स्पर्धा परीक्षेतील मुलाखतीच्या टप्प्यात बॉडी लँग्वेज अर्थात देहबोलीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देहबोलीतून साधला जाणारा संवाद आणि त्याचा प्रभाव हा निवडीत महत्त्वाचा ठरतो. काहीही न बोलता केवळ उमेदवाराच्या देहबोलीतून त्याची छाप पडू शकते हे लक्षात घेत उमेदवारांनी आपल्या देहबोलीबाबत विशेष दक्ष राहायला हवे.
 नि:शब्द मूल्यांकन
देहबोलीच्या अभाषिक संवादातून उमेदवाराचा आत्मविश्वास, त्याची मन:स्थिती आणि व्यक्तिमत्त्वाशी निगडित विविध पलूंची ओळख मुलाखत मंडळाला होत असते. मुलाखतीच्या टप्प्यात मुलाखत मंडळ हे उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यास उत्सुक असते. अनेकदा उमेदवाराची बौद्धिक क्षमता उत्तम असूनही जर तो स्वत:ला मुलाखत मंडळासमोर योग्य आणि प्रभावी पद्धतीने सादर करू शकला नाही, तर तो मुलाखतीत अयशस्वी ठरण्याची शक्यता वाढते.
उलटपक्षी, काही उमेदवारांच्या आत्मविश्वासाचा स्तर उंचावलेला असतो. मनाची आंतरिक स्थिती शांत-स्वस्थ असते, पण जर चेहऱ्यावरील हावभाव आणि नसíगक देहबोली जर नकारात्मक असेल तर मुलाखत मंडळावर त्याचा नकारार्थी प्रभाव पडतो. म्हणूनच उमेदवारांनी देहबोलीविषयी जाणीवपूर्वक तयारी करणे आवश्यक आहे.
मुलाखतीत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अभ्यास, ज्ञान, माहिती, तर्कशक्ती, निर्णयक्षमता या बाबी तपासल्या जातातच, पण याचबरोबर उमेदवाराचे मुलाखतीद्वारे जे मूल्यांकन होते, त्यात त्या उमेदवाराचे मुलाखत कक्षात प्रवेश करणे, खुर्चीवर बसणे, चेहऱ्यावरील हावभाव, केशरचना, मुलाखत मंडळाच्या प्रश्नांना सामोरे जाताना त्याच्या होणाऱ्या शारीरिक हालचाली, चांगल्या उत्तरावर मुलाखत मंडळाने दिलेली शाबासकी किंवा चुकीच्या उत्तरावर केलेली टिप्पणी यावर उमेदवाराची प्रतिक्रिया, मुलाखत कक्षातून बाहेर पडतानाची त्याची स्थिती या व अशा देहबोलीशी संबंधित बाबींचे बारकाईने सूक्ष्म  मूल्यांकन मुलाखतीच्या वेळेत परीक्षक मंडळ करत असते. या अवलोकनासाठी काही वेळेस देहबोली तज्ज्ञ मुलाखत मंडळासोबत मात्र एका बाजूला बसलेले असतात. प्रत्येक वेळेस असे तज्ज्ञ समाविष्ट नसले तरी इतर सदस्यांकडूनही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तुमच्या देहबोलीचे परीक्षण व मूल्यांकन होतच असते. मुलाखत मंडळाचे उमेदवाराविषयी एकूण मत तयार होण्यात या मूल्यांकनाचे महत्त्व अधिक आहे.
मुलाखत कक्षाबाहेर
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती दिल्लीच्या धोलपूर हाऊस येथे तर राज्य लोकसेवा आयोगाच्या मुलाखती मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा विविध केंद्रांवर घेतल्या जातात. मुलाखतीच्या दिवशी तुमच्या बरोबरच बरेचसे उमेदवार मुलाखतीसाठी केंद्रावर आलेले असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने तयारीत असतो. पुस्तक, वर्तमानपत्रे, मासिके वाचण्यात काही उमेदवार मग्न असतात. काही उमेदवार स्वत:चा बायोडेटा तपासण्यात तर काही जण दुसऱ्यांची लगबग बघण्यात व्यग्र असतात. तुमच्या मुलाखतीच्या पाच-सहा मिनिटांपूर्वी तुम्हाला बोलावले जाते. वेटिंग रूममधील इतर उमेदवारांहून वेगळीकडे- मुलाखत कक्षाबाहेर तुमची बसण्याची व्यवस्था केलेली असते.
