जागतिकीकरणामुळे व्यापार तसेच कला क्षेत्रात देशोदेशांमधील आदानप्रदान वाढू लागले आहे. दुभाषांना म्हणूनच गेल्या काही वर्षांत झळाळी प्राप्त होत आहे. दुभाषांचे मूलभूत कार्य म्हणजे दोन वेगळ्या भाषा बोलणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी बोलण्यासाठी मदत करणे. दुभाषांचे दोन्ही भाषांवर प्रभुत्व असते अथवा त्यांना चिन्ह भाषा अवगत असते.
दुभाषांना जी व्यक्ती बोलत आहे, त्याचे भाषांतर करावे लागते. अशा वेळी वक्त्याचे बोलणे नीट ऐकून त्याच वेळी त्याचे भाषांतर करून सांगायचे असते. वेगवेगळ्या भाषेतील कल्पना, व्यापार, शांतता करार आणि परस्परांना जाणून घेणे या महत्त्वाच्या घडामोडींमध्ये या अनुवादकांचाही खारीचा वाटा असतो.
दुभाषा वेगवेगळ्या परिस्थितीत काम करत असतात. एखाद्या कर्णबधिर व्यक्तीला इतरांशी संवाद साधण्याकरता ते मदत करत असतात. टीव्हीवर सुरू असलेल्या समालोचनाचे ते भाषांतर करतात. संयुक्त राष्ट्रांमध्ये कार्यरत असतात अथवा देशांमधील शांतता कराराच्या वाटाघाटींमध्येही त्यांची मदत होत असते. जागतिक स्तरावर दुभाषासंबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या आणि अद्ययावत सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ट्रान्सपरफेक्ट आणि क्विंटेस्सेन्शिअल (ङ६्रल्ल३ी२२ील्ल३्रं’) यांसारख्या काही महत्त्वाच्या कंपन्या कार्यरत आहेत.

या करिअरविषयी..
या क्षेत्रात अर्धवेळ अथवा पूर्णवेळ काम करता येते किंवा स्वत:चा उद्योगही सुरू करता येतो. वेगवेगळ्या प्रोग्राम्सद्वारे तुम्हाला आवश्यक ती कौशल्ये शिकता येतात. यासंबंधीची पदवी प्राप्त केल्यास तांत्रिक विषयातील दुभाषाचे कामही जमू शकते. जर तुम्ही फ्रीलान्सर म्हणून कार्यरत असाल तर तुमच्या कामाचे तास अनियमित अथवा प्रदीर्घही असू शकतात.

आवश्यक अर्हता
* नि:पक्षपाती राहण्याची क्षमता.
* अर्थ न बदलता अचूक भाषांतर करण्याची क्षमता.
* त्या भाषेत अस्खलित बोलता येणे गरजेचे.
* विविध कामे करण्याची क्षमता.

या क्षेत्रातील प्रवेश
ज्या भाषेचे तुम्हाला दुभाषा व्हायचे आहे, त्या भाषेत पदवी प्राप्त करायला हवी, तसेच दुभाषासंबंधित अभ्यासक्रम शिकायला हवा. दोन्ही भाषांवर प्रभुत्व हवे अथवा चिन्हांची भाषा उत्तम जमायला हवी.

– अपर्णा राणे