, राजस्थानी, पहाडी चित्रशैलीतील चित्रे संग्रहात दिसतात. त्याकाळी कोणतेही चित्र कलाकारांच्या समूहाकडून तयार होत असे.
तंजावर आणि म्हैसूर चित्रकला
दक्षिणेकडे या चित्रशैलीना उजाळा देण्याचे आणि पारंपरिकता आणि लोकप्रियता यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न कला इतिहास अभ्यासक बार्बरा रोस्सी यांनी केलेला दिसतो.
म्हैसूर चित्रशैलीतील चित्रे कागदावर काढलेली आणि अधिक तरल असल्याचे लक्षात येते, तर तंजावर चित्रकला ही लाकडावर ताणून बसवलेल्या कापडावर केलेली दिसते. समृद्ध कलेचा वारसा जपणाऱ्या या एकोणिसाव्या, विसाव्या शतकातील चित्रकृतींतून उठाव देण्यासाठी किमती धातू, मौल्यवान रत्ने, रंगीत काचा, चुना यांचा वापर केलेला आहे.
युरोपिअन प्रवासी कलावंत
भारतात व्यापाराच्या उद्देशाने डच, ब्रिटिश आणि पोर्तुगीजांनी सतराव्या शतकात सागरी मार्गाने शिरकाव केला,. साहजिकच भारतातील कलाप्रांतात, चित्रशैलीतूनही हा परकीय प्रभाव जाणवतो. १७७० ते १८२५ या काळात जवळ जवळ ३० परदेशी चित्रकार स्वत:च्या कलावस्तू सादर करण्यासाठी भारतात येऊन गेले होते अशी इतिहासात नोंद सापडते. यांतील अगदी सुरुवातीचे कलावंत म्हणजे विलियम होद्गेस, टीली केटल, एमिली एडेन इत्यादी. ही चित्रे तल चित्रशैलीतील व कॅनव्हासवर होती. या युरोपिअन कलावंतानी भारत भेटीदरम्यान केलेल्या चित्रांमधून मोठय़ा आकारातील निसर्ग चित्रे, भव्य प्रासादांची चित्रे, ऐतिहासिक स्थळांची चित्रे अशी वेगळ्या धाटणीची शैली वापरून स्वत:ची व भारताची वेगळी प्रतिमा जगासमोर आणली. ही वैशिष्टय़पूर्ण चित्रे आपल्याला येथे पाहायला मिळतात.
‘कंपनी स्कूल’ चित्रशैली
अठराव्या, एकोणिसाव्या शतकात हा चित्र प्रकार उदयास आला. या प्रकारची चित्रे भारतातील ईस्ट इंडिया कंपनीकडून आश्रय देण्यात आलेल्या कलावंतांनी कंपनीच्या गरजांप्रमाणे तयार केली होती, म्हणून या चित्रशैलीला ‘कंपनी स्कूल’ असे नाव पडले. भारतातील निसग्र्यरम्य ठिकाणे, भारतीय जीवनशैली, यांची चित्रे चितारण्यात तेव्हाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना विशेष रस असे, पारंपरिक लघुचित्र कला आणि आधुनिक चित्रकला या दोन्हीच्या वापरातून कोणतीच ठराविक नियमावली किंवा आकृतीबंध नसलेली एक वेगळीच चित्रशैली तयार झाली. या कालावधीत भारतातील तत्कालीन राजसत्ता डबघाईला आल्या होत्या. साहजिकच राजाश्रयास मुकलेल्या भारतीय कलावंतानी या प्रकाराची कास धरली असावी. या चित्रांत पारंपरिक तल रंग माध्यमांऐवजी जलरंगांचा, शिस पेन्सिलीचाही वापर झालेला दिसतो.
कालीघाट पेंटिंग
एकोणिसाव्या शतकात कोलकात्यातील पटूआ जमातीतील कलाकारांच्या समूहाने ही कागदावरील जलद चित्रशैली विकसित केली. दिव्याच्या काजळीतून तयार केलेल्या शाईचा व कुंचल्याचा यात वापर होई. ही चित्रे प्रामुख्याने देवी-देवतांची असत. त्या काळात कलकत्त्यातील कालीघाट मंदिर तीर्थक्षेत्राप्रमाणे भाविकांमध्ये प्रसिद्ध होते, त्या मंदिराच्या नावावरूनच या प्रकारच्या चित्रांना ‘कालीघाट पेंटिंग’ हे नाव मिळाले असावे. त्या काळात बंगालमध्ये शिक्षणाचा प्रसार, समाज सुधारणा मूळ धरत होत्या त्याचेही प्रतििबब चित्रांत रंगवलेल्या स्त्री-पुरुष प्रतिमांतून दिसते.

