टाटा मेमोरियल सेंटर, खारघर- नवी मुंबई येथे लाइफ सायन्सेस विषयांतर्गत ज्युनिअर रिसर्च फेलोशिपद्वारा संशोधनपर पीएच.डी  करण्यासाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक अर्हता- अर्जदारांनी बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, बायोइन्फरमॅटिक्स, बायो-फिजिक्स, बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, लाइफ सायन्सेस, मायक्रोबायोलॉजी, मॉल्युक्युलर बायोलॉजी, प्राणिशास्त्र यांसारख्या विषयातील एम.एस्सी., बायोटेक्नॉलॉजी वा बायोइन्फरमॅटिक्समधील एमटेक, एमव्हीएससी अथवा एम.फार्म. यांसारखी पदव्युत्तर पात्रता किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा.

निवड पद्धती- अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा नवी मुंबई येथे २९ मे रोजी घेण्यात येईल. उमेदवारांची पदव्युत्तर परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांची संशोधनपर फेलोशिपसह पीएच.डी करण्यासाठी निवड करण्यात येईल.

शिष्यवृत्ती व भत्ते- निवड झालेल्या संशोधक उमेदवारांना दरमहा २५ हजार रु. शिष्यवृत्ती व ३०% घरभाडे भत्ता यांसारखे लाभ देय असतील. याशिवाय निवडक उमेदवारांना छात्रावासाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येईल.

अर्जासह पाठवायचे शुल्क- अर्जासह पाठवायचे प्रवेश शुल्क म्हणून ५०० रु. चा टीएमसी- एसीटीआरईसी यांच्या नावे असणारा व नवी मुंबई येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.

अधिक माहिती- ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ मार्च २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा http://www.actrec.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याची मुदत- डिमांड ड्राफ्टसह अर्ज सीनियर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, अ‍ॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर, टाटा मेमोरियल सेंटर, खारघर- नवी मुंबई- ४१०२१० या पत्त्यावर ११ एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावेत.