अलीकडेच पार पडलेल्या लोकसत्ताच्या मार्ग यशाचाया शैक्षणिक परिसंवादांमध्ये वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परळच्या केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश..

असा एक काळ होता, ज्यावेळी उत्तम गुण मिळालेले विद्यार्थी एकतर अभियांत्रिकीला प्रवेश घ्यायचे किंवा वैद्यकशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचे! याचे मुख्य कारण म्हणजे त्यावेळी आजच्यासारख्या इतर विद्याशाखा प्रचलित नव्हत्या. आज मात्र परिस्थिती वेगाने बदलतेय. नवनव्या विद्याशाखेतील असंख्य अभ्यासक्रम आज विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. त्यांची माहिती विद्यार्थी-पालकांनी करून घ्यायला हवी. विद्यार्थ्यांनी विद्याशाखा अथवा अभ्यासक्रम निवडताना आपली आवड, त्या विषयातील गती यांच्यासोबत त्या क्षेत्राची आगामी काळात होणारी संभाव्य वाढ आणि निर्माण होणाऱ्या करिअर संधी यांचा विचार करायला हवा.  एक मात्र नक्की, की  इतर अनेक विद्याशाखांना कालानुरूप मागणी येते अथवा जाते, मात्र वैद्यकशास्त्र हे एक स्थिर शास्त्र असून या क्षेत्रात करिअरच्या विविध संधी आहेत!

हीच बाब आकडेवारीनिशी स्पष्ट करायची झाल्यास,  सध्या महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटींच्या घरात आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या नियमानुसार ६०० लोकांमागे एक डॉक्टर असणे आवश्यक आहे. या प्रमाणानुसार, आपल्याकडे आजही एक लाख ९० हजार डॉक्टरांची कमतरता आहे. आज प्रॅक्टिस करणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांची संख्या केवळ ७० ते ७५ हजारांवर आहे. याचे कारण एमबीबीएस नंतर  पदव्युत्तर शिक्षणाकडे वळणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या आकडेवरून आपल्याकडे एमबीबीएस डॉक्टरांचा केवढा तुटवडा आहे हे लक्षात येईल. अर्थात आपल्याकडे आयुर्वेद, अ‍ॅलोपॅथी आणि युनानी यादेखील उपचारपद्धती प्रचलित आहेत. यात ६०-७० हजार डॉक्टर आहेत. मात्र तरीही, आपल्याला अद्याप १ लाख ९० हजार एमबीबीएस डॉक्टरांची आवश्यकता आहे. हे लक्षात घेतल्यास वैद्यकशास्त्रात किती मोठय़ा संधी उपलब्ध आहेत, हे ध्यानात येते आणि लोकसंख्येनुसार रुग्ण हे वाढतच जाणार, त्यामुळे डॉक्टरांना काम उपलब्ध नाही, असे कधी होणार नाही. मात्र हे नक्की की, सेवा, कष्ट आणि संयमाने वागण्याची क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांनीच या क्षेत्राकडे वळावे.

आपल्याकडे डॉक्टरांची कमतरता आहे, याचे कारण आपल्या देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या म्हणावी तितकी नाही. ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशात केवळ २७ वैद्यकीय महाविद्यालये होती. २००६ साली हा आकडा २०७ तर आज हा आकडा ४००च्या वर पोहोचला आहे. मात्र, ज्या वेगाने लोकसंख्या वाढतेय, हा वेग तितकासा ठीक नाही.

आज देशभरातील ४०२ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस पदवी शिक्षणाच्या ५२ हजार जागा आहेत. त्यांपकी ९० टक्के उत्तीर्ण झाले तरी आपल्याकडे ४५ ते ४७ हजार डॉक्टर तयार होतात. त्यापकी आठ ते दहा हजार परदेशांत जातात. म्हणजे आपल्या देशात दरवर्षी अवघे ३८ ते ४० हजार डॉक्टर तयार होतात. त्यात २२ हजार पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यामुळे एमबीबीएस डॉक्टरांची आपल्या देशात फार कमतरता आहे. ग्रामीण भागात तर परिस्थिती बिकट आहे. आपल्याकडे एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोक छोटय़ा वस्तीत राहातात. त्यामुळे तिथल्या रुग्णांवर एमबीबीएस सोडून इतर डॉक्टरच उपचार करत असतात. अगदी जवळचे उदाहरण द्यायचे झाल्यास कुल्र्याला १७८ डॉक्टर असतील तर त्यातले केवळ ३० टक्के डॉक्टरच एमबीबीएस आहेत. म्हणजे बऱ्याच लोकांना एमबीबीएस डॉक्टरांकडून उपचार मिळत नाहीत. हे सत्य आहे. याचाच अर्थ असा की, एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाण कमी असल्याने त्यांना कामाच्या संधी नक्कीच उपलब्ध आहेत.

