मुलाखतीसाठी उमेदवाराने नमूद केलेल्या पदांच्या प्राधान्यक्रमावर मुलाखत पॅनलकडून हमखास प्रश्न विचारले जातात. या पदांच्या स्वरूपाविषयी उमेदवारांना पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. नागरी सेवा परीक्षेद्वारे उपलब्ध असणाऱ्या पदांविषयी उमेदवाराला सर्वसाधारण माहिती असणे ही प्राथमिक अपेक्षा असते. पदांची निवड आणि प्राधान्यक्रम याविषयी उमेदवाराचा दृष्टिकोन सुस्पष्ट असणेही आवश्यक आहे. या पदांद्वारे येणाऱ्या जबाबदारीची उमेदवारांना कितपत जाणीव आहे, ती पूर्णत्वाला नेण्याची त्यांच्यात कितपत क्षमता आहे, ती पेलण्याचा उत्साह, ऊर्जा उमेदवारात आहे का, याची पारख मुलाखत मंडळाद्वारे केली जाते.
प्राधान्यक्रमात नमूद केलेल्या पदाचे स्वरूप, कामाच्या संधी, करिअरच्या प्रगतीला असलेला वाव, अन्य पदांच्या तुलनेत त्या पदाचे असणारे वैशिष्टय़, पद स्वीकारल्यानंतर समोर उभी ठाकणारी आव्हाने, सेवाकाळादरम्यान बदलीच्या आणि बढतीच्या संधी अशा विविध बाबतीत उमेदवार सजग असणे अपेक्षित आहे. पदांसंबंधी सविस्तर माहिती असल्याशिवाय उमेदवार, पदांविषयी आपली भूमिका निश्चित करू शकत नाही, आणि मुलाखत मंडळासमोर आपली मते प्रभावीपणे मांडूही शकत नाही. ही माहिती जितकी सूक्ष्म आणि सखोल असेल, तितक्याच सहजतेने तो मुलाखतीस सामोरा जाऊ शकतो. याचे लाभ म्हणजे- मुलाखत मंडळाला खात्री पटते की, उमेदवार आपल्या पदाविषयी तसेच मुलाखतीविषयी गंभीर आहे आणि त्याने समग्र विचार करून निर्णय घेतलेला आहे.
पदांविषयी सखोल माहिती मिळविण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे त्या पदावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांचे याबाबत मार्गदर्शन घ्यावे. ते पद भूषवणाऱ्या अधिकाऱ्यावर असलेली कामाची जबाबदारी जाणून घ्यावी. प्रत्यक्ष पदावर काम करण्याचा अनुभव वेगळा असतो. या संबंधात बारीकसारीक तपशील महत्त्वाचे असतात. असे तपशील सहजासहजी कुठे वाचनात येत नाहीत. पण याविषयीची माहिती अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीद्वारे मिळू शकते. यामुळे उमेदवारांचा आत्मविश्वासही वाढतो.
पूर्व सेवाकाळ आणि तुम्ही
मुलाखतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये, विविध शासकीय पदांवर काम करणारे अधिकारी अथवा उमेदवारसुद्धा असतात. वर्ग-१, वर्ग-२, वर्ग-३ अशा विविध पदांसाठी निवड झालेले उमेदवार वरिष्ठ पदांसाठी किंवा पसंतीच्या पदांसाठी तयारी करीत असतात. अशा उमेदवारांना पूर्व सेवाकाळाविषयी हमखास प्रश्न विचारले जातात. पूर्व सेवाकाळाशी संबंधित प्रश्नांना उत्तर देताना पारदर्शी असावे. कोणताही भ्रम अथवा संभ्रम निर्माण होईल, असे आपले उत्तर नसावे. उमेदवाराने उत्तर देताना माहिती सत्य आणि स्पष्ट द्यावी.
