अहंगंड आणि न्यूनगंड या दोन्हींचं पोकळपण एकदा जाणवलं की आत्मसन्मान आपल्या आतच असतो हे कळतं. नव्या आत्मविश्वासानं आपण नव्या स्वत:वर प्रेम करायला लागतो आणि प्रेमानं भरलेलं  जग आणखीनच सुंदर होऊन जातं.
‘जब तुम खुदसे प्यार करने लगते हो ना, तब दुनिया सुंदर हो जाती हैं, थँक यू फॉर हेल्पिंग मी लव्ह मायसेल्फ..’ ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमात अशा अर्थाचा डायलॉग शेवटी शशी (श्रीदेवी) म्हणते आणि प्रेक्षक सद्गदित होतात. तमाम महिलावर्गाचे डोळे पाणावतात. प्रत्येकाच्या मनातल्या कुठल्या तरी हळव्या कोपऱ्याला त्या शब्दांनी हात घातलेला असतो. काय घडतं तिथे?
शशी नावाच्या सुखवस्तू गृहिणीची ही कथा. सुगरण असलेली शशी घरगुती केटिरगचा व्यवसाय आवडीनं करत असते. सगळं उत्तम असतं, पण इंग्रजी माध्यमातल्या बुद्धिमान लेकीकडून आणि उच्चशिक्षित पतीकडून तिच्या घरगुती असण्याची आणि इंग्रजी चांगलं न येण्याची सतत चेष्टा होत असते. त्यांना आपली लाज वाटते हे शशीला जाणवत असतं. तिचा आत्मसन्मान दुखावत असतो. त्याच दरम्यान काही कारणाने शशीचे अमेरिकेत जाणे होते. तिथल्या महिन्याभरच्या वास्तव्यात शशी रीतसर इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करते. आणि तिथल्या एका सार्वजनिक समारंभात आपल्या भावना सर्वासमोर इंग्रजीत व्यक्त करण्यासाठी धीर एकवटते. ती इंग्रजीत बोलू शकते का, भाषेबद्दलचा कॉम्प्लेक्स संपून तिचा आत्मसन्मान ती स्वत:मधूनच परत मिळवते का, पुन्हा आपल्या देशी आयुष्यात परतताना ती आंग्लाळते की सहज परतते,  याचा एक अप्रतिम अनुभव आपल्याला हा चित्रपट बघताना येतो. थिएटरच्या बाहेर पडताना एका जिवंत, सुंदर अनुभवातून बाहेर पडल्यासारखं आपल्याला वाटतं. त्या निमित्तानं आपल्या मनाच्या तळाशी साठलेल्या अनेक गोष्टींना आपण स्पर्श करून येतो. कॉम्प्लेक्स – न्यूनगंड किंवा अहंगड या विषयाकडेच जरा जवळून पाहायला लागतो.
इंग्रजी भाषा न येण्याबद्दलचा न्यूनगंड हा आपल्याकडचा सामुदायिक न्यूनगंड. इंग्रजी माध्यमात मुलांना घातलेल्या ‘देशी’ पालकांना, त्यातही आयांना हा चित्रपट आपला वाटतोच, शिवाय कशाचा ना कशाचा कमीपणा मनात बाळगून आत्मसन्मानाशी तडजोड करत राहणारी प्रत्येक व्यक्ती यातल्या कुठल्या ना कुठल्या पात्राशी मनातून जोडली जाते. त्यामुळे ‘मुझे प्यार की जरूरत नहीं है राधा, जरुरी है सिर्फ थोडे इज्जत की..’  हा शशीचा डायलॉग महिलांच्या मनात घुसतो, ‘How will you manage in US without knowing English?’ या व्हिसा इंटरव्ह्य़ूतल्या अमेरिकन अधिकाऱ्याच्या  प्रश्नाला तिथलाच एक भारतीय अधिकारी परस्पर ‘The same way you manage in our Country without knowing Hindi.’ असं उत्तर देतो तेव्हा कडकडून टाळ्या पडतात तर ‘नवराई माझी लाडाची लाडाची’ च्या ठेक्यावर फेटे बांधून नाचणारे अमेरिकन पाहताना ‘लय भारी’ वाटतं.