हे जरी खरे असले तरी बारावीच्या निकालानंतर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताकद, एकाग्रता, जबाबदारी पेलण्याची क्षमता, सहवेदना, संयम आणि भरपूर कष्ट करण्याची तयारी असायला हवी आणि पालकांनीही आपल्या पाल्याची आवड व कुवत ओळखायला हवी.

सध्या महाराष्ट्रात ४५ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यातील २५ खासगी तर २० सरकारी आहेत. ही सरकारी महाविद्यालये मुंबई, पुणेसह, गोंदिया, कोल्हापूर, अकोलासह राज्यभरात विखुरलेली आहेत. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील शिक्षणाचा दर्जा उत्तम असतो. तेथील सुविधा दर्जेदार असतात आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत फी वाजवी असते.

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा विचार केल्यास त्यात दोन प्रकार आढळून येतात- त्यातील काही महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न तर काही खासगी विद्यापीठांशी संलग्न आहेत. यातही काहींचा दर्जा उत्तम आहे तर काही महाविद्यालये नवीन आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा नक्कीच वरचढ आहे. मात्र, अनेकदा इतर राज्यांतील वैद्यक अभ्यासक्रमांच्या आकर्षक जाहिरातींना आपले अनेक विद्यार्थी-पालक भुलतात. या भुलभुलैयाविषयी नंतर कळून पश्चातापाची वेळ येण्यापेक्षा प्रवेशाच्या वेळेसच त्या त्या महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या किंवा शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकडे त्या महाविद्यालयातील परिस्थिती, शिक्षणाचा दर्जा, तिथला माहोल, सोयीसुविधा  यांची चौकशी जरूर करा आणि मगच प्रवेश निश्चित करा.

आपल्या राज्यातील वैद्यक शिक्षणाच्या पदवी प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेशपरीक्षा देणे केव्हाही चांगले. एमएचटी-सीईटी या सामायिक प्रवेश परीक्षेला  अडीच ते तीन लाख विद्यार्थी बसतात. त्याद्वारे राज्यातील सरकारी महाविद्यालयांत वैद्यक शाखेच्या दोन ते अडीच हजार जागा उपलब्ध असतात. यावरून या सीईटीतील मार्काची चुरस विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल. मात्र एकदा विद्यार्थ्यांला सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळाला की, मग इथे विद्यार्थी केवळ अभ्यासच करतात असे नव्हे तर इथे तो चांगला डॉक्टर होण्यासोबत चांगला माणूस बनण्यासाठीही महाविद्यालयाकरवी प्रयत्न केला जातो.  मात्र जर सरकारी महाविद्यालयात संधी मिळाली नाही तर पालकांची आणि विद्यार्थ्यांची अवस्था बिकट होते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांला कुटुंबीयांनी मानसिकदृष्टय़ा आधार द्यायला हवा.

खासगी वैद्यकीय महाविद्यालये त्यांची स्वतंत्र सीईटी घेत असतात. खासगी महाविद्यालयात वर्षांचे शुल्कही सहा लाख ते आठ लाखांच्या घरात असते. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ४० ते ४५ लाख शुल्क भरावे लागते. संस्थेच्या व्यवस्थापनाच्या राखीव जागांसाठी व्यवहार आणखी खर्चीक असतो, याची तर साऱ्यांना कल्पना आहेच.

एकूणच वैद्यक क्षेत्राकडे वळू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी दीर्घकाळ शिकण्याची- (वयाच्या सुमारे ३२ वर्षांपर्यंत शिक्षण पूर्ण होते) तयारी ठेवावी. या क्षेत्रात अथक काम करण्यासाठी शारीरिक, मानसिक ताकद कमावणे आवश्यक असते.  वेळेची पर्वा न करता कष्ट करण्याची तयारी ठेवावी. ही तयारी नसेल तर विद्यार्थ्यांनी वैद्यकशास्त्राकडे वळू नये. केवळ पसा कमवायचा आहे, म्हणून या क्षेत्राकडे बघू नये. आज सर्वसाधारण डॉक्टरही चांगली प्रॅक्टिस करून उत्तम पसे मिळवतो. मात्र जर गरज सोडून जास्त पैसे मिळवण्याची हाव निर्माण होते तेव्हा नव्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घ्यायला हवे.