उमेदवाराचा पूर्व सेवाकाळ कसा होता, या सेवाकाळादरम्यान त्याने स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करून घेतला का, वैचारिक आणि व्यावहारिक स्तरावर तो किती परिपक्व झाला, या सर्व बाबी मुलाखत मंडळाचे सदस्य तपासतात. पूर्व सेवाकाळात चांगले वेतनमान मिळत असताना, तो पुन्हा नव्या पदावर का काम करू इच्छितो, असा प्रश्न विचारला जातो. अशा प्रश्नाचे उत्तर भावनेच्या आहारी जाऊ न देता, तुमचे उत्तर व्यवहार्य असावे. एक गोष्ट स्पष्ट आहे, अधिकारी म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांकडून, मुलाखत मंडळाला परिपक्व उत्तरांची अपेक्षा असते. काम करीत असलेला विभाग, त्याची रचना, त्या विभागाशी संबंधित विविध योजना, त्यांचे यशापयश, त्यासाठी उपाययोजना, त्यावर तुमचे मत असे प्रश्न एकमेकांशी संबंधित असतात.
देशात भूकबळींची समस्या आहे, भ्रष्टाचाराला लगाम घालण्याची गरज आहे, यासाठी मला प्रशासकीय सेवांत काम करायचे आहे, वरिष्ठ पदावर काम करायचे आहे, अशी उत्तरे मुलाखत मंडळावर प्रभाव टाकण्यासाठी पुरेशी ठरू शकत नाहीत. प्रशासकीय सेवांत प्रगतीच्या अनेक संधी आहेत, कामामध्ये वैविध्य आहे, आव्हानांना सामोरे जाण्याच्या संधी आहेत, प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असणे स्वाभाविक आहे, प्रत्येक व्यक्ती यशाच्या संधी शोधत असते, म्हणूनच पूर्व सेवाकाळात चांगले वेतन, सुविधा असूनसुद्धा वरिष्ठ किंवा पसंतीच्या पदावर काम करण्याचा पर्याय निवडला जातो, अशा आशयाचे विचार उमेदवाराला मुलाखत मंडळासमोर सफाईदारपणे मांडता यायला हवे. काही वेळा उमेदवार काम करत असलेल्या पदाचे वेतनमान चांगले असते, पण विषय, कार्यक्षेत्र त्याच्या आवडीचे नसते. उत्पन्नाचे साधन म्हणून उमेदवाराने त्याचा स्वीकार केलेला असतो. लिपिक पदावर काम करणारा उमेदवार उपजिल्हाधिकारी प्राधान्य पदासाठी तयारी करीत असतो, उत्पन्नाचे साधन म्हणून तो सध्या लिपिक पदावर कार्यरत असतो, अशा वेळी कसलाही संकोच न बाळगता, प्रामाणिकपणे, आत्मविश्वासाने आपली भूमिका, मत मंडळासमोर मांडता आले पाहिजे. पूर्व सेवाकाळाविषयी मत
मांडताना कुठेही नकारात्मकता दिसता
कामा नये.
पूर्व सेवाकाळाशी निगडित नकारात्मक टिप्पणी, सहकारी अथवा वरिष्ठांशी असलेले मतभेद, कार्यालयीन राजकारण अशा कोणत्याही अनुभवाचे नकारात्मक प्रदर्शन तुमच्याकडून होऊ नये. मुलाखत मंडळासमोर निराशेचे पाढे वाचून व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणता येणार नाहीत तसेच मुलाखत मंडळ हे शासनाचे तक्रार निवारण केंद्र नसते याची जाणीव तुम्हाला असायला हवी. हे लक्षात घेत मुलाखतीला सामोरे जाण्यासाठी दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. मुलाखत मंडळावर तुमचा प्रभाव सकारात्मक उमटायला हवा.
पूर्व सेवाकाळात कार्यरत विभागाशी संबंधित चालू घडामोडींचे ज्ञान अद्ययावत असावे. विशेषत: काही विवाद घडले असल्यास त्याबाबत तुमचे मत विचारले जाऊ शकते. अशा वेळी तुमचे मत वस्तुनिष्ठ व तटस्थ असायला हवे. तुमचा विभाग आहे म्हणून चालू विवादाबाबत अपराधीपणाची भावना ठेवून स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता नाही आणि न्यायाधीशाच्या भूमिकेतून चूक/बरोबर अशा प्रकारची टिप्पणी करायचीही गरज नाही. झालेल्या घटनेबाबत तुम्हाला असलेली माहिती व तिचे विश्लेषण या आधारावर तटस्थपणे चर्चा होईल याची काळजी घेतली पाहिजे. (पुढील लेखात ‘मॉक इंटरव्हय़ू’बाबत चर्चा करूयात.)

– रोहिणी शहा