इंग्रजी न येणाऱ्यांना हे प्रसंग ‘आपले’ वाटणं स्वाभाविक आहे. पण इंग्रजी येणाऱ्यांनाही हा चित्रपट खोलवर स्पर्श करतो. याचं कारण तो फक्त भाषेच्या कॉम्प्लेक्सबद्दल बोलत नाही, तर भाषेच्या सामुदायिक कॉम्प्लेक्सचं माध्यम वापरून एकूणच कुठलाही कॉम्प्लेक्स, त्याचं अस्तित्व, त्याला सामोरं जाणं आणि तो संपणं हा प्रवास खूप सुंदर पद्धतीनं, कुठलाही अभिनिवेश न ठेवता उलगडत नेतो.
प्रत्येक व्यक्ती मनातून कुठल्या ना कुठल्या न्यूनगंडाची शिकार असते. म्हणजे काय असतं? तर प्रत्येकाच्या मनात मोठेपणाची, चांगलेपणाची, स्मार्टनेसची स्वत:ची अशी खास कल्पना असते. आपल्या वागण्याच्या पद्धतीवर, आनंदावर त्या गोष्टीचा प्रभाव असतो. आपल्या मनातलीच कल्पना असल्यामुळे तसं एका दृष्टीनं तो एक बुडबुडा किंवा पोकळ फुगा असतो ज्यामध्ये आपण स्वत:ला अडकवून घेतलेलं असतं. पण आपल्यासाठी ते अडकल्यासारखं वाटणं खूप खरं आणि महत्त्वाचं असतं. उदा. एखाद्याला वाटतं, ‘माझा आवाज गोड नाही. माझं बोलणं ऐकणाऱ्याला रटाळ वाटतं,’ असा कॉम्प्लेक्स असणारी व्यक्ती स्वत:जवळचे अनुभव कितीही वेगळे आणि विलक्षण असले तरी चारचौघांत बोलायचं टाळते. अर्थात असे फुगे व्यक्तिमत्त्वाच्या अगदी वरच्या पातळीवरचे, फोडायला त्या मानानं सोपे असतात. आवाजाचा कॉम्प्लेक्स असणाऱ्याला त्याचा अनुभव सांगत असतानाचा जिवंत आवाज रेकॉर्ड करून ऐकवला तरीही ‘आपण एवढेही वाईट नाही बोलत’ अशी त्याच्या कॉम्प्लेक्समधली हवा जाऊ शकते.  
 लहानपणीच्या काही प्रसंगांनी बनलेली मतं किंवा तेव्हा परिस्थितीमुळे करता न आलेल्या छोटय़ा- छोटय़ा गोष्टी कॉम्प्लेक्स बनून मोठेपणीसुद्धा मधूनमधून डोकं वर काढत असतात, जे खरोखर काहीही असू शकतात. ‘माझ्याकडे दहा हजारांचा मोबाइल असेल तर मी श्रीमंत,’ ‘अमुक हॉटेलात पार्टी करता येईल तेव्हा मी श्रीमंत’, ‘एवढे मार्क्स पडले तरच मी हुशार,’ ‘एवढे तास अभ्यास केला तरच मी अभ्यासू’, माझी उंची जास्त हवी होती असं काहीही ते असू शकतं. मात्र असे वैयक्तिक कॉम्प्लेक्स अनेकदा स्वत:शिवाय कोणाला माहीतही नसतात त्यामुळे त्यांचे परिणामही लहान राहतात. अनेकदा ती गोष्ट मिळवण्यासाठी लागणारे कष्ट घ्यायचे नसतात, स्वत:चा कम्फर्ट झोन सोडायचा नसतो, तेव्हा ती खंत उगाळत तिचं उदात्तीकरण केलं जातं किंवा ती गोष्ट न जमण्याची    (पान १ वरून)    फालतू समर्थनं शोधली जातात.  