एमबीबीएसनंतर अर्थातच स्पेशलायझेशन निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यातही शल्यचिकित्सा, मेडिसीन अशा शाखांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. गेल्या दहा वर्षांत मात्र जीवनशैलीनुसार आवश्यक ठरणाऱ्या शाखांमध्ये स्पेशलायझेशन करण्याचा कल वाढत आहे आणि अशा विद्याशाखांना मागणीही उत्तम आहे. आज हृदयाचे विकार वाढत आहेत ते लक्षात घेतले तर कार्डिओलॉजीकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय. मात्र अशा वेळी शास्त्रही झपाटय़ाने बदलत अद्ययावत होत आहे याचा विचार विद्यार्थ्यांनी करायला हवा.  एक काळ असा होता की, सगळे ‘बायपास’कडे वळत होते. मात्र आता बायपास करण्यापेक्षा अँजिओप्लास्टी करतात. म्हणून ‘बायपास’मध्ये सुपरस्पेशलायझेशन मिळवलेल्या डॉक्टरांना पूर्वीसारखी मागणी उरलेली नाही, हे वास्तव आहे. म्हणूनच कुठल्या क्षेत्राला चांगले दिवस येतील अथवा नाही, याबाबत भाकीत करता येत नाही. म्हणूनच आपण असे क्षेत्र निवडले पाहिजे जे कायमस्वरूपी स्थिर राहील. यांत मेडिसीन, सर्जरी, स्त्रीरोगतज्ज्ञ या स्पेशलायझेशन्सचा समावेश करता येईल. गेल्या तीन वर्षांत तंत्रज्ञान झपाटय़ाने अत्याधुनिक होत आहे. म्हणूनच या क्षेत्राकडे वळताना भविष्यात आपल्याला कोणत्या संधी आहेत याचा विचार करायला हवा. उदा. न्युरॉलॉजिस्ट (मज्जासंस्था शल्यचिकित्सक.)

आज सरकारी नोकरीत उत्तम वेतन मिळते. खासगी प्रॅक्टिस करूनही चांगली मिळकत होऊ शकते. मात्र, या सगळ्याच्या पलीकडे वैद्यकशास्त्रात काम करण्याचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ज्या रुग्णाला आपण उपचार देऊन बरे करतो त्यात मिळणारे समाधान शब्दांत वर्णन करण्यापलीकडचे असते.

एमबीबीएसव्यतिरिक्तही आणखी वेगळेही करता येऊ शकते. भारतात वैद्यकीय शिक्षणाच्या इतरही पद्धती- अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि युनानी आदी उपचारपद्धती अस्तित्त्वात आहेत. त्याकरिता राज्यात ९६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यातून दरवर्षी सात ते आठ हजार डॉक्टर तयार होतात. पाच-साडेपाच वर्षांचा अभ्यासक्रम आहे. याशिवाय दंतवैद्य किंवा त्वचारोगतज्ज्ञ होऊन व्यवसाय करता येतो. दंतचिकित्सा शाखेतही ‘ऑर्थोडेंटिस्ट’सारखी वेगवेगळी स्पेशलायझेशन्स सुरू झाली आहेत. दंतचिकित्सा शाखेचीही ३० महाविद्यालये असून हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असतो.

पॅरामेडिकल क्षेत्रातील फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपीसारखे अनेक अभ्यासक्रम करता येतील. त्याशिवाय पॅरामेडिकल क्षेत्रात तांत्रिक स्वरूपाचेही प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आज वैद्यक तंत्रज्ञांना मोठी मागणी आहे.  प्रोस्थेटिक, ऑर्थोटिक इंजिनीयिरग यांसारखे व्यवसाय वैद्यक आणि अभियांत्रिकी अशा दोन्ही व्यवसायांशी संलग्न आहेत. ऑडिऑलॉजी आणि स्पीच थेरपी, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी क्षेत्रांचाही अभ्यास केला जाऊ शकतो. ज्या क्षेत्रात आपल्याकडे तसेच परदेशातही करिअरच्या मोठय़ा संधी उपलब्ध आहेत असे क्षेत्र म्हणजे नर्सिग.

वैद्यक शिक्षणासाठी रशिया, चीनसारख्या देशांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र यासंबंधीच्या आकर्षक जाहिरातींना बळी न पडणेच इष्ट. तिथल्या शिक्षणाच्या  गुणवत्तेची स्थिती आपल्याला नेमकी कळू शकत नाही तसेच  भारतात परतताना विद्यार्थ्यांना पुन्हा आपल्याकडच्या राष्ट्रीय मंडळाची परीक्षा द्यावी लागते. यात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण पाच ते दहा टक्क्यांच्या आसपास असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना देशाबाहेरच काम करावे लागते. काही वेळेस तिथे आपली मुले अपयशी ठरतात. अशा वेळी, खर्च, मानसिक त्रास, कुटुंबापासून दूर असणे या सर्व गोष्टी हाताबाहेर जातात. म्हणूनच संपूर्ण चौकशीअंतीच परदेशात वैद्यक शिक्षण घेण्याचा विचार करावा.

कष्ट, संयम आणि सेवाभाव ही वैद्यकीय क्षेत्रात यश मिळवण्याची त्रिसुत्री आहे.  पालकांनीही  मुलांना सेवाभाव शिकवायला हवा तसेच मुलांमध्ये अपयश पचवण्याची ताकदही निर्माण करायला हवी.

(शब्दांकन : विवेक सुर्वे)