ॅड फिल्ममेकर अर्थात जाहिरातफीत बनवण्यात स्वारस्य असणाऱ्यांसाठी रीतसर प्रशिक्षण उपलब्ध होऊ लागले आहेत. या क्षेत्राचे स्वरूप आणि त्यात वावरण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या कौशल्यांची  ओळख..

गेल्या १०-१५ वर्षांत आपल्या देशातील जाहिरात उद्योगाचा कायापालट झाला आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध अ‍ॅडफेस्टमध्ये भारतीय जाहिरातसृष्टीची दखल घेतली गेली आहे. आणि म्हणूनच ज्यांना जाहिरात क्षेत्रातील कल्पक आणि सृजनशील  करिअर खुणावते आहे, अशांसाठी जाहिरात क्षेत्रात अनेक नवनव्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यातील एक म्हणजे जाहिरातफीत बनवणे.

जाहिरात तयार करण्यासाठी ज्ञान, संवेदनशीलता आणि श्रोत्यांवर चटकन प्रभाव पडू शकेल असे परिणामकारक संवादकौशल्य असावे लागते, जेणेकरून ब्रँड लोकप्रिय होऊन अंतिमत: त्या उत्पादनाची विक्री वाढेल! जाहिरातीची चित्रफीत  बनवण्याची प्रक्रिया कशी असावी याबाबतच्या नियमांचे काही पुस्तक नसते. ते गोष्टीनुरूप बदलत जाते. अशा पद्धतीच्या जाहिरातीच्या फिल्ममेकिंगचे मूलभूत पाच टप्पे पुढीलप्रमाणे आहेत- कल्पना विकसित करणे, प्रॉडक्शनपूर्व योजना बनवणे, गोष्टीची मांडणी करणे, वेळापत्रक आखणे आणि अनुकूल व्यक्ती शोधणे. प्रॉडक्शनमध्ये छायाचित्रे आणि ध्वनीची जुळवाजुळव करावी लागते आणि पोस्ट प्रॉडक्शनमध्ये संपादन, संगीत देणे, इफेक्ट्स देणे, अ‍ॅनिमेशन आणि वितरण अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावाव्या लागतात.

जाहिरातीची चित्रफीत बनवणारी व्यक्ती सृजनशील, वेगाने काम करू शकणारी, इतर व्यक्तींशी जुळवून घेणारी तसेच शारीरिक श्रम पेलता येतील अशी असावी लागते.

स्वतंत्र चित्रफीत असो अथवा दूरचित्रवाणीवरील जाहिरात असो, सर्वच क्षेत्रातील फिल्ममेकरचे काम सारखे असते. एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शकासारखेच जाहिरातीच्या निर्मात्यालाही पटकथेपासून प्रकाशनापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. कठोर मेहनत ही या क्षेत्रात यश कमावण्याची एकमेव गुरुकिल्ली आहे. जाहिरातफितीसाठी उत्तम पटकथेची निर्मिती करणे, त्याचे आर्थिक अंदाजपत्रक मांडणे, चित्रीकरणाची जागा ठरवणे या सर्व गोष्टी चित्रफीत निर्मात्याला निश्चित कराव्या लागतात. त्या पटकथेला योग्य असे कलाकार निवडण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असते. केवळ चित्रीकरणाचीच नव्हे तर व्हिडीओ एडिटिंगनंतर अंतिम उत्पादनापर्यंतच्या निर्मितीची जबाबदारी ही फिल्ममेकरवर असते.

शूटिंगचे दिवस वगळता अ‍ॅड फिल्ममेकरचे तासागणिक वेळापत्रक नसते. जाहिरातीच्या उद्योगक्षेत्रात काही जण एजन्सी अथवा क्लायंट डेडलाइन पाळली जाईल, यावर कार्यरत असतात. काहींना वीकएंडना भरपूर काम तर कार्यालयीन दिवसांत मोकळा वेळ मिळू शकतो. मिळालेल्या प्रॉजेक्टस्च्या संख्येनुसार आणि डेडलाइननुसार कामाची घाईगडबड व तणाव असू शकतो.

या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांकडे उत्तम कल्पनाशक्ती हवी आणि कामाची पॅशनही हवी. आपल्या कल्पना अ‍ॅडफिल्ममध्ये रूपांतरित करण्याची ताकदही त्याच्याकडे असायला हवी. या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी केवळ शैक्षणिक अर्हता पुरेशी ठरत नाही, मात्र संबंधित प्रशिक्षणाचा उपयोग होऊ शकतो. कुठल्याही विद्याशाखेतील पदवीनंतर एखादा शॉर्टफिल्म कोर्स करणे उत्तम ठरेल. जर कला आणि नाटय़संबंधित पदवी असेल तर ती तुम्हाला या क्षेत्रातील यशासाठी अधिक साहाय्यभूत ठरू शकेल.

हे असे करिअर आहे, ज्यात तुम्हाला प्रयोगशील असावे लागते आणि नवनव्या गोष्टी शिकत स्वत:ला अपडेट ठेवावे लागते. कुठली नवी गोष्ट क्लिक होईल, याची एक अचूक जाणीव असावी लागते त्याचबरोबर समाजमनाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. कामाच्या वेळा दीर्घ आणि अनियमित असू शकतात, याची जाणीव हवी आणि त्यानुसार काम करण्याची तयारी हवी.

आवश्यक कौशल्ये

काम पार पडण्यासाठी आवश्यक ठरणारे स्रोत आणि तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता असावी लागते. कामात नावीन्यपूर्णता आणि सृजनशीलता असावी लागते. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडण्याकरता मल्टिटास्किंग यायला हवे. फिल्ममेकिंग हे सांघिक काम आहे. टीममधल्या सर्वानी सर्वोत्तम योगदान केल्यानंतरच दर्जेदार चित्रफितीची निर्मिती होऊ शकते. फिल्ममेकिंग करताना कुठल्याही टप्प्यात त्यात सुधार करण्याची तयारी फिल्ममेकरने ठेवायला हवी.

प्रशिक्षण संस्था

शॉर्टफिल्म निर्मितीसंबंधीचे  दर्जेदार प्रशिक्षण पुण्याची फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, नवी दिल्लीची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी), मुंबईची झेवियर इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन, मुंबईचे नॉर्थपॉइंट सेंटर ऑफ लर्निग अशा अनेक ठिकाणी उपलब्ध आहे.