एकच कॉम्प्लेक्स जेव्हा समाजातल्या खूप व्यक्ती घेतात तेव्हा तो सामुदायिक कॉम्प्लेक्स बनतो, त्याचा परिणामही मोठा होतो. ‘मला इंग्रजी येत नाही’ हा याच प्रकारातला मोठा सामुदायिक कॉम्प्लेक्स. ‘माझ्याजवळ गाडी नाही, स्वत:चं घर नाही, माझ्या मुलाची शाळा साधी आहे, माझी नोकरी आयटीतली नाही असे लहानमोठे अनंत सामुदायिक कॉम्प्लेक्स सहसा स्टेटस सिंबॉलशी जोडलेले असतात. साहजिकच ज्यांच्याकडे त्या गोष्टी असतात त्यांच्यामध्ये अहंगंड (Superiority Complex) जोपासला जातो. त्यांच्या वागण्यात, विचारांत, देहबोलीत, स्वरात तो जाणवत राहतो आणि त्यातून तोच न्यूनगंड (Inferiority Complex) असणाऱ्या व्यक्ती पुन्हा-पुन्हा खच्ची होत जातात. कधीकधी हे खच्चीकरण एवढं वाढतं की, त्या व्यक्तीला स्वत:चीच लाज वाटायला लागते. ती कमी तिच्या आस्तित्वालाच व्यापून उरते. त्याशिवाय इतर अनेक चांगल्या गोष्टी जवळ असल्या तरी त्या निर्थक वाटायला लागतात. सगळा आत्मसन्मान त्या एका कमतरतेभोवती फिरायला लागतो.
अर्थात सामुदायिक कॉम्प्लेक्सची शिकारही व्यक्तीच असते. काही व्यक्तींमधले असे न्यूनगंड एखाद्या अनुभवामुळे  संपतात. उदा. मनात स्वत:च्या आíथक स्थितीबद्दल न्यूनगंड असेल तरीही पूर्वी आदर्श मानलेली, आता शेवटचे दिवस एकटेपणात काढणारी एखादी अतिश्रीमंत व्यक्ती जवळून संपर्कात येते तेव्हा नात्यांचं महत्त्वही बरोबरीनं समजतं. मग पैशांबद्दलचा न्यूनगंड व्यापून उरत नाही, पण असं आपोआप दरवेळी घडत नाही, न्यूनगंडांना सामोरंही जावं लागतं.
सामुदायिक न्यूनगंडदेखील फुग्यांसारखेच पोकळ असले तरी एवढय़ा मोठय़ा समुदायाचे ते एकत्रित फुगे असल्यामुळे इतर छोटय़ामोठय़ा वैयक्तिक कॉम्प्लेक्ससारखे ते निरुपद्रवी किंवा फुसके ठरत नाहीत. त्यांच्याशी आत्मसन्मान जोडला गेल्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासातला ते मोठा अडथळा बनतात. ‘कशाला हवी ती परक्यांची इंग्रजी भाषा?  मातृभाषेचा अभिमान पाहिजे,’ असं उदात्तीकरण  किंवा ‘छोटय़ा गावात शिकलो ना आम्ही? कसं येणार इंग्लिश?’ असं समर्थन दोन्हीपैकी कुठल्याही मार्गानी त्याला झाकण्याचा प्रयत्न बहुधा केविलवाणा ठरतो. ही दुर्बळाची अहिंसा होते आहे असं वाटत राहून आत्मसन्मानाला तडे जात राहतात. इतर कशानंही, म्हणजे आपल्याला उत्तम येणाऱ्या गोष्टीतल्या सन्मानानंदेखील तो अपुरेपणा भरून काढता येत नाही.     
