ऑस्ट्रेलियामधील मडरेक विद्यापीठाच्या सर्व विभागांकडून पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेऊ  इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. पाच हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स एवढे विद्यावेतन याअंतर्गत दिले जाते. त्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेल्या अर्जदारांकडून विद्यापीठाने अर्ज मागवले आहेत.

शिष्यवृत्तीविषयी

मडरेक विद्यापीठ हे पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरात आहे. ऑस्ट्रेलियामधील हे एक महत्त्वाचे शासकीय विद्यापीठ आहे. विद्यापीठाची स्थापना १९७३ साली झाली असून त्यांचे सिंगापूर व दुबई येथे आंतरराष्ट्रीय कँपस आहेत. विद्यापीठातील सर्व विभांगाकडून पदवी, पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम राबवण्यात येतात. विद्यापीठाच्या प्रत्येक विभागाने   विविध उपविषयांमधील संशोधन उत्कृष्टपणे चालवलेले आहे. अलीकडे विद्यापीठाला ‘इनोव्हेटिव्ह रिसर्च युनिव्हर्सिटीज ऑस्ट्रेलिया’ या संशोधन संस्थेचे सदस्यत्त्व मिळालेले आहे. त्यामुळेच मडरेक विद्यापीठाची ओळख संशोधन विद्यापीठ अशी बनू पाहते आहे.

Murdoch University Academic Excellence Awards (MUAEA) या उपक्रमांतर्गत, संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता  विद्यापीठाच्या विविध विभागांकडे आकृष्ट करण्यासाठी मडरेक विद्यापीठाने ही शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे. यामध्ये पाच हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे  विद्यावेतन दोन टप्प्यांमध्ये देण्यात येईल. विद्यापीठाकडून पदवी अभ्यासक्रमासाठी एकूण ३५ तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एकूण १२ एवढय़ा शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहेत. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही शिष्यवृत्ती इतर  कुणालाही देता येणार नाही.

आवश्यक अर्हता

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. अर्जदारास बारावीच्या परीक्षेमध्ये किमान ७५% गुण मिळालेले असायला हवेत. याप्रमाणेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करू इच्छिणारा अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. त्याची पदवीपर्यंतची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. वर उल्लेख केलेल्या दोन्ही अभ्यासक्रमांना अर्ज करणाऱ्या अर्जदारांचे  इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराने परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी महत्त्वाची असलेली सॅट किंवा जीआरई परीक्षा उत्तीर्ण असावे अशी कोणतीही अट विद्यापीठाने लागू केलेली नाही. मात्र, या परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे हे अर्जदारासाठी फायद्याचे ठरू शकेल. भारतीय अर्जदारांसाठी आयईएलटीएस किंवा टोफेल या इंग्रजीच्या दोन्हींपैकी एका परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठाने याव्यतिरिक्त कोणतीही किमान आवश्यक अर्हता नमूद केलेली नाही, मात्र अर्जदाराचा सीव्ही अतिशय उत्तम असावा. कारण त्याची अभ्यासेतर उपक्रमांमधील गुणवत्ता त्याला शिष्यवृत्ती मिळण्यासाठी निश्चितच उपयोगी पडू शकते.

अर्ज प्रक्रिया

या शिष्यवृत्तीला पात्र ठरण्यासाठी अर्जदाराने सर्वप्रथम मडरेक विद्यापीठामध्ये कोणत्याही पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करावा.  प्रवेशासाठी केलेला अर्ज हाच शिष्यवृत्तीसाठी गृहीत धरण्यात येईल. शिष्यवृत्तीच्या अर्जप्रक्रियेसाठी कोणतीही स्वतंत्र अर्जव्यवस्था नसून

अर्जदाराने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेला अभ्यासक्रम प्रवेश अर्ज पूर्ण भरून international.admissions@murdoch.edu.au या इमेलवर पाठवायचा आहे. या अर्जाबरोबर त्याने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल व या शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड का व्हावी याबद्दल माहिती देणारे त्याचे एसओपी, सीव्ही, शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची शिफारसपत्रे, सॅट किंवा जीआरईपैकी जी लागू असेल ती परीक्षा व आयईएलटीएस किंवा टोफेल यापैकी आवश्यक परीक्षांचे गुण, पदवी अभ्यासक्रमापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्ट्स इत्यादींच्या सॉफ्ट प्रतींसह अर्ज इमेल करावा. शिफारसपत्रांसाठी मात्र अर्जदाराने प्राध्यापकांचे इमेल अर्जामध्ये नमूद करावेत. विद्यापीठ स्वतंत्रपणे संबंधित प्राध्यापकांना संपर्क करून शिफारसपत्र देण्यासाठी विनंती करेल.

 

उपयुक्त संकेतस्थळ :- www.murdoch.edu.au/

अंतिम मुदत : – या शिष्यवृत्तीसाठी अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत दि. ५ मार्च २०१८ ही आहे.

 

– प्रथमेश आडविलकर

itsprathamesh@gmail.com