prashasanयूपीएससीच्या लेखी चाचणीत विद्यार्थ्यांना एका बाजूला सविस्तर निबंध लिहायचे असतात तर दुसऱ्या बाजूला सामान्य अध्ययनातील प्रश्नांची समावेशक पण थोडक्यात उत्तरे लिहिण्याची कसरत करावी लागते. यासाठी लेखनातील नियमितता तुमच्यात यायला हवी.
नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या लेखी चाचणीकरता आवश्यक ठरणाऱ्या अभ्यासात वाचन, चिंतन आणि लेखन या प्रक्रियांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. सूक्ष्म, खोल आणि सर्वसमावेशक आकलनाकरता वरील तिन्ही कौशल्यांची निश्चित मदत होते. त्यादृष्टीने प्रारंभी लेखी चाचणीतील प्रश्नांचा बदलता आकृतिबंध आणि त्यांचा रोख कशावर आहे हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. परीक्षार्थी कळीचे, ज्वलंत आणि वर्तमान मुद्दे कसे समजून घेतो, त्याविषयी स्वतंत्र दृष्टी परीक्षार्थीकडे आहे का याची चाचपणी लेखी चाचणीद्वारे केली जाते.
अशी स्वतंत्र दृष्टी विकसित करणे सर्वस्वी चिंतनप्रक्रियेवर अवलंबून असते. चिंतन अर्थात विचारप्रक्रियेतून विषयाच्या आकलनाच्या कडा रुंदावतात. चिंतनाचा अर्थ अमूर्त पातळीवर विचार करणे नव्हे. आपल्या समोरचे मुद्दे आणि त्याविषयीची मतमतांतरे बुद्धीच्या कसोटीवर पडताळणे, त्याविषयी विचारमंथन सुरू करणे, त्या विषयाचा मथितार्थ समजून घेणे आणि त्यातून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करणे या प्रक्रिया चिंतनामध्ये अंतर्भूत असतात. ज्या वेळी या प्रक्रियेला टाळून आपण आपले मत आणि भूमिका मांडायला लागतो, तेव्हा ती सभोवतालच्या मत-मतांतराची निव्वळ उसनवारीच असते, ही वस्तुस्थिती नजरेआड करता येत नाही.
लेखी चाचणीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्जनशील लेखनाला असाधारण महत्त्व आहे. असे लेखन कागदावर उतरवण्यासाठी वरील प्रक्रियेशिवाय दुसरा विकल्प नाही. अन्यथा, आपले लेखन बेचव, पातळ आणि भुसभुशीत होईल. आपल्या लेखनात सर्जनशील कशी आणायची याचा ध्यास नागरी सेवा परीक्षार्थींमध्ये नक्कीच असायला हवा. त्याशिवाय आपल्या लिखाणाची छाप समोरच्यावर पाडता येत नाही.
कोणत्याही विषयाचे राजकीय, सामाजिक तसेच आíथक संदर्भ अवगत असल्याशिवाय लेखी चाचणीमधील प्रश्नांना सामोरे जाता येत नाही. कारण बहुतांश प्रश्न स्वतंत्र घटकानुसार न विचारता दोन-तीन घटकांना एकत्रित करून विचारले जातात. एखादा मुद्दा स्पष्ट करताना त्याच्या विभिन्न अंगाचे निरीक्षण करता यावे यासाठी चिंतन महत्त्वाचे ठरते.
सातत्याने विचार करून वर्तमान घडामोडींचे निरीक्षण करताना त्याच्या विभिन्न पदरांचे आकलन होते. आपली विश्लेषण क्षमता वाढू  लागते. त्याद्वारा विविध आयामांचा स्पर्श झालेल्या चालू घडामोडींच्या अभ्यासाची चौकट तयार होते. या चौकटीतून तयार झालेला विचार लगेचच लिहून काढावा. परिणामत: अशा घडामोडींचे उपयोजन करणे सोपे जाते.