दुसऱ्या बाजूचा अहंगंडदेखील तेवढाच पोकळ असला, चुकीचा असला तरी तो संपवणं आपल्या हातात नसतंच. चूक-बरोबरच्या चच्रेला तिथे काही अर्थच नसतो. एकतर आयुष्यभर न्यूनगंड सांभाळत जगायचं किंवा आपला न्यूनगंडाला सामोरं जाऊन आपला आत्मसन्मान परत मिळवायचा एवढे दोनच पर्याय इथे आपल्या हातात असतात. त्यासाठी स्वत:ला स्वत:पाशी सिद्ध करावं लागतं, स्वत:वर विश्वास ठेवावा लागतो तरच स्वत:वर पुन्हा एकदा प्रेम करता येतं.
हे तत्त्वज्ञान बुद्धीच्या पातळीवर समजत असलं तरी उमजून घेणं आपण सवयीनं बराच काळ टाळत राहतो. हळूहळू या खचलेल्या आत्मसन्मानाचा ताण जगणं मुश्कील करतो. तेव्हा मात्र मनातली ‘कमीपणाची’ खंत बाजूला सारून त्या फुग्याकडे एकदा नीट पाहावंच लागतं. आपल्याच मनातल्या भीतीला निर्धारानं सामोरं जावं लागतं. त्यासाठी लागणारा अवकाश (स्पेस)सुद्धा आपला आपल्यालाच मिळवावा लागतों. आधी अशक्यप्राय वाटणाऱ्या त्या गोष्टीला आपण भिडतो आणि ती आपल्या हातात यायला लागते तशी मनातल्या त्या फुग्यातली हवा जायला सुरुवात होते. मोकळं वाटायला लागतं. धूसरलेलं अवकाश लख्ख दिसायला लागतं. खूप मोठा आणि चमकदार असला तरी तो पोकळ बुडबुडाच होता, एवढाही जीवनमरणाचा प्रश्न नव्हता, हे आपल्याला एकदम ‘उमजतं’ आणि एवढय़ा वर्षांचं अधांतरीपण संपतंच एकदम. मनभर पसरलेला ‘तुझ्यात काहीतरी कमी आहे,’चा कोलाहल क्षीण होत जातो. एक विलक्षण शांतपण अनुभवाला येतं. त्या कमीतला अभिनिवेश (इश्यू) संपलेला असतो. दुसऱ्यांच्या अहंगंडातली हवादेखील त्यामुळे आपोआप निघून जाते किंवा किमान आपल्याला खच्ची करण्याची शक्ती त्यांच्यात उरत नाही. (अर्थात न्यूनगंडातून मुक्त होऊन आपण अहंगंडात शिरायचं नाही, ही काळजी मात्र कधी-कधी घ्यावी लागते बरं का.)
न्यूनगंडाचा बुडबुडा फोडण्याचा हा अनुभव अशा बुडबुडय़ांचं पोकळपण उमजण्यापर्यंत नेऊन थांबत नाही, तर जुन्याच आयुष्याकडे बघण्याची नवी नजर आपल्याला देतो.  एवढय़ाशा फुग्याच्या फुटण्यानं आपली जुनी जगरहाटी बदलणार नसतेच, पण तरीही आपल्या मनातला बदल आपल्याला जाणवतो. आत्मसन्मानाला धक्का पोहोचल्यावरच हालचाल करायची, तोपर्यंत खंत करत, कुढत राहायचं या आपल्या तोपर्यंत जपलेल्या स्वभावाकडेही आपण नव्यानं बघतो.  बुडबुडय़ांना फोडायचं टेक्निक आता आपल्याला कळलेलं असतं. आत्मसन्मान आपल्या आतच असतो हेही कळलेलं असतं. आता अशा बुडबुडय़ांमध्ये न अडकणं हा आपला नवा स्वभाव बनू शकतो. नव्या आत्मविश्वासानं आपण नव्या स्वत:वर प्रेम करायला लागतो आणि प्रेमानं भरलेलं  जग आणखीनच सुंदर होऊन जातं.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