नव्या उमेदवाराला मुलाखतीला आत बोलावण्यापूर्वी, मुलाखत पार पडलेल्या उमेदवाराच्या अंतिम मूल्यांकनाविषयी मंडळ चर्चा करत असते. या दरम्यानचा मुलाखत कक्षाबाहेरील चार-पाच मिनिटांचा काळ म्हणजे उमेदवाराला स्वत:ला व्यवस्थित सावरण्यासाठी, आत्मविश्वासाने, प्रसन्न चेहऱ्याने आणि मनाने मुलाखत कक्षात प्रवेश करण्यास सज्ज होण्यासाठी मिळतो.  या वेळेचा उपयोग प्रत्येक उमेदवाराने करून घ्यायला हवा. याचे कारण मुलाखत कक्षाबाहेरील वातावरण तणावाचे असते. तुमच्याआधी मुलाखत देऊन बाहेर आलेल्या उमेदवारांकडून मुलाखत मंडळात किती सदस्य आहेत, कोण आहेत, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाताहेत, याची माहिती बाहेर मिळत असते. ही माहिती काही उमेदवारांसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक ठरते. या माहितीने काही जण रिलॅक्स होतात, तर काही जण विनाकारण तणावग्रस्त होतात. मुलाखत कक्षाबाहेरील या सर्व वातावरणाचा उमेदवाराच्या आत्मविश्वासावर आणि पर्यायाने त्याच्या देहबोलीवर परिणाम होत असतो.
मुलाखत कक्षात..
मुलाखत कक्षात प्रवेश करताच उमेदवाराचे अवलोकन, मूल्यांकन सुरू होते. उमेदवाराने अतिशय सहज, नसíगक पद्धतीने कक्षात प्रवेश करायला हवा. चालताना पादत्राणांचा आवाज होणार नाही किंवा कक्षाचा दरवाजा उघडतानाही जास्त आवाज होणार नाही याची दक्षता घेत प्रवेश करावा. सर्वप्रथम ‘मे आय कम इन सर?’ अशी परवानगी घ्यावी. सर्वप्रथम मुलाखत मंडळाचे अध्यक्ष आणि नंतर अन्य सदस्यांना अभिवादन करावे. मुलाखत मंडळात एक किंवा त्यापेक्षा अधिक महिला सदस्य असतील तर प्रथम त्यांना अभिवादन करावे आणि त्यानंतर इतर सदस्यांना अभिवादन करावे. त्यानंतर मंडळाच्या सर्व सदस्यांवर प्रसन्न चेहऱ्याने अभिवादनात्मक दृष्टिक्षेप टाकावा. उमेदवाराच्या चेहऱ्यावर हलके स्मित दिसायला हवे. चेहऱ्यावरील हलके हास्य चेहऱ्यावरील आणि नजरेतील चमक वाढवते. प्रसन्न चेहऱ्यामुळे व्यक्तिमत्त्वातील जिवंतपणा आणि आशावादी भाव प्रतीत होतो. मुलाखतीची तयारी करण्याच्या काळात प्रसन्न चेहरा, स्वाभाविक हास्य चेहऱ्यावर आणण्याची जाणीवपूर्वक सवय जडवून घेतली पाहिजे.
मुलाखत मंडळाच्या परवानगीने खुर्चीवर ताठ बसावे. दोन्ही पाय जमिनीवर व हाताचे कोपर खुर्चीच्या हातावर टेकवून बसावे. खुर्चीवर बसल्यानंतर धन्यवाद देण्यास विसरू नये. हातापायांच्या अनावश्यक हालचाली, वारंवार चेहऱ्यावरून हात फिरवणे, हातावर हात चोळणे, भिरभिरत्या नजरेने इकडेतिकडे पाहणे या गोष्टी उमेदवाराने टाळायला हव्या. कक्षात प्रवेश केल्यानंतर उमेदवाराची प्रत्येक हालचाल मुलाखत मंडळाचे सदस्य परीक्षकाच्या नजरेतून टिपत असतात. उमेदवाराने मात्र आपले संतुलन ढळू न देता, तणाव दिसू न देता सहजपणे आणि नसíगकपणे मुलाखतीस सामोरे जाणे आवश्यक ठरते.

Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…