कला शिक्षणाचे संस्कार  
भारतीय कलाजगतात १८७० नंतर फार मोठे बदल दिसून येतात. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर, भारतातील कारागिरांना रीतसर कला शिक्षण देण्यासाठी ब्रिटिशांकडून कला महाविद्यालयांची उभारणी झाली. या संस्थांचा केंद्रिबदू धंदेवाईक कला शिक्षणापेक्षा ललित कला शिक्षणाकडे होता. त्या काळातील चित्रे येथे पाहायला मिळतात.
बंगाल स्कूल पेंटिंग
बंगालमधील श्रेष्ठ कलाकार अबनिंद्रनाथ टागोर आणि त्यांच्या शिष्यगणांनी विकसित केलेली ही अभिनव चित्रशैली ‘बंगाल स्कूल’ म्हणून ओळखली गेली. एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिशविरोधी उसळलेली ‘स्वदेशी’ची चळवळ चित्रांद्वारा लोकांपर्यंत पोहोचवण्यातही हा चित्रप्रकार यशस्वी झाला होता.
अमृता शेरगिल या प्रसिद्ध चित्रकर्तीच्या शंभराहून अधिक चित्रकृती दालनातील कलासंग्रहात पाहायला मिळतात.
जमनी रॉय – १९२० च्या काळात कलाविष्काराच्या अनेक नवीन पद्धतींचा वापर कलकत्ता आणि बंगालमध्ये केला गेला. त्यातीलच एक कलावंत म्हणजे जमनी रॉय, त्यांनी चित्रकारिता लोककलेच्या ढंगाने केली, त्यासाठी कोणतीही शहरी साधने वापरली नाहीत. त्यांची चित्रे नसíगक अशा सात रंगांमध्ये सीमित असत.
सामुदायिक कला चळवळ   
१९४३ साली आलेल्या भीषण दुष्काळाशी सामना करण्यात ब्रिटिश सरकार अपयशी ठरले आणि संपूर्ण बंगालभर सरकारविरोधी संतापाची लाट पसरली. निषेधाच्या या भावना कलकत्त्यातील काही तरुण कलाकारांनी एकत्र येऊन चित्रांतून व्यक्त केल्या. त्यासाठी त्यांनी ‘कलकत्ता ग्रुप’ची स्थापना केली. त्यानंतरच्या काळात मुंबईतील ‘प्रोग्रेसिव आर्टस्टि ग्रुप’, कलकत्त्यातील ‘यंग टर्क ग्रुप’ असे समूह स्थापन झाले. या समूहांची चित्रेही या दालनांतून पाहायला मिळतात. प्रसिद्ध चित्रकार वासुदेव गायतोंडे यांची चित्रे येथील संग्रहात समाविष्ट आहेत. संस्थेच्या संग्रहात अनेक नामवंत शिल्पकारांनी घडवलेल्या शिल्पकृतीही आहेत.
हे कलादालन पूर्णत: सरकारी मालकीचे आहे. संस्थेच्या दोन शाखा बंगळूरू आणि मुंबई येथे कार्यरत आहेत. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट हे आधुनिक व समकालीन कलावस्तूंचे संग्रहालय एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक ठेवा म्हणावा लागेल.
संस्थेचा पत्ता – नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, जयपूर हाउस, इंडिया गेट, नवी दिल्ली. कामाच्या वेळा – सकाळी १० ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत (प्रत्येक सोमवार व राष्ट्रीय सुट्टय़ांच्या दिवशी बंद राहील.)

employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
Indian Institute of Management Mumbai hiring post
IIM Mumbai recruitment 2024 : मुंबईतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये नोकरीची संधी! पाहा माहिती
Job Opportunity Recruitment at AI Airport Services Limited
नोकरीची संधी: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पदभरती
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
नोकरीची संधी: ‘एचपीसीएल’मधील संधी