अलीकडे ‘कालबद्ध निर्मिती’ नावाचे मराठी पुस्तक वाचनात आले. त्यातील लेखकाच्या शब्दात मांडायचे झाल्यास, ‘बुद्धिमता आणि लेखन दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. केवळ बुद्धिमता आणि प्रतिभा यांच्या जोरावर एखाद्याला लेखन करता येईलच असे नाही. त्यासाठी लेखन कौशल्याची गरज असते. लिखाण करणे आणि नियोजित वेळेत पूर्ण करणे यासाठी उच्च दर्जाची शिस्त आवश्यक असते.’
लिखाणाच्या चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी अचूक नियोजन प्रत्यक्षात उतरवावे लागते. त्याशिवाय दिनक्रमात सातत्य आणता येणार नाही. आपला दिनक्रम आणि लिखाण या दोन गोष्टींचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. केवळ लहर किंवा ऊर्मी आली म्हणून उत्स्फूर्तपणे लिखाण करणे सर्जनशीलतेला मारक ठरते. लेखी चाचणीत विद्यार्थ्यांना एका बाजूला सविस्तर निबंध आणि दुसऱ्या बाजूला सामान्य अध्ययनातील प्रश्नांची समावेशक पण थोडक्यात उत्तरे लिहिण्याची कसरत करावी लागते. यासाठी लेखनातील नियमितता तुमच्यात यायला हवी.
लिखाण करताना तुम्ही किती काळ लक्ष केंद्रित करून क्रियाशील राहू शकता आणि त्यासाठी योग्य आणि सोयीच्या वेळेचा विचार, सर्वप्रथम आवश्यक असतो. लेखनासाठी नियमितपणे वेळ देता येण्यासाठी लिखाणाचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करावे. दिवसाच्या कोणत्या प्रहरात किती वेळ लिखाण करता येईल हे निश्चित करावे. लिखाणाच्या मनोवस्थेमध्ये जाण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी लागणारा वेळ याचाही विचार अपरिहार्य बनतो. लेखनक्षमता सुरुवातीला उच्च िबदूवर पोहोचून काही काळ स्थिरावते आणि नंतर उतरणीला लागते. त्यामुळे लेखनाची धार कमी होण्यापूर्वीच लेखन थांबवावे.
त्यामुळे अभ्यासक्रमातील उपघटक आणि त्यासंबंधीच्या वर्तमान घडामोडी एकत्र बांधून त्यातील नाळ जोडता येण्यासाठी दोन्हीवर एकत्रित विचारमंथन करणे अपरिहार्य ठरते. अनेक जण प्रत्यक्ष अभ्यास व्यवहारात विषय समजून घेण्यावर भर देत नाहीत. तो विषय केवळ वाचला जातो. त्यानंतर तो स्मरणात कसा राहील याचाच विद्यार्थी प्रामुख्याने विचार करतात. त्याकरता विद्यार्थ्यांकडून चच्रेचे गट तयार केले जातात. बहुतांश वेळा ही चर्चा वर्णनात्मक आणि माहितीच्या देवाणघेवाणीपुरती मर्यादित राहते. खरे तर चच्रेचे गट बनवण्यातून विद्यार्थी लेखी चाचणीच्या स्वभाववैशिष्टय़ाविरुद्ध वर्तन करीत असतात. त्यामुळे आपोआपच लेखी चाचणीत अपयश पदरी पडते.
विश्लेषणात्मक संदर्भसाहित्याची निवड करून प्रथमत: त्यातील प्रकरणांचे सूक्ष्म वाचन करावे. विशिष्ट प्रकरण पूर्ण केल्यानंतर त्यावर विचार करावा. त्यातून झालेले आकलन, मथितार्थ मुद्दय़ांच्या स्वरूपात स्वतंत्र कागदावर टिपावेत आणि त्यानंतर त्यांचा लिखाणाद्वारे विस्तार करावा. या प्रक्रियेतून गेले असता एका बाजूला नेमकी लेखनशैली अवगत करता येईल आणि दुसऱ्या बाजूला लिखाण वर्णनात्मक न राहता विश्लेषणात्मक बनू लागेल. आपण केलेले लिखाण तपासले असता त्यात आपल्या विचाराचे प्रतििबब पडलेले दिसून आले पाहिजे. यालाच स्वतंत्र भूमिका आणि दृष्टी असे संबोधले जाते.
    admin@theuniqueacademy.com